कोल्हापूर दि. २ मार्च: आयुष्यात जलद गतीने यश संपादन करावयाचे असेल तर उत्तम विक्रेता बना. त्यासाठी डोअर टू डोअर मार्केटींग हे जगातील उत्तम विद्यापीठ ठरणार आहे, असे प्रतिपादन पुणे येथील चकोर गांधी यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र आणि युवक कल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौशल्य मेळाव्यात दुपारच्या सत्रात 'उद्योग संवाद आणि उद्योजकता' या विषयावर पुणे येथील उद्योजकतेबद्दल व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या चकोर गांधी यांचे व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाले.
श्री. गांधी म्हणाले, ज्या कंपनीमध्ये रोजगार शोधणार आहात, त्या कंपनीची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
आज रोजगाराच्या अनंत संधी उपलब्ध आहेत. त्या प्रत्येकाने आपल्या कौशल्याने हेरल्या पाहिजेत. आपले कान, डोळे उघडे ठेवून मार्केटचा अभ्यास करा. त्यातील संधीचा निश्चित शोध घ्या. कार्यालयामध्ये किमान पगारात नोकरीसाठी सगळेच इच्छुक असतात. परंतु, मार्केटींगमध्ये प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याची प्रचंड संधी व मोठे मानधन उपलब्ध असूनही त्याकडे पाहिले जात नाही. स्वत:मधील योग्य गुण ओळखून त्याला योग्य वाट उपलब्ध करणे आवश्यक आहे. इंटरनेटमुळे संपूर्ण जगाचे मार्केट उपलब्ध झालेले आहे, त्याचा अभ्यास करा आणि संधी शोधा. आज जगामध्ये पैसे उपलब्ध करुन देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सजगतेने प्रयत्न करा. त्यांना उत्तम गुण असणाऱ्या उमेदवारांची नितांत गरज आहे. या पिढीसाठी येणारा काळ सुवर्णकाळ आहे. छोट्या छोट्या प्रयोगांतून यश संपादन करा. त्यासाठी आपल्याकडे जिद्द, वेगळेपण व कॅलक्युलेटेड धोका पत्करण्याची तयारी पाहिजे.
विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment