शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी साधला संवाद
![]() |
मुंबईतील चीनचे कौन्सुल जनरल काँग झिन्हुआ यांनी चीनमधील शैक्षणिक, संशोधकीय आणि रोजगार संधी या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. |
कोल्हापूर, दि. ७ मार्च: जागतिक पातळीवर चीन आज उच्चशिक्षणासह अनेक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे.
त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी आता पाश्चिमात्य राष्ट्रांऐवजी या पौर्वात्य
राष्ट्राला पसंती द्यावी, असे आवाहन चीनचे मुंबईतील कॉन्सुल जनरल काँग झिन्हुआ
यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात विद्यार्थ्यांसमवेत
आयोजित खुल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के होते.
श्री. झिन्हुआ यांनी चीनने
नजीकच्या कालखंडात विविध क्षेत्रांत साधलेल्या प्रगतीविषयी तसेच तेथील शैक्षणिक
संधी, रोजगार व नोकरीविषयक संधी आदींबाबत विद्यार्थ्यांना सुमारे तासभर सादरीकरण
दाखविले. ते म्हणाले, जागतिक पातळीवर उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चीनने
ऑटोमेशन, रोबोटिक्स, अत्याधुनिक इलेक्ट्रीक ऑटोमोबाईल्स यांसह कृषी आणि कृषीपूरक
क्षेत्रांमध्येही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रिअल टाइम डेटा यांच्या सहाय्याने मोठी
क्रांती घडविली आहे. मटेरियल सायन्स, रसायनशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता या
क्षेत्रांसह सर्वसाधारण जागतिक रँकिंगमध्ये चीनमधील सरासरी आठ विद्यापीठे आहेत.
त्यामुळे साधनसुविधा, गुणवत्ता, शैक्षणिक दर्जा यांच्या बाबतीत चीनमधील विद्यापीठे
पाश्चिमात्य राष्ट्रांच्या तुलनेत कोठेही कमी नाहीत. त्याचप्रमाणे चीनमध्ये बहुतांश
विद्यापीठे शासकीय असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप जरी मिळाली नाही, तरी
शिक्षण शुल्क खूपच माफक असल्याने ते परवडते. भाषा आणि खाद्यसवयी याच केवळ त्यामधील
अडचणी आहेत. त्यासाठीच आम्ही भारतामध्ये चीनी भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या
प्रयत्नात आहोत. त्याचप्रमाणे चीनमध्येही उत्तम भाजीपाला पिकत असून चांगला शाकाहार
मिळतो. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांची कोणतीही अडचण होणार नाही, असेही त्यांनी
सांगितले. विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे त्यांनी समाधानही केले.
‘भारतीय विद्यार्थ्यांना
मोठी संधी’
या विद्यार्थी
संवादापूर्वी व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये शिवाजी विद्यापीठ आणि चीनमधील
शैक्षणिक संस्था यांच्यामधील सहकार्य वृद्धीच्या अनुषंगाने दोन्ही बाजूंच्या
शिष्टमंडळांमध्ये तपशीलवार चर्चा झाली. दिल्लीतील चीनी दूतावासाचे शैक्षणिक
कौन्सेलर यांग झिहुआ यांनी त्यासंदर्भातील सादरीकरण केले. भारत आणि चीनमधील
शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये विद्यार्थी- शिक्षक आदानप्रदान व सहकार्य,
सांस्कृतिक व नागरी सहकार्यवृद्धी, दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक साहचर्य व सहकार्य,
भारतामध्ये चीनी भाषा व अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रोत्साहन आणि डिजीटल शिक्षणास
प्रोत्साहन या पाच सूत्रांच्या आधारे शिवाजी विद्यापीठ आणि चीनमधील उच्चशैक्षणिक
संस्थांमध्ये संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि त्याद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना
शिक्षण, संशोधन आणि रोजगार यासाठी चीनमध्ये अनेक संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
‘शाश्वत भागीदारी साकारणे
आवश्यक’
यावेळी कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांनी, शिवाजी विद्यापीठ आणि चीनमधील विविध विद्यापीठांतील संशोधक
यांनी मटेरियल सायन्सपासून ते औषधनिर्मितीपर्यंतच्या अनेक शोधप्रकल्पांवर संयुक्तपणे
काम केले असून त्यांचे शोधनिबंधही प्रकाशित झाल्याचे आपल्या सादरीकरणात दर्शविले.
ते म्हणाले, चीनी दूतावासाने चीनमधील दोन ते तीन विद्यापीठे निवडण्यास शिवाजी
विद्यापीठास मदत करावी. त्या विद्यापीठांतील निवडक शिक्षक, संशोधक आणि महाराष्ट्राच्या
विद्यापीठांमधील निवडक शिक्षक, संशोधक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यासाठी शिवाजी
विद्यापीठ पुढाकार घेईल. त्या बैठकीत भाषिक शिक्षणास प्रोत्साहनापासून ते
शैक्षणिक, संशोधकीय आदानप्रदानापर्यंत सर्व प्रकारची चर्चा होऊन ठोस कृतीशील
पर्यायांपर्यंत पोहोचता येऊ शकेल. दोन्ही देशांतील विद्यापीठांमध्ये शाश्वत
स्वरुपाची भागीदारी आकारास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील आणि डॉ. सागर डेळेकर यांनी सादरीकरण केले आणि कुलसचिव डॉ. विलास
शिंदे यांनी आभार मानले. प्रख्यात राजनितीज्ञ डॉ. सुधींद्र कुलकर्णी आणि ज्येष्ठ
पत्रकार, संपादक डॉ. श्रीराम पवार यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये चीनी शिष्टमंडळातर्फे मुंबई चीनी कॉन्सुलेटचे वाणिज्य कौन्सेलर झँग हाँगयू, सहकौन्सुल झिआँग फँगझिंग व श्रीमती पॅन झिवॅई, चीनी दुतावासाचे प्रथम सचिव फू झिआनफेंग यांनी आणि शिवाजी विद्यापीठातर्फे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी सहभाग घेतला. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय समन्वय कक्षाचे समन्वयक डॉ. एस.बी. सादळे यांनी चर्चेचे संयोजन केले.
No comments:
Post a Comment