कोल्हापूर, दि. १
मार्च: सामाजिक शास्त्रातील संशोधन करीत असताना नियोजनपूर्वक संशोधनाची सुरवात
केल्यास आपणास योग्य ते निष्कर्ष मिळू शकतात. त्यासाठी प्रत्येक संशोधकाने संशोधन
पद्धतीचा अभ्यास योग्य रितीने करायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ व
शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ. द.ना. धनागरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा
समाजशास्त्र अधिविभाग आणि नवी दिल्ली येथील 'इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च' (ICSSR) यांच्या संयुक्त विद्यमाने 'सामाजिक शास्त्रांतील
संशोधन पद्धती' या विषयावर आयोजित दहा दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आर.बी. पाटील होते.
डॉ. धनागरे म्हणाले,
चिकित्सा करण्यामुळेच सामाजिक संशोधन पद्धती विकसित होत जाते. सामाजिक
शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी किंवा संशोधकांनी 'का?'
हा प्रश्न नेहमी विचारून नवनवीन ज्ञानाचा शोध
घ्यायला हवा. नवीन ज्ञान मिळवून त्यांची चिकित्सा करणे हे सामाजिक शास्त्रांतील
संशोधक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. चिकित्सेशिवाय संशोधन हे परिपूर्ण होऊ शकत
नाही.
दुपारच्या सत्रात
डॉ. एस.एम. दहिवले म्हणाले, संशोधनाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारापैकी
आपल्या संशोधन विषयाला कोणचा प्रकार योग्य आहे, याचा विचार करून संशोधकांनी प्रकार
निवडला पाहिजे. यामुळे संशोधनातील होणारा वेळेचा अपव्यय टाळला जाऊ शकतो.
अखेरच्या सत्रात डॉ.
विजय मारुलकर म्हणाले, संशोधनाची सुरवात ही आराखड्याशिवाय करता कामा नये. आराखडा
तयार नसेल तर संशोधकाला काम करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे
आराखडा तयार करूनच संशोधकाने संशोधनाची सुरवात करावी.
यावेळी कायर्शाळेचे
समन्वयक डॉ. जगन कराडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पी.बी. देसाई यांनी आभार
मानले. यावेळी डॉ. आर.एन. साळवे, प्रतिभा पवार, डॉ. प्रल्हाद माने यांच्यासह संशोधक,
विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यशाळा १० मार्चपर्यंत चालणार आहे.
No comments:
Post a Comment