दोन
दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचा समारोप
कोल्हापूर, दि. २
मार्च: सध्या
राज्यातील तसेच देशातील पर्जन्यमान कमालीचे बदललेले आहे, या
परिस्थितीत पारंपरिक पीक पद्धतीवर विसंबून न राहता शेतकर्यांनी बदलत्या
पर्जन्यमानानुरूप पीक पद्धतीत बदल करणे क्रमप्राप्त असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार
तसेच ‘आधुनिक किसान’ साप्ताहिकाचे
संपादक निशिकांत भालेराव यांनी व्यक्त केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागातर्फे 'शेतकऱ्यांची आत्महत्या व
प्रसारमाध्यमांची भूमिका' या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय
परिसंवादाच्या दुसर्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.
वासंती रासम होत्या.
श्री. भालेराव
म्हणाले,
पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदितांनी विषय केन्द्रित पत्रकारिता करणे
काळाची गरज आहे. एखाद्या विषयाबाबत सखोल माहिती जाणून घेऊन, संशोधन करून ती माहिती
वाचकांसमोर मांडणे आवश्यक आहे. कृषी पत्रकारितेच्या क्षेत्रात तरुणांना भरपूर संधी
उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ त्यांनी जरुर घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकर्यांच्या
आत्महत्येचा बाऊ न करता शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य दिले तर ते अधिक
चांगले होईल आणि या कामी माध्यमांची सकारात्मक भूमिका महत्वाची ठरेल, असेही
त्यांनी सांगितले.
शेतकरी आत्महत्येचा
विषय संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज:
विजय जाधव
समारोप कार्यक्रमात बोलताना
ज्येष्ठ पत्रकार व संपादक विजय जाधव यांनी ‘पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्या’ या
विषयावर भाष्य केले. ते म्हणाले, विदर्भाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे
प्रमाण कमी असले तरी समाधान मानायचे कारण नाही. विदर्भातील शेतकरी जात्यात आणि आपण
सुपात आहोत. शाहू महाराजांनी शेतकर्यांसाठी उपयुक्त प्रदर्शने भरवली. दूरदृष्टीने
कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि धरणे बांधली. त्यांच्यानंतर मात्र कुणीच काही केले
नाही. त्यामुळे सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याचा
काही भाग दुष्काळग्रस्त आहे. आत्महत्या हे एक सामाजिक संकट आहे. म्हणूनच
प्रसारमाध्यमांनी सुद्धा संवेदनशीलतेने हा विषय हाताळण्याची गरज असल्याचे मत
त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी वृत्तपत्रविद्या
व संवादशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. निशा पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. लोकमत टाइम्स (नाशिक)चे उपसंपादक नितीन पवार यावेळी
उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. मंगला पाटील-बडदारे यांनी मनोगत व्यक्त केले. जयश्री
देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुमेधा साळुंखे-घाटगे यांनी आभार
मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चंद्रशेखर वानखेडे, सुनील जाधव यांच्यासह
विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment