समृद्ध जीवनासाठी महत्त्वाचे साधन म्हणजे कौशल्य
-कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
कोल्हापूर, दि. २ मार्च: समृद्ध जीवन जगण्यासाठी
आवश्यक असणारे महत्त्वाचे साधन म्हणजे कौशल्य होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी
कौशल्य प्राप्ती करून घेऊन जीवनात यश मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासनाचा रोजगार
व स्वयंरोजगार विभाग, शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र,
विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र आणि युवक
कल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कौशल्य
मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू
समागृहात झालेल्या या कार्यक्रमास राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या
पुणे विभागीय कार्यालयाचे उपसंचालक दिलीप पवार प्रमुख उपस्थित
होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले,
कौशल्य विकास आणि रोजगार संधींची उपलब्धता अशा दुहेरी पातळ्यांवर विद्यार्थ्यांना
पाठबळ देण्याचा हेतू या कौशल्य मेळाव्याच्या आयोजनामागे आहे. प्रत्येक
विद्यार्थ्यामध्ये काही सुप्त कला-कौशल्ये असतात. केवळ त्यांची जाणीव होणे गरजेचे
असते. त्यांना पूरक आणि अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक कौशल्ये या मेळाव्यातून
आपल्याला प्राप्त व्हावीत आणि विविध व्यवसाय-उद्योगांमधून काम करण्याची संधी आपणास
मिळावी, प्रेरणा मिळावी, या दृष्टीने हा मेळावा उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
मेळाव्यास मोठ्या संख्येने
उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींचा संदर्भ देऊन कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले,
मेळाव्यास मुलींचे लक्षणीय प्रमाण स्वागतार्ह आहे. उपलब्ध संसाधनांमध्ये उत्कृष्ट
व्यवस्थापन करण्याचे कौशल्य महिलांमध्ये उपजतच असते. गृहिणी असणाऱ्या
महिलांमध्येही अनेक कौशल्ये असतात. त्या कौशल्यांच्या बळावर संपूर्ण घराच्या
कामकाजाचे त्या उत्तम पद्धतीने व्यवस्थापन करत असतात. त्याचा शिक्षणाची आणि तीव्र
इच्छाशक्तीची जोड दिल्यास ही कौशल्ये अर्थार्जनाचेही उपयुक्त साधन बनू शकतात.
यावेळी महाराष्ट्रातील कोणत्याही
विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात आलेला हा पहिला कौशल्य मेळावा असून त्याबद्दल
शिवाजी विद्यापीठ अभिनंदनास पात्र असल्याचे सांगून उपसंचालक दिलीप पवार म्हणाले, सन
२०२२मध्ये भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होताहेत. त्यावेळी भारताचे सरासरी
आयुर्मान २८ वर्षे असेल. त्यामुळे तरुणांना योग्य मार्ग व संधी उपलब्ध करून
देण्यासाठी कौशल्य विकासाची अत्यंत आवश्यकता लक्षात घेऊन मेळावे आयोजनास प्राधान्य
देण्यात येत आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनातर्फे स्कील मॅपिंग, मॉड्युलर
एम्पलॉयमेंट स्कीम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य विकास
योजना, करिअर गायडन्स कौन्सिलिंग सेंटर तसेच रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यांचेही
प्रभावीपणे आयोजन करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कौशल्य मेळाव्यासाठी
सुमारे २५००हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली असून त्यांना दोन
दिवसांत ८५हून अधिक कौशल्ये घेता येणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाच्या लोककला
केंद्रात साठहून अधिक कौशल्य प्रदात्यांनी स्टॉल उभारले आहेत, अशी माहिती
मेळाव्याचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी यावेळी प्रास्ताविकात दिली.
परीक्षा नियंत्रक महेश
काकडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. डॉ. एस.एस. कोळेकर यांनी आभार मानले.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले,
सहाय्यक संचालक सचिन जाधव, डॉ. सुरेश शिखरे, यशवंत शितोळे उपस्थित होते.
व्हेकेशन स्कील कार्डचे वितरण
कौशल्य मेळाव्यास उपस्थित
असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या युवक कल्याण कक्षातर्फे व्हेकेशन स्कील
कार्ड प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्ड वितरणाचा प्रारंभही कुलगुरू डॉ. शिंदे
यांच्या हस्ते झाला. या स्कील कार्डधारक विद्यार्थ्याला पुढील सहा महिन्यांत
वाहनचालक प्रशिक्षण वगळता उर्वरित सर्व कोर्सेस पूर्णपणे मोफत शिकविले जाणार आहेत.
प्रवेश संख्या मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम या पद्धतीने व्हेकेशन
स्कील कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment