शिवाजी विद्यापीठाच्या
पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी
कोल्हापूर, दि. ३
मार्च: शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पहिला राष्ट्रीय 'प्राचार्य आर.के. कणबरकर
पुरस्कार' भारतरत्न प्रा.(डॉ.) सी.एन. आर. राव यांना जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (स्व.)
प्राचार्य रा.कृ.
कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठास २५ लाख रुपयांच्या ठेवीसाठी धनादेश प्रदान केला. स्व.
कणबरकर यांच्या पत्नी श्रीमती शालिनी कणबरकर यांनी सदर ठेवीसाठीचा धनादेश विद्यापीठाकडे सुपूर्द केला होता. शिवाजी विद्यापीठाच्या या माजी
कुलगुरूंच्या स्मृतिप्रित्यर्थ 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' या
शिवाजी विद्यापीठासह संयुक्त पुरस्काराची निर्मिती या निधीतून करण्यात आली. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाशी केलेल्या सामंजस्य कराराला व्यवस्थापन परिषदेनेही मान्यता दिली आहे. देशातील शैक्षणिक, साहित्यिक,
सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी हा पुरस्कार
देण्याचे ठरविले आहे. रुपये
१ लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ
असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सुयोग्य पुरस्कारार्थीच्या निवडीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय विशेष शोध समिती स्थापन करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव आहेत. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ पत्रकार- संपादक
उत्तम कांबळे व प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत सदस्य आहेत. या शोध समितीने 'प्राचार्य
आर.के. कणबरकर पुरस्कारा'साठी एकमताने भारतरत्न प्रा.
सी.एन.आर. राव यांची निवड केली. येत्या १२ एप्रिल २०१६ रोजी त्यांना हा पुरस्कार
प्रदान करण्यात येणार आहे, असेही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.
'विज्ञानयोगी रसायनशास्त्रज्ञ' प्रा.डॉ. सी.एन.आर. राव
रसायनशास्त्रातील 'विज्ञानयोगी' असे वर्णन करण्यात येत
असलेल्या प्रा. चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म ३० जून १९३४ रोजी बंगळूर येथे झाला. विद्यार्थी दशेपासूनच रसायनशास्त्राची
आवड असल्याने त्यांनी १९५१मध्ये त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून याच विषयात बी.
एस्सी. पूर्ण केले. वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. संशोधनासाठी ते अमेरिकेस रवाना झाले. पर्ड्यू विद्यापीठातून
१९५८मध्ये त्यांनी पीएच.डी. संपादन केली. भारतात परतल्यानंतर १९६१मध्ये म्हैसूर विद्यापीठातून डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली. परदेशी संस्थेत काम करण्याची संधी चालून आलेली असूनही त्यांनी आयआयटी (कानपूर)च्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुखपद स्वीकारले. देश व परदेशात विद्यार्थी घडविण्याचे काम केल्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत त्यांनी सॉलिड स्टेट अँड स्ट्रक्चरल केमिस्ट्री विषयातील संशोधन प्रयोगशाळेची स्थापना केली. १९८४ ते १९९४पर्यंत या संस्थेचे संचालकपद भूषविले. दीड हजारांहून अधिक शोधनिबंध व पन्नासच्या आसपास पुस्तके नावावर
असलेले ते देशातील एकमेव संशोधक आहेत. सी.एन.आर. राव हे 'सॉलिड स्टेट' आणि 'मटेरिअल्स
केमिस्ट्री'मधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि या क्षेत्रातील एक
अधिकारी संशोधक म्हणून ओळखले जातात. सी. व्ही. रामन आणि माजी राष्ट्रपती ए. पी.
जे. अब्दुल कलाम यांच्यानंतर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे ते देशातले
तिसरे शास्त्रज्ञ आहेत. प्रा. राव अनेक परदेशी पुरस्कार व सन्मानांचेदेखील
मानकरी आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे अनेक परदेशी संस्था, संशोधन संस्था
यांचे सदस्यत्व, तसेच फेलोशिप त्यांना प्रदान झालेली आहे.
पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी
जबाबदारी सांभाळली आहे. सॉलिड स्टेट अँड मटेरिअल केमिस्ट्री, स्पेक्ट्रोस्कोपी (वर्णपंक्तीशास्त्र)
हे त्यांच्या आवडीचे व संशोधनाचे विषय असले तरी विज्ञान व तंत्रज्ञानाबरोबर डॉ.
राव यांचा साहित्य, संगीत, राजकारण व समाजव्यवस्था या विषयांचाही सखोल अभ्यास आहे.
प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर यांच्याविषयी…
नाव - रामकृष्ण कृष्णाजी ऊर्फ रा.कृ. कणबरकर
जन्म - दि. १५ जून, १९२१ बेळगांव.
शिक्षण - १९४० : मॅट्रिक-बेनन स्मिथ हायस्कूलमध्ये सर्वप्रथम.
प्रथम वर्ष - विशेष गुणवत्तेसह
१९४४ ते १९४६: बी.ए., एम.ए. संपूर्ण इंग्रजी (द्वितीय वर्ग), राजाराम कॉलेज, कोल्हापूर.
१९६३ : बेसीक सर्टिफिकेट कोर्स इन टिचिंग, इंग्लिश ॲज ए फॉरेन लँग्वेज - सी.आय.ई., हैदराबाद.
सेवा - १९४६-४७ :
प्राध्यापक, लिंगराज कॉलेज, बेळगांव
१९४७ ते १९५४ : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत नेले. छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे इंग्रजी विभागप्रमुख.
१९५४ ते १९५७ : रयतच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज (कराड) चे पहिले प्राचार्य.
१९५७ ते १९५९ : प्राध्यापक, गोखले कॉलेज कोल्हापूर.
१९५९ ते १९६४ : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य.
१९६४ ते १९७१ : विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूरचे पहिले प्राचार्य.
१९७१ ते १९८० : न्यू कॉलेज, कोल्हापूरचे पहिले प्राचार्य.
१९८० ते १९८३ : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे चौथे कुलगुरू.
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या कारकीर्दीतील विशेष कार्य - ललित कला विभाग, संख्याशास्त्र विभाग, प्रौढ व निरंतर शिक्षण विभागाची नव्याने सुरुवात. सोलापूर येथे विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रारंभ. शाहू संशोधन केंद्राचे पुनरुज्जीवन. उच्च शिक्षण पत्रोत्तर अभ्यासक्रम, एमपीएड अँड एम.फिल.ची सुरुवात. विद्यापीठ सेवा सल्ला केंद्राची स्थापना. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल, निरंतर अंतर्गत मूल्यमापन पद्धतीचा प्रारंभ.
विद्यापीठ प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव - पुणे व मराठवाडा विद्यापीठ : ॲकॅडेमिक कौन्सिल व सिनेटचे सभासद. शिवाजी विद्यापीठ कार्यकारिणी सभासद दहा वर्षे, कला शाखा प्रमुख, विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर सभासद म्हणून उल्लेखनीय कार्य. नवीन शैक्षणिक व्यवस्थेत विद्यापीठ पातळीवर इंग्रजीचा अभ्यास तयार केला. १९७४चा विद्यापीठाचा नवीन कायदा तयार करण्यात महत्वाचा सहभाग.
विविध महाविद्यालये व संस्थांमधील क्रियाशील भूमिका - लिंगराज महाविद्यालये, बेळगांव (१ वर्ष) रयत शिक्षण संस्था सातारा (१० वर्ष), गोखले महाविद्यालय, कोल्हापूर (२ वर्ष), विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर (१२ वर्षे), प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस, कोल्हापूर (९ वर्ष), शाहू मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर, संस्थापक - विश्वस्त (३१ वर्षानंतर निवृत्त), माधवराव बागल विद्यापीठ, संस्थापक - सभासद (२५ वर्ष), ताराराणी विद्यापीठ, विद्यमान विश्वस्त व कार्याध्यक्ष.
पुरस्कार आणि सन्मान - महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (१९७४), 'एनसीइआरटी'च्या (नवी दिल्ली) संस्थेचे सभासद. (१९८० ते ८३), दक्षिण भारत जैन सभेचा शैक्षणिक कार्यासाठीचा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार (१९९९), कोल्हापूर महानगर पालिकेचा कोल्हापूर भूषण पुरस्कार, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, वाई (२००३), संत गाडगे महाराज पुरस्कार, कोल्हापूर (२००४), शाहू पुरस्कार (२०११), शाहू दूरदर्शन मालिका तज्ज्ञ समिती सभासद, रोटरी, लायन्स व अन्य संस्थांचे पुरस्कार.
No comments:
Post a Comment