कोल्हापूर दि. २ मार्च: येणारा काळ हा कृषी व अन्न प्रक्रिया
उद्योगांचा असून त्या दृष्टीने ॲग्रो-मॅनेजमेंट क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांनी
समाजमानस निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स
(पुणे)चे निवृत्त संचालक डॉ. पी.जी. अडसुळे यांनी काल येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कृषी, रसायने व कीड व्यवस्थापन अधिविभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या 'रिसेन्ट ॲडव्हान्सेस इन इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट' या दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. वि.स.खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे होते.
डॉ. अडसुळे म्हणाले, आपल्या शेतकऱ्यांमध्ये खते, कीटकनाशके वापरण्यासंदर्भात
जागृती करण्याची मोठी गरज आहे. कीटकनाशके वापरावीत, परंतु त्यांचे प्रमाण संतुलित
असले पाहिजे. कीडनाशकांचे प्रमाण निश्चित करण्यासंदर्भात शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे
आवश्यक आहे. त्यामुळे कीड व्यवस्थापनासंदर्भातील संशोधन तसेच आंतरराष्ट्रीय
मानकांच्या बाबतीतली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी या क्षेत्रात
काम करणाऱ्या संशोधक, विद्यार्थी आणि तज्ज्ञांनी घ्यायला हवी. त्याचप्रमाणे वाढती
लोकसंख्या लक्षात घेता जमिनीचे संरक्षण व व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा ठरणार असून
अन्न प्रक्रिया उद्योगाला अत्यंत महत्त्व प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी
सांगितले.
या प्रसंगी परिषदेच्या अनुषंगाने मान्यवरांच्या हस्ते विशेष स्मरणिकेचे
प्रकाशन करण्यात आले. यावेळी आगरकर इन्स्टिट्यूट, पुणे येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.डी.जे. नाईक, धारवाड कृषी विद्यापीठ वनस्पती विकृतशास्त्र अधिविभागाचे डॉ.व्ही.बी. नारगुंड व डॉ.शामराव जहांगीरदार आदी उपस्थित होते. परिषदेचे समन्वयक व कृषी, रसायने व कीड व्यवस्थापन या अधिविभागाचे समन्वयक प्रा.डॉ.एम.बी.देशमुख यांनी अधिविभागाची वाटचाल व या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका सविस्तरपणे मांडली. परिषदेचे कार्यवाह
डॉ. पी.व्ही. अनभुले यांनी आभार मानले.
दरम्यान, आज सायंकाळी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (पुणे) येथील ज्येष्ठ
संशोधक डॉ. एल.जी. देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचा समारोप समारंभ पार पडला.
No comments:
Post a Comment