विद्यापीठाच्या मेळाव्यात
सहभागी विद्यार्थी, कौशल्य प्रदात्यांची अपेक्षा
कोल्हापूर, दि. ३ मार्च: कौशल्य विकास ही आजच्या
युवकांची मागणी आणि काळाची गरज असल्याची बाब अचूक हेरून शिवाजी विद्यापीठाने
आयोजित केलेला कौशल्य मेळाव्याचा उपक्रम यापुढील काळात सातत्याने आयोजित करण्यात
यावा, अशी अपेक्षा सहभागी विद्यार्थी आणि कौशल्य प्रदात्यांनीही व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यातील पहिल्या दोन दिवसीय विद्यापीठीय कौशल्य
मेळाव्याचा समारोप समारंभ आज झाला. त्यावेळी या मेळाव्याविषयी अनेकांनी आपल्या
भावना बोलून दाखविल्या.
महाराष्ट्र शासनाचा रोजगार व स्वयंरोजगार विभाग,
शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, विद्यापीठ कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र आणि युवक कल्याण कक्ष यांच्या
संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कौशल्य मेळावा आयोजित करण्यात आला. विद्यापीठाच्या
लोककला केंद्रात तीसहून अधिक कौशल्य प्रदात्यांनी स्टॉल थाटले होते. त्या
माध्यमातून ८५पेक्षा अधिक विविध कौशल्ये प्रदान करण्याचे नियोजन होते. त्यानुसार
गेल्या दोन दिवसांत सुमारे पाच हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध
कौशल्ये आत्मसात केली. व्यक्तीमत्त्व विकास, मुलाखतीचे तंत्र यांपासून ते अगदी
माहिती तंत्रज्ञान, मनुष्यबळ व्यवस्थापन, ऑनलाइन ॲडव्हर्टायजिंग, एनर्जी टेक्नॉलॉजीपर्यंत
अनेक कौशल्यांचा समावेश यात होता.
समारोप समारंभात स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या
विद्यार्थी भवनच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही या मेळाव्याचा आपल्याला
आत्मविश्वास मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे असे
मेळावे वारंवार आयोजित केले जावेत, अशी अपेक्षाही सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त
केली. कौशल्य प्रदात्यांनीही शिवाजी विद्यापीठाच्या या अभिनव उपक्रमाचे स्वागत
केले आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत राबविण्यात येणाऱ्या विद्यापीठाच्या या उपक्रमांसाठी
आपणही मोफत सेवा प्रदान करण्यास तत्पर राहू, अशी ग्वाही सुद्धा दिली.
डॉ. वासंती रासम यांनी या प्रसंगी
विद्यापीठाच्या या उपक्रमास सर्वांनीच भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
दिले. त्या म्हणाल्या, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे
विद्यार्थ्यांच्या कालसुसंगत गरजा जाणून आहेत. त्यानुसार त्यांच्या प्रोत्साहनातून
रोजगार मेळाव्यांच्या पुढे जाऊन महाराष्ट्रात सर्वप्रथम कौशल्य मेळावा आयोजित
करण्याची संकल्पना त्यांनी मांडली आणि प्रत्यक्षात आणली, ही बाब महत्त्वाची आहे.
विद्यार्थ्यांचे स्कील मॅपिंग करून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचा
कुलगुरूंचा मानस आहे. त्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी समन्वयक डॉ. ए.एम.
गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यासपीठावर डॉ. एस.एस. कोळेकर, सहाय्यक
संचालक सचिन जाधव उपस्थित होते. यशवंत शितोळे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment