कोल्हापूर दि.३ मार्च: प्रत्येक मनुष्यात विचारांचे वैविध्यपूर्ण उद्यान असते. त्या विचारांचे
प्रयत्नपूर्वक ज्ञानात रुपांतर करून कृतीशीलपणे ते
प्रत्यक्षात आणले पाहिजेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र अधिविभाग, गार्डन्स क्लब, इंडियन वूमन सायंटिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने 'उद्यान आणि विज्ञान' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या निलांबरी सभागृहात कार्यशाळा झाली.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञान आहे. लिड बॉटॅनिकल गार्डनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठासारखे मोठे मंच उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मुलांना काही क्षण निसर्गाच्या सान्निध्यात राहून जैवविविधितेची माहिती घेणे शक्य झाले आहे. या कार्यशाळेमधील कल्पकता घेवून प्रत्येक मुलाने घरी उद्यान बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. उद्याने आपल्यासाठी आदर्श मार्गदर्शक ठरु शकतात. वेगवेगळ्या समाजातील प्रश्नांना उद्याने समर्पक उत्तरे देऊ शकतात. उद्यानांमध्ये वनस्पती समन्वयाने फुलतात, तर
मानवी सहजीवन परस्पर समन्वयातून का फुलू शकणार नाही, अशी शिकवण उद्याने देतात.
No comments:
Post a Comment