कोल्हापूर, दि.४ मार्च: भारतीय विद्यार्थ्यांना युरोपमध्ये शिक्षण घेण्याची, संशोधन करण्याची प्रचंड संधी उपलब्ध असून या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन युरॅक्सेस
लिंक्सच्या श्रीमती ॲनेस्थी ब्राव्हो यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य कक्षाच्या माध्यमातून 'युरोपमधील संशोधनाची संधी' या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात
आली. याअंतर्गत श्रीमती ॲनेत्झ ब्राव्हो यांची पदव्युत्तर विद्यार्थी आणि संशोधक व शिक्षक यांच्यासाठी दोन स्वतंत्र
व्याख्याने झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी होते.
श्रीमती ब्राव्हो म्हणाल्या, युरोपियन संशोधकांसोबत येथील संशोधकांना काम करण्याची संधी निश्चितपणे आहे. युरॅक्सेस नेटवर्क जगातील अन्य संशोधकांसोबत कार्य करण्याची संधी उपलब्ध करुन देते. शिक्षणाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी याद्वारे उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधकांना सामंजस्य कराराअंतर्गत शिक्षणाची सुवर्णसंधी विनामोबदला उपलब्ध होणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांना युरोपमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण अगदी सहजतेने उपलब्ध होते आहे. तुम्हाला युरोपमधील भाषा येणे फारसे महत्वाचे नाही, तथापि, अभ्यासक्रम इंग्रजीतून असल्याने इंग्रजी भाषा अवगत असणे मात्र आवश्यक आहे. युरोपमधील स्थानिक भाषा शिकण्यासाठी छोटे छोटे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या ठिकाणची जादाची माहिती आपणास उपलब्ध होऊ शकते. युरोपमधून भारतात परतण्यास सहा ते आठ तास लागतात, त्यामुळे आपण घरापासून खूप दूर आहोत, असे वाटत नाही. युरोपियन रिसर्च कौन्सिल यांनी संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करुन दिलेले आहे. संशोधनानंतर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहे. क्रेडिट मोबिलिटीसारखे उपक्रमही विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात. त्यांचाही लाभ विद्यार्थी घेऊ
शकतात.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, युरोपियन युनियनने असे धोरण निश्चित केले आहे की, मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक स्तरावर संशोधक तयार व्हावेत. विद्यार्थ्यांमधील, शिक्षकांमधील संशोधन वृत्ती वाढावी, यासाठी प्रयत्न चालू आहेत. संशोधकांना कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही तर, त्यांना फक्त संशोधनासाठी कष्ट घ्यावे लागतात; जेणे करुन समाजाची उन्नती होईल. या द्वारे आपल्या संशोधकांना मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठ नोडल एजन्सी होण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपल्या विद्यापीठातील मुले अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिकपणे संशोधन करतात. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना आंतराष्ट्रीय पातळीवरील उच्च दर्जाच्या विद्यापीठांची दारे खुली झालेली आहेत. पद्व्युत्तर विद्यार्थी, पीएच.डी. करणारे संशोधक, शिक्षक यांना दोन महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत परदेशी विद्यापीठांमध्ये संशोधनाची संधी उपलब्ध आहेत.
प्रा.डॉ.सी.डी. लोखंडे यांनी प्रास्ताविक व परिचय
करून दिला. प्रा. ए.एम. गुरव यांनी आभार मानले. प्रा. ए.व्ही.घुले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. विद्यार्थी, विद्यार्थिनी, संशोधक, प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.
श्रीमती ॲनेस्थी ब्राव्हो यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.
No comments:
Post a Comment