Showing posts with label Rajarshi Shahu Maharaj. Show all posts
Showing posts with label Rajarshi Shahu Maharaj. Show all posts

Thursday, 16 March 2023

राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषद (दिवस दुसरा):

ब्राह्मणेतर चळवळीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर व्यापक प्रभाव: डॉ. अशोक चौसाळकर

 


शिवाजी विद्यापीठात आयोजित राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेत बोलताना डॉ. अशोक चौसाळकर


कोल्हापूर, दि. १६ मार्च: राजर्षी शाहू महाराज यांनी सत्यशोधक चळवळीला मोठे बळ दिले. तिच्या व्यापक आधारावरच पुढे ब्राह्मणेतर चळवळ गतीने फोफावली आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर तिने मोठा प्रभाव टाकला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि शाहू संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेमध्ये आज दुसऱ्या दिवशी शाहू महाराज आणि ब्राह्मणेतर चळवळ या विषयावर ते बोलत होते. खासदार भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार प्रमुख उपस्थित होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराज मधुकर वृत्तीचे होते. चांगल्या बाबी समजून घेऊन त्यांना पाठिंबा देण्यात ते अग्रेसर असत. त्यातूनच त्यांनी सावित्रीबाई फुले व यशवंतराव फुले यांच्या माघारी काहीशा थंडावलेल्या सत्यशोधक चळवळीस पाठिंबा देऊन तिचे पुनरुज्जीवन केले. जेव्हा एखाद्या चळवळीला बळ मिळते, तेव्हा स्वभावतःच ती राजकीय वळण घेते, याची जाणीव महाराजांना होती. म्हणून तत्कालीन घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराजांनीही राजकारणात मोठी चळवळ आरंभली. १९१७ साली ते त्यासाठी भारतमंत्री माँटेग्यू यांना भेटले. मराठा समाजासाठी त्यांनी दहा वर्षांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली. शाहू महाराजांनी मराठा हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने वापरला. त्यामध्ये त्यांना मराठ्यांसह अस्पृश्य-मागासवर्गीय समाज तसेच इतर मागासवर्गीय समाजही अभिप्रेत होता. त्यांच्या सामाजिक-राजकीय विकासासाठी विशेष सवलती देण्याची आग्रही मागणी शाहू महाराजांनी मुंबईचे गव्हर्नर सिडनेहॅम यांच्याकडेही केली होती. ब्राह्मणेतर पक्षाला सर्वोतोपरी मदतीचे धोरण त्यांनी स्वीकारले होते. ब्राह्मणेतर वृत्तपत्रे, सत्यशोधक जलसे यांना सातत्याने सामाजिक प्रबोधनाच्या कार्यासाठी महाराजांनी प्रेरित केले. ब्राह्मणेतर पक्षामध्ये उमद्या नेतृत्वाच्या विकासालाही त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यातूनच भास्करराव जाधव, आण्णासाहेब लठ्ठे असे नेते उदयास आले. एवढेच नव्हे, तर महाराजांच्या अकाली निधनामुळे पोरक्या झालेल्या ब्राह्मणेतर चळवळीला आपल्या नेतृत्वाने सावरण्याचे काम करणाऱ्या जेधे-जवळकरांनाही शाहू महाराजांचीच प्रेरणा होती. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीच्या वृद्धीसाठी आवश्यक असणारी व्यापक सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी निर्माण करण्याचे महत्कार्य शाहू महाराजांनी केले.

डॉ. चौसाळकर पुढे म्हणाले, सन १९२०मध्ये गांधीजींनी पुकारलेल्या असहकार चळवळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रांतिक निवडणुकीत ब्राह्मणेतर पक्षाने काँग्रेसच्या अनुपस्थितीत १११ पैकी १६ जागा जिंकल्या. १९२३मध्येही त्यांनी १३ जागा जिंकल्या. मात्र, शाहू महाराजांच्या माघारी ब्राह्मणेतर पक्षात मराठा व मराठेतर असा भेट सुरू झाल्याने सत्यशोधक त्यापासून दुरावले. त्यामुळे प्रत्येक सत्यशोधक ब्राह्मणेतर पक्षाचा, मात्र, ब्राह्मणेतर पक्षाचा प्रत्येक सभासद सत्यशोधक असेलच, असे नाही, असे चित्र निर्माण झाले. तथापि, जेधे-जवळकरांनी ब्राह्मणेतर पक्षाची प्रागतिक प्रतिमा उचलून धरल्याने चळवळ पुढे जात राहिली. त्या काळात डाव्या चळवळीचे अस्तित्व नव्हते, मात्र ब्राह्मणेतर पक्षाने डाव्यांची भूमिका नेटाने निभावली आणि शेतकरी, कामगारांचे प्रश्न हिरीरीने मांडले व धसास लावले. १९३२मध्ये जवळकरांनी इंग्लंड दौरा केला. तेथून परतल्यानंतर त्यांनी क्रांतीचे रणशिंग हे पुस्तक लिहीले. त्यामध्ये त्यांनी लेनिनवादी समाजवादाचा पुरस्कार केल्याचे दिसते. हे एक वेगळे वळण दिसते. त्यामुळे सत्यशोधक चळवळीचा समाजवादाकडे प्रवास तेथून सुरू झाला. पुढे १९४८मध्ये स्थान झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या तत्त्वांमध्ये सत्यशोधक, ब्राह्मणेतर पक्षाचाच गाभा दिसून येतो. हे प्रवाह पाहात असलेल्या काँग्रेसनेही १९३६च्या फैजपूर अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. एकूणात आजही महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय पटलावर अशा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपामध्ये सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीचे अस्तित्व असल्याचे दिसून येते, असेही चौसाळकर म्हणाले.

यावेळी डॉ. प्रकाश पवार यांनी परिचय करून दिला व आभार मानले.

 

Wednesday, 20 March 2019

माणगाव परिषद शताब्दीनिमित्त विद्यापीठातर्फे वर्षभर विविध उपक्रम: प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के



शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे माणगाव परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभ प्रसंगी राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. यावेळी (डावीकडून) आलोक जत्राटकर, जयसिंग पाटील, डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे, आनंद खामकर आदी.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे माणगाव परिषदेच्या शताब्दी वर्षाचे औपचारिक उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून)  प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. श्रीकृष्ण महाजन.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे माणगाव परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभ प्रसंगी बोलताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. श्रीकृष्ण महाजन.

कोल्हापूर, दि. २० मार्च: माणगाव येथील ऐतिहासिक परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठासह माणगाव येथेही विविध उपक्रम राबविण्यात येतील, अशी घोषणा प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केली.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने माणगाव परिषद शताब्दी वर्षाचे औपचारिक उद्घाटन आज प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे प्रमुख उपस्थित होते.
Dr. D.T. Shirke
डॉ. शिर्के म्हणाले, माणगाव परिषद ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या स्नेहबंध निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या दोघांचे परस्परसंबंध, मैत्रभाव दर्शविणारी कागदपत्रे, पत्रे, छायाचित्रे आदींचे संकलन करण्याबरोबरच संशोधन, चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित करण्यात यावीत. माणगाव परिषदेत जे महत्त्वाचे ठराव करण्यात आले, त्यासंदर्भात गेल्या शंभर वर्षांत आपण किती प्रगती केली, याचाही संशोधकीय धांडोळा केंद्राच्या वतीने घेण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आलोक जत्राटकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे स्नेहबंध या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, बाबासाहेब आणि शाहू महाराज यांचा एकमेकांशी परिचय झाल्यानंतर अवघ्या तीनेक वर्षांत महाराजांचे निधन झाले. तथापि, लंडनला उर्वरित विद्याभ्यास पूर्ण करण्यास जाईपर्यंत अवघे काही महिने प्रत्यक्ष आणि त्यानंतर त्यांच्या निधनापर्यंत पत्रव्यवहाराद्वारे अप्रत्यक्ष संवाद कायम राहिला. 
Alok Jatratkar
त्या दोघांमध्ये एकमेकांप्रती निर्माण झालेला मैत्रभावाचा ओलावा त्यांच्या पत्रव्यवहारातून पाहायला मिळतो. माणगाव येथे २१-२२ मार्च १९२० रोजी बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेली दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृतांची पहिली परिषद आणि त्यानंतर ३०-३१ मे १९२० रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेली अखिल भारतीय अस्पृश्य परिषद या दोन परिषदा या दोघांचे विचार व स्नेहसंबंध समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बाबासाहेबांना मूकनायक सुरू करण्यासाठी त्या काळात सुमारे २५०० रुपयांची देणगी देणे असो की, लंडनला रवाना होत असताना त्यांना दिलेला १५०० रुपयांचा निधी असो, या घटना म्हणजे शाहू महाराजांचे त्यांच्यावरील प्रेम दर्शविणाऱ्या आणि त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षाच व्यक्त करणाऱ्या आहेत. भारताच्या सामाजिक चळवळीला या दोन व्यक्तीमत्त्वांनी प्रदान केलेले अधिष्ठान आणि प्रेरणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांचा संशोधकीय अभ्यास होणे नितांत गरजेचे आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. या दोघांच्या स्नेहबंधाच्या अनुषंगाने ध्वनीचित्रफीतीचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.)ग.गो. जाधव अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. रत्नाकर पंडित, ज्येष्ठ पत्रकार-संपादक जयसिंग पाटील, डॉ. सर्जेराव पद्माकर, कास्ट्राईबचे आनंद खामकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Dr. S.S. Mahajan
माणगाव परिषदेबाबत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने माणगाव परिषदेबाबत कागदपत्रे, छायाचित्रे, आठवणी यांचे संकन करण्याचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून ज्यांच्याकडे त्या संदर्भातील कागदपत्रे असतील, त्यांनी ती केंद्राकडे सुपूर्द करावीत, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले आहे.

शताब्दीनिमित्त पहिले व्याख्यान शनिवारी
माणगाव परिषदेच्या शताब्दीच्या निमित्ताने आंबेडकर केंद्राच्या वतीने वर्षभरात विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मालेतील पहिले पुष्प प्रा. विनय कांबळे गुंफणार आहेत. माणगाव परिषद आणि तिचे सामाजिक राजकीय संदर्भ या विषयावर प्रा. कांबळे यांचे व्याख्यान येत्या शनिवारी (दि. २३ मार्च) सकाळी १०.३० वाजता केंद्रात आयोजित करण्यात आले असून अध्यक्षस्थानी संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन असतील.


Friday, 11 March 2016

प्रामाणिक बौद्धिक वादविवाद हे बाबासाहेबांच्या चळवळीचे सूत्र: प्रा. अविनाश डोळस



डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक १२५ व्याख्यानांचे विद्यापीठाकडून यशस्वी आयोजन


कोल्हापूर, दि. ११ मार्च: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यातील बहुतेक सर्व लढे, चळवळी या बुद्धीच्या बळावरच जिंकल्या. प्रामाणिक बौद्धिक वादविवाद, चर्चांवर त्यांचा विश्वास होता, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण प्रकाशन समितीचे सदस्य-सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी आज येथे केले.
डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १२५ संलग्नित महाविद्यालयांत सकाळी ११ वाजता एकाच वेळी सुमारे १२५ तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या मालिकेअंतर्गत शिवाजी विद्यापीठात 'डॉ. आंबेडकर व चळवळ' या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डोळस बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
प्रा. डोळस म्हणाले, बौद्धिक, वैचारिक देवाणघेवाणीखेरीज सुसंवाद प्रस्थापित होणे अशक्य आहे, असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. कोणी राजा, नेता किंवा धर्मगुरू नव्हे, तर त्या त्या समाजातील बुद्धीवादी लोकच परिवर्तन घडवून आणण्यास कारणीभूत ठरत असतात, असे ते म्हणत. भ्रष्ट पोटार्थी कारणांसाठी बुद्धीवादाचा वापर केल्यास त्यातून भ्रष्ट व्यवस्थाच जन्माला येते. त्यामुळे मानव कल्याणाचा विचार करणाऱ्या प्रामाणिक बुद्धीवादाची समाजाला नित्य गरज असते कारण त्यातून समतेच्या विचारांची रुजवात शक्य असते, असे त्यांचे मत होते. या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावरच केवळ एका भाषणामुळेच बाबासाहेबांचे घटना समितीमधील स्थान पक्के झाले, हा इतिहास आहे.
डॉ. आंबेडकरांची चळवळ ही कधीही प्रतिक्रियावादी नव्हती, असे सांगून प्रा. डोळस म्हणाले, बाबासाहेब त्यांच्या चिंतनातून आणि कार्यातून या व्यवस्थेपुढे प्रश्न उपस्थित करत आणि त्यांची उत्तरे समाजाला द्यायला भाग पाडत. या प्रतिक्रियांतून बाबासाहेबांना प्रबोधनाची अपेक्षा असे. या वादविवादांमधूल विचारांचा विस्तार व्हावा आणि दुसऱ्यांना समजून घेण्याच्या प्रक्रियेची निर्मिती व्हावी, असा त्यांचा विचारमंथन घडवून आणण्यामागे हेतू असे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात वादविवादांना मोठे महत्त्व आहे. या वादविवादाला बौद्ध धम्माची परंपरा तर आहेच, शिवाय, संसदीय लोकशाही पद्धतीत विरोधी पक्ष ठेवण्यामागेही निकोप लोकशाहीच्या निर्मितीचा हेतू असल्याचेच आपल्या निदर्शनास येईल.
कोणत्याही समस्येचा राष्ट्रीय भावनेच्या दृष्टीकोनातून वेध घेणारे बाबासाहेब हे महान व्यक्ती असल्याचे सांगून प्रा. डोळस म्हणाले, भारत- पाकिस्तान फाळणीच्या संदर्भात सैद्धांतिक मांडणी करणारे डॉ. आंबेडकर एकमेव व्यक्ती होते. त्यांच्या या मांडणीमुळेच फाळणीच्या प्रक्रियेला दिशा मिळू शकली. भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्येही त्यांनी भारतातील विविध भाषा, प्रांत, संस्कृती यांचा सखोल अभ्यास करून समावेश केला. ईशान्य भारतीय राज्यांतील नागरिकांची जमातींमध्ये गणना करून ते भारताचा अविभाज्य घटक राहतील, याची तजवीजही बाबासाहेबांनी मोठ्या कौशल्याने केली.
आज एक राष्ट्र म्हणून आपण एकत्र असण्याला एकच आधार आहे, तो म्हणजे भारताचे संविधान, असे सांगून प्रा. डोळस पुढे म्हणाले, समता, बंधुता, सामाजिक न्याय, व्यक्तीस्वातंत्र्य आदी मानवी मूल्यांचा संविधानात बाबासाहेबांनी समावेश केला. या मूल्यांना व्यक्तीगत पातळीवर मानणारे काही उदारमतवादी नेतेही होते, तथापि, त्यांना मानणारा समूह अस्तित्वात नसणे हा बाबासाहेबांच्यासमोरील मोठा प्रश्न होता. त्यामुळे बौद्ध धम्माच्या स्वीकारातून त्यांनी या मूळ बौद्ध तत्त्वज्ञानाचा जीवनमूल्य म्हणून अंगिकार करणारा समूह निर्माण केला. धम्म म्हणजे नैतिकता या मूल्याचा आग्रह धरणारा समाज बाबासाहेबांनी दिला, हे भारतीय लोकशाही टिकण्यासाठी त्यांनी दिलेले मोठे योगदान आहे. जेव्हाही या देशासमोर बौद्धिक कसोटीचा क्षण उभा ठाकतो, तेव्हा संदर्भ म्हणून बाबासाहेबच सामोरे येतात, असेही ते म्हणाले.
धर्म, जात यांच्या भेदांवर नव्हे, तर समताधिष्ठित नवसमाज निर्मितीचा आग्रह धरणाऱ्या बाबासाहेबांच्या कार्यामागे लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन सामाजिक समता प्रतिष्ठापनेचे सूत्र होते. त्याचप्रमाणे अडाणी माणसालाही लोकशाही प्रक्रियेत स्थान व मूल्य प्राप्त करून देण्याचे श्रेयही बाबासाहेबांचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महात्मा फुले यांच्याबरोबरीने राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव महाराज यांच्या उल्लेखाखेरीज सामाजिक चळवळींचा इतिहास अपूर्ण असल्याची भावनाही प्रा. डोळस यांनी व्यक्त केली.
यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी ज्या कौशल्याने लवचिक संविधानाची निर्मिती केली, त्यामुळेच ही लोकशाही टिकून आहे. भारतीय समाज त्यांच्या प्रती सदैव कृतज्ञ राहील. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्यामधील अनोख्या स्नेहपूर्ण पैलूंचाही त्यांनी आपल्या भाषणात वेध घेतला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. आंबेडकर यांना कितीही विशेषणे-उपमा देण्यात येत असल्या तरी 'बाबासाहेब' हे संबोधन माझ्यासारख्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाशी अधिक जवळचे आहे. बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान, ओळख आणि अस्तित्वाची जाणीव प्रदान केली. बाबासाहेबांच्या नवसमाजरचनावादाची आता विज्ञानाच्या आधारावर नव्याने मांडणी करणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या मते, जात ही आपली 'ब्लडलाइन' असते; तथापि, आपण तिला 'बॅटल-लाइन' बनविली आहे. संविधानाचा प्रामाणिक अंगिकार हा त्यावरचा एकच उपाय आहे. या देशाचा संविधान हा एकच ग्रंथ असला पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. कृष्णा किरवले यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. आंबेडकर आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. सुस्मिता खुटाळे, कोमल खैरमोडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्याख्यान मालिका उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक
महामानवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अभिनव उपक्रम, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाने डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आज एकाच वेळी १२५ महाविद्यालयांत १२५ तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्याच्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी कुलगुरू डॉ. शिंदे यांचे मी अभिनंदन करतो, असे प्रा. अविनाश डोळस म्हणाले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनीही विद्यापीठाचा हा एकमेवाद्वितिय उपक्रम असून त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली, याबद्दल समाधान व्यक्त केले.