Friday, 11 March 2016

प्रामाणिक बौद्धिक वादविवाद हे बाबासाहेबांच्या चळवळीचे सूत्र: प्रा. अविनाश डोळस



डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक १२५ व्याख्यानांचे विद्यापीठाकडून यशस्वी आयोजन


कोल्हापूर, दि. ११ मार्च: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यातील बहुतेक सर्व लढे, चळवळी या बुद्धीच्या बळावरच जिंकल्या. प्रामाणिक बौद्धिक वादविवाद, चर्चांवर त्यांचा विश्वास होता, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण प्रकाशन समितीचे सदस्य-सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी आज येथे केले.
डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १२५ संलग्नित महाविद्यालयांत सकाळी ११ वाजता एकाच वेळी सुमारे १२५ तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या मालिकेअंतर्गत शिवाजी विद्यापीठात 'डॉ. आंबेडकर व चळवळ' या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डोळस बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
प्रा. डोळस म्हणाले, बौद्धिक, वैचारिक देवाणघेवाणीखेरीज सुसंवाद प्रस्थापित होणे अशक्य आहे, असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. कोणी राजा, नेता किंवा धर्मगुरू नव्हे, तर त्या त्या समाजातील बुद्धीवादी लोकच परिवर्तन घडवून आणण्यास कारणीभूत ठरत असतात, असे ते म्हणत. भ्रष्ट पोटार्थी कारणांसाठी बुद्धीवादाचा वापर केल्यास त्यातून भ्रष्ट व्यवस्थाच जन्माला येते. त्यामुळे मानव कल्याणाचा विचार करणाऱ्या प्रामाणिक बुद्धीवादाची समाजाला नित्य गरज असते कारण त्यातून समतेच्या विचारांची रुजवात शक्य असते, असे त्यांचे मत होते. या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावरच केवळ एका भाषणामुळेच बाबासाहेबांचे घटना समितीमधील स्थान पक्के झाले, हा इतिहास आहे.
डॉ. आंबेडकरांची चळवळ ही कधीही प्रतिक्रियावादी नव्हती, असे सांगून प्रा. डोळस म्हणाले, बाबासाहेब त्यांच्या चिंतनातून आणि कार्यातून या व्यवस्थेपुढे प्रश्न उपस्थित करत आणि त्यांची उत्तरे समाजाला द्यायला भाग पाडत. या प्रतिक्रियांतून बाबासाहेबांना प्रबोधनाची अपेक्षा असे. या वादविवादांमधूल विचारांचा विस्तार व्हावा आणि दुसऱ्यांना समजून घेण्याच्या प्रक्रियेची निर्मिती व्हावी, असा त्यांचा विचारमंथन घडवून आणण्यामागे हेतू असे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात वादविवादांना मोठे महत्त्व आहे. या वादविवादाला बौद्ध धम्माची परंपरा तर आहेच, शिवाय, संसदीय लोकशाही पद्धतीत विरोधी पक्ष ठेवण्यामागेही निकोप लोकशाहीच्या निर्मितीचा हेतू असल्याचेच आपल्या निदर्शनास येईल.
कोणत्याही समस्येचा राष्ट्रीय भावनेच्या दृष्टीकोनातून वेध घेणारे बाबासाहेब हे महान व्यक्ती असल्याचे सांगून प्रा. डोळस म्हणाले, भारत- पाकिस्तान फाळणीच्या संदर्भात सैद्धांतिक मांडणी करणारे डॉ. आंबेडकर एकमेव व्यक्ती होते. त्यांच्या या मांडणीमुळेच फाळणीच्या प्रक्रियेला दिशा मिळू शकली. भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्येही त्यांनी भारतातील विविध भाषा, प्रांत, संस्कृती यांचा सखोल अभ्यास करून समावेश केला. ईशान्य भारतीय राज्यांतील नागरिकांची जमातींमध्ये गणना करून ते भारताचा अविभाज्य घटक राहतील, याची तजवीजही बाबासाहेबांनी मोठ्या कौशल्याने केली.
आज एक राष्ट्र म्हणून आपण एकत्र असण्याला एकच आधार आहे, तो म्हणजे भारताचे संविधान, असे सांगून प्रा. डोळस पुढे म्हणाले, समता, बंधुता, सामाजिक न्याय, व्यक्तीस्वातंत्र्य आदी मानवी मूल्यांचा संविधानात बाबासाहेबांनी समावेश केला. या मूल्यांना व्यक्तीगत पातळीवर मानणारे काही उदारमतवादी नेतेही होते, तथापि, त्यांना मानणारा समूह अस्तित्वात नसणे हा बाबासाहेबांच्यासमोरील मोठा प्रश्न होता. त्यामुळे बौद्ध धम्माच्या स्वीकारातून त्यांनी या मूळ बौद्ध तत्त्वज्ञानाचा जीवनमूल्य म्हणून अंगिकार करणारा समूह निर्माण केला. धम्म म्हणजे नैतिकता या मूल्याचा आग्रह धरणारा समाज बाबासाहेबांनी दिला, हे भारतीय लोकशाही टिकण्यासाठी त्यांनी दिलेले मोठे योगदान आहे. जेव्हाही या देशासमोर बौद्धिक कसोटीचा क्षण उभा ठाकतो, तेव्हा संदर्भ म्हणून बाबासाहेबच सामोरे येतात, असेही ते म्हणाले.
धर्म, जात यांच्या भेदांवर नव्हे, तर समताधिष्ठित नवसमाज निर्मितीचा आग्रह धरणाऱ्या बाबासाहेबांच्या कार्यामागे लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन सामाजिक समता प्रतिष्ठापनेचे सूत्र होते. त्याचप्रमाणे अडाणी माणसालाही लोकशाही प्रक्रियेत स्थान व मूल्य प्राप्त करून देण्याचे श्रेयही बाबासाहेबांचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महात्मा फुले यांच्याबरोबरीने राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव महाराज यांच्या उल्लेखाखेरीज सामाजिक चळवळींचा इतिहास अपूर्ण असल्याची भावनाही प्रा. डोळस यांनी व्यक्त केली.
यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी ज्या कौशल्याने लवचिक संविधानाची निर्मिती केली, त्यामुळेच ही लोकशाही टिकून आहे. भारतीय समाज त्यांच्या प्रती सदैव कृतज्ञ राहील. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्यामधील अनोख्या स्नेहपूर्ण पैलूंचाही त्यांनी आपल्या भाषणात वेध घेतला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. आंबेडकर यांना कितीही विशेषणे-उपमा देण्यात येत असल्या तरी 'बाबासाहेब' हे संबोधन माझ्यासारख्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाशी अधिक जवळचे आहे. बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान, ओळख आणि अस्तित्वाची जाणीव प्रदान केली. बाबासाहेबांच्या नवसमाजरचनावादाची आता विज्ञानाच्या आधारावर नव्याने मांडणी करणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या मते, जात ही आपली 'ब्लडलाइन' असते; तथापि, आपण तिला 'बॅटल-लाइन' बनविली आहे. संविधानाचा प्रामाणिक अंगिकार हा त्यावरचा एकच उपाय आहे. या देशाचा संविधान हा एकच ग्रंथ असला पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. कृष्णा किरवले यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. आंबेडकर आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. सुस्मिता खुटाळे, कोमल खैरमोडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्याख्यान मालिका उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक
महामानवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अभिनव उपक्रम, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाने डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आज एकाच वेळी १२५ महाविद्यालयांत १२५ तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्याच्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी कुलगुरू डॉ. शिंदे यांचे मी अभिनंदन करतो, असे प्रा. अविनाश डोळस म्हणाले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनीही विद्यापीठाचा हा एकमेवाद्वितिय उपक्रम असून त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली, याबद्दल समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment