Tuesday, 22 March 2016

विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाकडे रत्नागिरी मानव विकास अहवालाचे काम




कोल्हापूर, दि. २२ मार्च: रत्नागिरी जिल्हा मानव विकास निर्देशांकाचे मोजमाप करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाची निवड करण्यात आली आहे. पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) व शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या निर्देशांकाचे मोजमाप करण्यात येणार आहे.
यशदा येथे विकास निर्देशांक मोजमापाचा कृती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने नुकतीच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विकास निर्देशांक मोजमाप समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा मानव विकास निर्देशांक अहवाल तयार करण्याच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी 'यशदा' मानव विकास केंद्राच्या संचालिका डॉ. मीनल नरवणे, अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख व मानव विकास निर्देशांक मोजमाप समितीचे समन्वयक डॉ. व्ही.बी. ककडे, प्रा.डॉ. एम.एस. देशमुख व इतर सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment