कोल्हापूर दि. ५ मार्च: फुले-आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून भारतीय समाजव्यवस्थेचा अत्यंत सूक्ष्म रितीने अभ्यास केल्यास सामाजिक शास्त्रातील संशोधकांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल, असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रा.डॉ. उमेश बगाडे यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र विभाग आणि आयसीएसआर, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दहा दिवसीय सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धती या कार्यशाळेत ते काल बोलत होते.
डॉ. बगाडे म्हणाले, महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने भारतीय समाज व्यवस्थेची चिकित्सा करणारे थोर भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांची वैचारिक परंपरा पुढे नेल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्या सामाजिक विचार प्रणालीचा शास्त्रीय अभ्यास
केल्यास खूप काही शिकण्यासारखे हाती लागेल. या महान विभूतींच्या द्रष्टेपणाचे मूळ
हे त्यांच्या अभ्यासपूर्ण सामाजिक तळमळीतून साकारलेल्या कार्यात दडलेले आहे.
सायबर, कोल्हापूरचे डॉ. के.प्रदीप कुमार म्हणाले, संशोधनामध्ये उदि्ष्टे ठेवून संशोधन केल्यास त्याचा स्वत:बरोबरच समाजाला देखील उपयोग होतो. त्याचबरोबर त्यांनी सामाजिक शास्त्रातील संशोधन आराखडे याविषयी विवेचन केले.
डॉ.विजय ककडे यांनी युवा गुंतवणूकदारांचे आर्थिक नियोजन या विषयावर व्याख्यान दिले. समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.आर.बी.पाटील यांनी संशोधन प्रस्ताव कशा प्रकारे लिहावा. संशोधन प्रस्तावाला विविध संस्थांकडून आर्थिक सहाय्य कशा प्रकारे मिळवता येईल, यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
No comments:
Post a Comment