कोल्हापूर,
दि. १५ मार्च: कथाकार हा सामान्य माणसाच्या जगण्याशी एकरूप
होऊन सामान्यांच्या जगण्यातील वेदनेला शब्दरूप देत असतो. संपूर्ण साहित्याच्या
मुळाशी मानवी वेदनाच असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक
भास्कर चंदनशिव यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा विदेशी
भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित नवलेखक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. देवानंद शिंदे होते. समन्वयक
डॉ. मेघा पानसरे यांनी स्वागत केले. डॉ.
रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
श्री. चंदनशिव म्हणाले, लेखक
'नाही रे' वर्गाचा आवाज आपल्या साहित्यातून
मांडत असतो. १९४५पासून पडणाऱ्या प्रत्येक दुष्काळाने मूल्यांची उलथापालथ केली. बीड,
उस्मानाबादमधील जीवघेण्या दुष्काळाने मला लेखक बनवले. ‘समकालीन वास्तव गतीने बदलत असून या काळाने नवलेखकांसमोर असंख्य प्रश्न निर्माण
केले आहेत. कथा ही लेखकाच्या अनुभवातून आणि त्याने जोपासलेल्या नैतिक मूल्यभावातून
जन्म घेते. बदलती मूल्ये, मूल्यभावांमधील संघर्ष, संवेदना आणि काळाचा दाब कथेच्या निर्मितीत महत्त्वाचा असून अनुभवाला
भिडण्याचा सच्चेपणाच लेखकाला घडवत जातो. लेखकाच्या सच्चेपणातूनच चांगली कथा जन्मते.
आणि अशी कथाच मानवी जीवनाचे सत्य सांगणारी असते. ती समाज वास्तवाचा, मानवी संवेदनेचा इतिहास बनते.’
दुसऱ्या सत्रात
कथाकार आसाराम लोमटे यांनी आपल्या कथानिर्मितीचा प्रवास उलगडून दाखवला. त्यांच्या विविध
कथांची निर्मितीप्रक्रिया शिबिरार्थींना उर्जा देणारी होती. तिसऱ्या सत्रात कथाकार
भारत काळे, कृष्णा खोत आणि किरण गुरव यांनी आपल्या
कथालेखानाचा प्रवास आणि निर्मिती प्रक्रिया विषद केली. कथाकार आप्पासाहेब खोत
यांनी 'कथा कशी सांगावी' याविषयी
सविस्तर मार्गदर्शन केले. समारोप सत्र भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली पार
पडले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस उपस्थित होते. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगाव येथील परिसरातील सुमारे
२०० नवलेखक या कार्यशाळेला उपस्थित होते. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. राजेश
पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment