Friday, 7 March 2025

भारतीय विद्यार्थ्यांनी पौर्वात्याभिमुख व्हावे: चीनी कॉन्सुल जनरल काँग झिन्हुआ

शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी साधला संवाद

शिवाजी विद्यापीठ आणि चीनमधील विद्यापीठे यांच्यात सहकार्यवृद्धीबाबत मुंबईतील चीनचे कौन्सुल जनरल काँग झिन्हुआ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा झाली.

शिवाजी विद्यापीठ आणि चीनमधील विद्यापीठे यांच्यात सहकार्यवृद्धीबाबत मुंबईतील चीनचे कौन्सुल जनरल काँग झिन्हुआ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिवाजी विद्यापीठास भेट दिली. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत चीनी शिष्टमंडळ आणि विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक

मुंबईतील चीनचे कौन्सुल जनरल काँग झिन्हुआ यांनी चीनमधील शैक्षणिक, संशोधकीय आणि रोजगार संधी या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मुंबईतील चीनचे कौन्सुल जनरल काँग झिन्हुआ यांनी चीनमधील शैक्षणिक, संशोधकीय आणि रोजगार संधी या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मंचावर डॉ. सागर डेळेकर, दिल्लीतील चीनी दूतावासाचे शैक्षणिक कौन्सेलर यांग झिहुआ, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. सुधींद्र कुलकर्णी आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवादानंतर विद्यार्थ्यांसमवेत मुंबईतील चीनचे कौन्सुल जनरल काँग झिन्हुआ, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह चीनी शिष्टमंडळ आणि विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी.


(शिवाजी विद्यापीठास चीनी शिष्टमंडळाची भेट- व्हिडिओ)

कोल्हापूर, दि. ७ मार्च: जागतिक पातळीवर चीन आज उच्चशिक्षणासह अनेक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी आता पाश्चिमात्य राष्ट्रांऐवजी या पौर्वात्य राष्ट्राला पसंती द्यावी, असे आवाहन चीनचे मुंबईतील कॉन्सुल जनरल काँग झिन्हुआ यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात विद्यार्थ्यांसमवेत आयोजित खुल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

श्री. झिन्हुआ यांनी चीनने नजीकच्या कालखंडात विविध क्षेत्रांत साधलेल्या प्रगतीविषयी तसेच तेथील शैक्षणिक संधी, रोजगार व नोकरीविषयक संधी आदींबाबत विद्यार्थ्यांना सुमारे तासभर सादरीकरण दाखविले. ते म्हणाले, जागतिक पातळीवर उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चीनने ऑटोमेशन, रोबोटिक्स, अत्याधुनिक इलेक्ट्रीक ऑटोमोबाईल्स यांसह कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रांमध्येही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रिअल टाइम डेटा यांच्या सहाय्याने मोठी क्रांती घडविली आहे. मटेरियल सायन्स, रसायनशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांसह सर्वसाधारण जागतिक रँकिंगमध्ये चीनमधील सरासरी आठ विद्यापीठे आहेत. त्यामुळे साधनसुविधा, गुणवत्ता, शैक्षणिक दर्जा यांच्या बाबतीत चीनमधील विद्यापीठे पाश्चिमात्य राष्ट्रांच्या तुलनेत कोठेही कमी नाहीत. त्याचप्रमाणे चीनमध्ये बहुतांश विद्यापीठे शासकीय असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप जरी मिळाली नाही, तरी शिक्षण शुल्क खूपच माफक असल्याने ते परवडते. भाषा आणि खाद्यसवयी याच केवळ त्यामधील अडचणी आहेत. त्यासाठीच आम्ही भारतामध्ये चीनी भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत. त्याचप्रमाणे चीनमध्येही उत्तम भाजीपाला पिकत असून चांगला शाकाहार मिळतो. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांची कोणतीही अडचण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे त्यांनी समाधानही केले.

भारतीय विद्यार्थ्यांना मोठी संधी

या विद्यार्थी संवादापूर्वी व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये शिवाजी विद्यापीठ आणि चीनमधील शैक्षणिक संस्था यांच्यामधील सहकार्य वृद्धीच्या अनुषंगाने दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळांमध्ये तपशीलवार चर्चा झाली. दिल्लीतील चीनी दूतावासाचे शैक्षणिक कौन्सेलर यांग झिहुआ यांनी त्यासंदर्भातील सादरीकरण केले. भारत आणि चीनमधील शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये विद्यार्थी- शिक्षक आदानप्रदान व सहकार्य, सांस्कृतिक व नागरी सहकार्यवृद्धी, दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक साहचर्य व सहकार्य, भारतामध्ये चीनी भाषा व अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रोत्साहन आणि डिजीटल शिक्षणास प्रोत्साहन या पाच सूत्रांच्या आधारे शिवाजी विद्यापीठ आणि चीनमधील उच्चशैक्षणिक संस्थांमध्ये संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि त्याद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन आणि रोजगार यासाठी चीनमध्ये अनेक संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

शाश्वत भागीदारी साकारणे आवश्यक

यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी, शिवाजी विद्यापीठ आणि चीनमधील विविध विद्यापीठांतील संशोधक यांनी मटेरियल सायन्सपासून ते औषधनिर्मितीपर्यंतच्या अनेक शोधप्रकल्पांवर संयुक्तपणे काम केले असून त्यांचे शोधनिबंधही प्रकाशित झाल्याचे आपल्या सादरीकरणात दर्शविले. ते म्हणाले, चीनी दूतावासाने चीनमधील दोन ते तीन विद्यापीठे निवडण्यास शिवाजी विद्यापीठास मदत करावी. त्या विद्यापीठांतील निवडक शिक्षक, संशोधक आणि महाराष्ट्राच्या विद्यापीठांमधील निवडक शिक्षक, संशोधक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ पुढाकार घेईल. त्या बैठकीत भाषिक शिक्षणास प्रोत्साहनापासून ते शैक्षणिक, संशोधकीय आदानप्रदानापर्यंत सर्व प्रकारची चर्चा होऊन ठोस कृतीशील पर्यायांपर्यंत पोहोचता येऊ शकेल. दोन्ही देशांतील विद्यापीठांमध्ये शाश्वत स्वरुपाची भागीदारी आकारास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि डॉ. सागर डेळेकर यांनी सादरीकरण केले आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. प्रख्यात राजनितीज्ञ डॉ. सुधींद्र कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार, संपादक डॉ. श्रीराम पवार यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये चीनी शिष्टमंडळातर्फे मुंबई चीनी कॉन्सुलेटचे वाणिज्य कौन्सेलर झँग हाँगयू, सहकौन्सुल झिआँग फँगझिंग व श्रीमती पॅन झिवॅई, चीनी दुतावासाचे प्रथम सचिव फू झिआनफेंग यांनी आणि शिवाजी विद्यापीठातर्फे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी सहभाग घेतला. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय समन्वय कक्षाचे समन्वयक डॉ. एस.बी. सादळे यांनी चर्चेचे संयोजन केले. 

Thursday, 6 March 2025

किफायतशीर कार्बनशोषक तंत्रज्ञान विकासाची गरज: मेजर जनरल डॉ. श्री पाल

 सृष्टी संजीवन राष्ट्रीय पर्यावरण परिषदेस विद्यापीठात प्रारंभ

मेजर जनरल डॉ. श्री पाल

शिवाजी विद्यापीठात आयोजित सृष्टी संजीवन राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना मेजर जनरल डॉ. श्री पाल. मंचावर (डावीकडून) सतीश काळे, डॉ. पुनश्री फडणीस, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्रमोद पुंगावकर आणि डॉ. ए.बी. कोळेकर.

(राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. ६ मार्च: पर्यावरणातील कार्बनचे उत्सर्जन रोखणे ही आजची महत्त्वाची गरज आहेच, पण त्याचबरोबर वातावरणातील कार्बन थेट शोषून घेणारे किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने संशोधनाची दिशा केंद्रित करणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन विशिष्ट सेवा पदक पुरस्कृत मेजर जनरल डॉ. श्री पाल यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग, पर्यावरणशास्त्र अधिविभाग, हवामान बदल व शाश्वतता अभ्यास केंद्र, भूगोल अधिविभाग आणि इंडियन सोसायटी ऑफ हौसिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स (ISHRAE- इशरे) संस्थेचा कोल्हापूर चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने सृष्टी संजीवन या राष्ट्रीय पर्यावरण परिषदेस आज प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बीजभाषण करताना डॉ. पाल बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर इशरे- कोल्हापूरचे प्रेसिडेंट प्रमोद पुंगावकर प्रमुख उपस्थित होते.

मेजय जनरल डॉ. श्री पाल यांनी आपल्या व्याख्यानात पर्यावरणासह मानवी जीवनावर झालेले आणि होऊ शकणाऱ्या कार्बनच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर विवेचन केले. मानवजातीच्याच नव्हे, तर एकूणच पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी कार्बनचे प्रमाण कमी करणे आणि संतुलित राखणे अत्यावश्यक असल्याचे सांगताना ते म्हणाले, सन १००० ते १८०० या प्रदीर् कालावधीमध्ये वातावरणात उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण स्थिर होते. व्यक्तीगत पातळीवर श्वासोच्छवासातूनही आपण हे उत्सर्जन करीत असतो. पण पूर्वी झाडे, वनस्पतींच्या मुबलक अस्तित्वामुळे ते संतुलित राखले गेले. त्यानंतरच्या काळात गतीने वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे आणि त्यासाठी वनसंपदेच्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या कत्तलींमुळे हे कार्बनचे प्रमाण प्रचंड गतीने वाढले. हे प्रदूषण रोखणे आवाक्यापलिकडचे वाटत असले तरी मानवासह जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी ते आपल्याला करावे लागेल. त्याच बरोबरीने कार्बन डायऑक्साईड हवेतून थेट शोषून घेणारे तंत्रज्ञानही मोठ्या प्रमाणात विकसित करण्याची आवश्यकता आहे. हवेच्या त्वरित शुद्धीकरणासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे. यावेळी डॉ. पाल यांनी अत्याधुनिक बंकर तंत्रज्ञान विकास आणि उभारणी याकामी बजावलेल्या कामगिरीविषयीही माहिती दिली. त्यामध्ये अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आपला प्रयोग सफल झाल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र ही भारतीय अणूतंत्रज्ञानाची जनकभूमी असल्याचा आदरपूर्ण उल्लेखही त्यांनी केला.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, काळाची पावले आणि गरजा ओळखून शाश्वत नवतंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. समाजाला घातक पर्यावरणीय दुष्परिणामांपासून वाचविण्यासाठी इशरेने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा असून त्यांच्या विविध उपक्रमांशी शैक्षणिक व संशोधकीय माध्यमातून विद्यापीठ जोडले जाण्याचा आनंद वाटतो. उद्योग आणि औद्योगिक संस्थांचे अशा सहकार्यासाठी पुढे येणे हे सकारात्मक लक्षण आहे. समाजाला अशा गोष्टींबाबत अवगत करीत राहणे ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी आहे.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या डिजीटल स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. ए.बी. कोळेकर यांनी स्वागत केले. समन्वयक डॉ. पुनश्री फडणीस यांनी प्रास्ताविक केले. इशरेचे प्रेसिडेंट प्रमोद पुंगावकर यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. पी.ए. प्रभू यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सहसमन्वयक सतीश काळे यांनी आभार मानले.

परिषदेस डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. एस.बी. सादळे, अतुल इंगवले, महेश साळुंखे, श्रीकांत भोसले, डॉ. एस.बी. चव्हाण, डॉ. जी.एम. सोळंकी, डॉ. श्रीपाल गायकवाड, उदय पाटील, गणेश शिंदे, आवेश हुसैनी, योगेश गांधी, विजय पाटील, रमेश पवार, श्रुजीत शिंगे यांच्यासह इशरेचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेत १३० शोधनिबंधांचे सादरीकरण

या राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातील संशोधकांकडून पर्यावरणविषयक १३० शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. त्यांचे पुढील दोन दिवसांत विविध सत्रांतून सादरीकरण होईल. त्यांतील निवडक शोधनिबंध इंडियन जर्नल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या शोधपत्रिकेमधून प्रकाशित करण्यात येणार आहेत.

 

Wednesday, 5 March 2025

शिवस्पंदन क्रीडा महोत्सव: क्रिकेटचा अंतिम सामना एमबीए आणि रसायनशास्त्र यांच्यात रंगणार

 






(फोटोओळी- उपरोक्त सर्व फोटोंसाठी) शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात रंगलेल्या विविध स्पर्धांतील क्षणचित्रे

(शिवस्पंदन क्रीडा महोत्सव: तिसरा दिवस व्हिडिओ)



कोल्हापूर, दि. ५ मार्च: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात आज क्रिकेटच्या मैदानात अनेक चुरशीचे सामने झाले. यामध्ये पुरूष गटात एमबीए अधिविभाग आणि रसायनशास्त्र अधिविभाग यांच्यात उद्या अंतिम सामना रंगणार आहे.

आज पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये एम.बी.ए. अधिविभागाने क्रीडा अधिविभागाचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला, तर रसायनशास्त्र विभागाने यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या या दोन संघात अंतिम सामना आणि क्रीडा अधिविभाग आणि वाय.सी.एस.आर.डी. यांच्यात तिसऱ्या क्रमांकासाठी लढत होईल.

महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत गणित अधिविभाग, अर्थशास्त्र अधिविभाग, नॅनो सायन्स अधिविभाग, तंत्रज्ञान अधिविभाग, प्राणिशास्त्र अधिविभाग यांनी पुढील फेरीत प्रवेश केला आहे.      

आज सकाळच्या सत्रात झालेल्या विविध अॅथलेटिक्स स्पर्धांचे निकाल अनुक्रमे पुढीलप्रमाणे:

x १०० रिले (महिला): क्रीडा अधिविभाग, तंत्रज्ञान अधिविभाग आणि भौतिकशास्त्र अधिविभाग.

४०० मीटर (महिला): मनीषा शिंदे (क्रीडा अधिविभाग), अनुष्का भोसले (तंत्रज्ञान अधिविभाग), अनुष्का पाटील (क्रीडा अधिविभाग).

४०० मीटर (पुरुष): प्रेम संकपाळ (तंत्रज्ञान अधिविभाग), पार्थ कांबळे (क्रीडा अधिविभाग), रोहित बिराजदार (जैवतंत्रज्ञान अधिविभाग).

लांब उडी (पुरुष): आर्यन शेजाळ (क्रीडा अधिविभाग), साहिल शिकलगार (रसायनशास्त्र अधिविभाग), शुभम कांबळे (क्रीडा अधिविभाग).

बास्केटबॉल पुरुष स्पर्धेत अर्थशास्त्र आणि क्रीडा अधिविभाग यांनी पुढील फेरीत प्रवेश केला आहे. महिला गटात अर्थशास्त्र विभागाने पुढील फेरीत प्रवेश केला.

कबड्डी पुरुष स्पर्धेत क्रीडा अधिविभाग, ए.जी.पी.एम. अधिविभाग, वाय.सी.एस.आर.डी. अधिविभाग आणि इतिहास अधिविभाग उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. महिला गटात क्रीडा अधिविभाग, कॉम्युटर सायन्स, तंत्रज्ञान अधिविभाग, गणित अधिविभाग उपांत्य फेरीसाठी पात्र झाले.

व्हॉलीबॉल पुरुष स्पर्धेत तंत्रज्ञान विभाग, लायब्ररी सायन्स, ए.जी.पी.एम. विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभाग हे उपांत्य फेरीसाठी पात्र झाले आहेत.

उद्या महोत्सवात...

उद्या (दि. ६) क्रिकेट (पुरुष व महिला), कबड्डी (पुरुष व महिला), रस्सीखेच (पुरुष व महिला), बास्केटबॉल (पुरुष व महिला), अॅथलेटिक्स (पुरुष व महिला) यांचे पुढील फेरीचे सामने होतील.

महात्मा गांधींच्या छायेतही स्वत्व टिकविण्यात कस्तुरबांचे मोठेपण: सोनाली नवांगूळ

 

शिवाजी विद्यापीठात पद्माराजे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना सोनाली नवांगूळ. मंचावर (डावीकडून) डॉ. नेहा वाडेकर, डॉ. प्रकाश पवार, डॉ. दशरथ पारेकर आणि डॉ. भारती पाटील


(सोनाली नवांगूळ यांच्या व्याख्यानाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. ५ मार्च: महात्मा गांधी यांच्यासारख्या महान नेत्याच्या बरोबरीने धावताना स्वतःची फरफट न होऊ देता स्वत्व टिकविण्यामध्ये कस्तुरबा गांधी यांचे मोठेपण आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका, अनुवादक सोनाली नवांगूळ यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाचे शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि गांधी अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्माराजे स्मृती व्याख्यानमालेत कस्तुरबा उमजून येताना या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दशरथ पारेकर होते. डॉ. प्रकाश पवार प्रमुख उपस्थित होते.

सोनाली नवांगूळ यांनी तुषार गांधी यांचे दि लॉस्ट डायरी ऑफ कस्तुर: माय बा हे पुस्तक अनुवादित केले आहे. या अनुवादाच्या निमित्ताने नव्याने उमगलेल्या कस्तुरबा गांधी यांच्याविषयी अत्यंत आपुलकीच्या भावनेतून मांडणी केली. त्याचप्रमाणे राष्ट्रपित्याच्या छायेखाली जगाने झाकोळून टाकलेल्या त्यांच्या स्वयंपूर्ण व्यक्तीमत्त्वावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. कस्तुरबा गांधी यांना लिहीता येत होते, याची साधी नोंदही जगाने दोन वर्षापूर्वीपर्यंत घेतली नाही, याची खंत व्यक्त करीत कस्तुरबांनी त्यांच्या डायरीमध्ये केलेल्या नोंदींची वैशिष्ट्ये आणि त्यामधून उलगडलेल्या कस्तुरबांविषयी सोनाली नवांगूळ यांनी माहिती दिली.

नवांगूळ म्हणाल्या, कस्तुरबा या महात्मा गांधी यांच्या अनुयायी नव्हत्या, तर सखी होत्या. त्यामुळे त्यांच्या जीवनातील आपले स्थान अधोरेखित कसे करावयाचे, हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. त्या मूलतः संसारी, हौशी आणि आसक्त असल्या आणि महात्मा गांधींचे सातत्याने स्थान बदलणे, त्यांची प्रयोगशीलता, त्यांच्या चळवळी यांच्याशी जुळवून घेताना दमछाक होत असली तरी त्यांनी हे सातत्यपूर्ण बदल रिचवले, स्वीकारले. पतीच्या प्रत्येक चळवळीत सातत्याने साथ देणे, हे त्यांचे मोठेच कार्य होते. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांचे आकलन वाढविण्यामधील त्यांचे योगदानही आपण लक्षात घ्यायला हवे. त्या केवळ महात्म्याची सावली नव्हत्या, तर त्यांच्या स्वतःच्या काही अंगभूत क्षमता होत्या. त्या क्षमतांनिशी त्या महात्म्याच्या बरोबरीने उभ्या राहिल्या, हे लक्षात घ्यायला हवे. आजच्या प्रत्येक महिलेला कस्तुरबांच्या संघर्षाशी आपले नाते जोडता येते. त्याचप्रमाणे सूर्याच्या प्रखर प्रकाशातही छोट्या काजव्याप्रमाणे आपला प्रकाश हरवू न देण्याची शिकवणही कस्तुरबांच्या जीवनाकडून आपल्याला मिळते.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. पारेकर म्हणाले, महात्मा गांधींविषयी अनेकांनी लेखन, आकलन करवून घेण्याचा मोह जगभरातील विचारवंतांना आवरत नाही. मात्र, याच विचारवंतांकडून कस्तुरबांवर मात्र कळत नकळतपणे अन्याय झालेला आहे. उशीराने का होईना, त्यांना आता ते समजून घेऊ लागले आहेत, त्यांच्याविषयी लिहू लागले आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. गृहिणी ते गांधींच्या सत्याग्रहात सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला सत्याग्रही, ही कस्तुरबांची वाटचाल विलक्षण आहे. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात अनेक प्रयोग केले असले तरी त्यांच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगाला संमती देणे, यामधील कस्तुरबांचे मोठेपणही आपण लक्षात घ्यायला हवे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे स्वात व प्रास्ताविक डॉ. भारती पाटील यांनी केले. डॉ. नेहा वाडेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सुरेश शिपूरकर, डॉ. रविंद्र भणगे, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. जयश्री कांबळे यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

विद्यापीठाच्या वाटचालीत महिलांचे योगदान महत्त्वाचे: कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के

 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यशाळा उत्साहात

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. प्रतिमा पवार, डॉ. भारती पाटील, डॉ. मेघा गुळवणी

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर उपस्थित मान्यवर.


आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेस उपस्थित महिला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेस उपस्थित महिला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी

 
(महिला दिन कार्यक्रमाची ध्वनीचित्रफीत)

कोल्हापूर, दि. ५ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या वाटचालीत महिला शिक्षकांसह प्रशासकीय सेविकांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. विद्यापीठामधील महिला उच्च नितीमूल्यांनिशी कार्यरत असून सर्व घटकांना न्याय प्रदान करण्यातही त्या आघाडीवर आहेत, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्री अभ्यास केंद्र, बेटी बचाओ अभियान, श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, विद्यापीठ अंतर्गत तक्रार समिती, महिला वसतिगृह, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'महिलांचे उच्च शिक्षणातील शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदान' या विषयावर आज एकदिवसीय कार्यशाळा झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ.मेघा गुळवणी यांची विशेष उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत समाजाची दृष्टी वेगाने बदलत आहे. त्यांच्या शिक्षणास मदत करण्याकरिता अनेक घटक पुढे येत आहेत. परिणामी विद्यापीठात नूतन विद्यार्थिनी वसतिगृह आणि अभ्यासिका निर्माण झाली. गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टीने विद्यापीठात विद्यार्थिनींची मोठी वाढ झाली आहे, ही स्तुत्य बाब आहे. विविध प्रकारच्या जबाबदाऱ्यांचे ओझे आणि सामोऱ्या येणाऱ्या अनंत अडचणींना तोंड देत महिला अग्रक्रमाने पुढे जात आहेत, याचा अभिमान वाटतो.

कुलसचिव डॉ.विलास शिंदे म्हणाले, भारतामध्ये स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्येक व्यक्तीला समतेची, एकतेची वागणूक देण्याचे धोरण होते. तेच धोरण स्वीकारून महात्मा जोतीराव फुले यांनी महिलांच्या शिक्षणामध्ये मोठे योगदान दिले.

अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी म्हणाल्या, घर जबाबदारीने सांभाळणाऱ्या स्त्रियांनाही माणूस म्हणून बरोबरीचा अधिकार आणि सन्मान मिळणे आवश्यक आहे.

यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. भारती पाटील यांनीही मार्गदर्शन केले. स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ.निशा मुडे- पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयक डॉ.प्रतिभा देसाई यांनी आभार मानले. प्राजक्ता शहा यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.तानाजी चौगुले, महिला वसतिगृहाच्या मुख्य अधीक्षक डॉ. माधुरी वाळवेकर, समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रतिमा पवार, डॉ. ज्योती जाधव, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. विनिता रानडे, संध्या अडसूळे यांच्यासह शिक्षिका, महिला अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

 

Tuesday, 4 March 2025

शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत तंत्रज्ञान अधिविभागाची चमक

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात नॅनो सायन्स आणि एम.बी.ए. अधिविभागाच्या मुलींमधील क्रिकेट सामना

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात संगणकशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान अधिविभागांच्या विद्यार्थ्यांमधील बॅडमिंटन सामन्यातील एक क्षण

(शिवस्पंदन क्रीडा महोत्सव-दुसरा दिवस व्हिडिओ)




कोल्हापूर, दि. ४ मार्च: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४-२५मध्ये गतवर्षीप्रमाणेच यंदाही तंत्रज्ञान अधिविभागाच्या क्रीडापटूंनी विविध स्पर्धांत चमक दाखविण्यास सुरवात केली आहे.

काल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभानंतर आज बुद्धीबळासह बॅडमिंटन स्पर्धेत तंत्रज्ञान अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले. या अधिविभागाच्या धैर्यशील सरनोबतने बुद्धिबळ पुरूष गटात तर प्रतीक्षा गोसावीने महिला गटात प्रथम क्रमांक मिळविला. बुद्धीबळ पुरूष गटात अर्थशास्त्र अधिविभागाच्या अभिजीत खोपकरने द्वितिय, तर क्रीडा अधिविभागाच्या राहुल लोखंडेने तृतीय क्रमांक मिळविला. महिला गटात समाजशास्त्राच्या स्नेहल खामकरने द्वितिय तर गणितशास्त्रच्या गीता पांढरेने तृतीय क्रमांक मिळविला.

पुरूष बॅडमिंटनचीही अंतिम फेरी आज झाली. यामध्ये तंत्रज्ञान अधिविभाग, अर्थशास्त्र अधिविभाग आणि जैव तंत्रज्ञान अधिविभाग यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले.

पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेत आज यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, एम.बी.ए., इतिहास, कॉम्प्युटर सायन्स, क्रीडा अधिविभाग, रसायनशास्त्र  या अधिविभागांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवित पुढील फेरीत प्रवेश केला. तर, महिला क्रिकेट स्पर्धेत यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, इतिहास, तंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, नॅनो सायन्स, गणितशास्त्र, राज्यशास्त्र, प्राणीशास्त्र या अधिविभागांनी पुढील फेरीत प्रवेश केला.

पुरूषांच्या कबड्डी स्पर्धेत इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, क्रीडा अधिविभाग, ए.जी.पी.एम., संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र या अधिविभागांनी पुढील फेरीत प्रवेश केला.

उद्या, बुधवारी (दि. ५) क्रिकेट (पुरुष व महिला), कबड्डी (पुरुष व महिला), बास्केटबॉल (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष) तसेच अॅथलेटिक्स (महिला व पुरुष) स्पर्धा होणार आहेत. 

दृष्टी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी

विद्यापीठात सुगम्य विज्ञान कार्यक्रम

शिवाजी विद्यापीठात आयोजित सुगम्य विज्ञान कार्यक्रमात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह उपस्थितांना प्रात्यक्षिके दाखविताना सतीश नवले.


कोल्हापूर, दि. ४ मार्च: राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाचे समावेशी शिक्षण संसाधन केंद्र आणि यू.जी.सी. स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीझ् यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर आणि सांगली येथील विविध शाळांत शिकणाऱ्या दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांकरिता एकदिवसीय सुगम्य विज्ञान कार्यक्रम नुकताच यशस्वीरित्या पार पडला.

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी आणि शालेय अभ्यासक्रमातील प्रयोग करता यावेत, यासाठी जीव, भौतिक, रसायन व वनस्पती या शास्त्रांवर आधारित विविध प्रयोग वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून प्रत्यक्ष शिकवण्यात आले. यामध्ये विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील तसेच राजाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून दिवसभर उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या माजी प्रमुख डॉ. अंजली निगवेकर उपस्थित होत्या. तर, समारोपास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, हे प्रयोग अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. या प्रयोगांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे. विद्यापीठातील विविध विज्ञान शाखांतील विद्यार्थी संशोधकांनी अशा प्रयोगांच्या निर्मितीमध्ये योगदान देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प सहाय्यक सतीश नवले यांनी प्रयोग निर्मिती केली. यावेळी आयक्यूएसी संचालक डॉ. सागर डेळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा बिराजदर यांनी केले, तर रोहन लाखे यांनी आभार मानले.