कोल्हापूर, दि. ८ मार्च: मानवजातीचा इतिहास हा महिलांशी जोडलेला असून
महिलांशिवाय समाजाची कल्पना करणे अशक्य असल्याचे मत ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे
यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग, मास
कम्युनिकेशन विभाग आणि महिला वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
करण्यात आलेल्या जागतिक महिला दिन कार्यक्रमात जागतिकीकरणाचे
महिलांवर झालेले परिणाम या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. निरंजना
मुळीक, महावीर महाविद्यालयाच्या
डॉ. रूपा शहा उपस्थित होत्या.
विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र
सभागृहात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उत्तम कांबळे म्हणाले, मानवी समाजाच्या इतिहासात निसर्गाशी पहिला संवाद हा महिलेने साधला. स्त्रियांनीच
पहिल्यांदा शेतीची सुरुवात केली; परंतु, कालांतराने पुरुषी मानसिकतेतून तिला तिच्या हक्कांपासून वंचित
ठेवण्यात आले. महाभारतापर्यंत मानवी इतिहास हा स्त्रीशी जोडलेला होता. पुरुष हे स्त्रीच्या
नावाने ओळखले जात. मात्र, नंतर यात बदल होऊन स्त्रीचा दर्जा निम्न ठरविण्यात आला. जागतिकीकरणाच्या
रेट्यात महिलांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. रूपा शहा यांनी आजच्या
काळात महिलांनी सक्षम होणे अधिक गरजेचे असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, एकच दिवस
महिलांचा सन्मान न करता त्यांना कायम बरोबरीने वागवले पाहिजे. यावेळी त्यांनी
दिलासा या संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
डॉ. मुळीक यांनी महिलांनी
स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उत्तम कांबळे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार
प्राप्त झाल्याबद्दल शाल आणि विद्यापीठाचे स्मृतीचिन्ह देऊन विभाग प्रमुख डॉ. निशा
मुडे-पवार यांनी त्यांचा सत्कार केला. डॉ. रूपा शहा यांचा एनसीसीच्या क्षेत्रातील मानद
मेजर बहुमान मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी श्वेता किल्लेदार
दिग्दर्शित ‘येस, आय ब्लीड’ , हा महितीपट
तसेच शीतल माने दिग्दर्शित ‘स्वयंसिद्धा’ महितीपट यांचा प्रीमियर शो सादर
करण्यात आला. चैतन्य डोंगरे आणि सुशांत पाटील यांचा ‘हॉस्टेल
लाइफ’ या लघुपटही दाखविण्यात आला. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन
केले, तर डॉ सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment