![]() |
शिवाजी विद्यापीठात आयोजित संशोधन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सिद्धार्थ शिंदे. मंचावर (डावीकडून) डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि डॉ. रूपाली संकपाळ. |
कोल्हापूर, दि. १७ मार्च: संशोधकांनी स्थानिक गरजा लक्षात घेऊन
त्यांची पूर्ती करण्याच्या दिशेने आपले संशोधन केंद्रित करावे. त्याचप्रमाणे
शाश्वत विकास डोळ्यांसमोर ठेवून आपली सृजनशीलता वापरावी, असे आवाहन शिवाजी
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी
केले.
शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र
अधिविभागात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (पीएम-उषा) संशोधक व पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी
"सृजनात्मक विचारांची शिक्षण पद्धती" या विषयावर आजपासून दोनदिवसीय
कार्यशाळेस प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिंदे
बोलत होते. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन
अध्यक्षस्थानी होते.
श्री. शिंदे म्हणाले, समाजाचा पैसा समाजोपयोगी
संशोधनासाठी खर्च व्हावा. विद्यापीठासारख्या ठिकाणी स्थानिक समस्यांवर आधारित
संशोधन व्हावे. स्थानिक गरजांनुरुप अभ्यासक्रमांमध्ये देखील त्याचा अंतर्भाव
व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. महाजन अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, शिक्षकांमध्ये
सृजनशील विचारसरणी असेल तर तो विद्यार्थ्यांसाठी, उद्यमशील
समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. आज
शिक्षणक्षेत्रावर ही सृजनशीलता घडविण्याची मोठी जबाबदारी आहे.
यावेळी शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख
डॉ. चेतना सोनकांबळे यांनी स्वागत केले. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाचे
समन्वयक डॉ विद्यानंद खंडागळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुप्रिया पाटील व अंजली
आंबेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. रूपाली संकपाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी
सारिका पाटील, श्रीराम सोनवणे, आनंदा
कुंभार, अर्चना कुराडे, अंजली
गायकवाड, संगीता चंदनवाले, संजना भालकर, संगीता
माने, ममता घोटल, संजय
चव्हाण, अतुल जाधव उपस्थित होते.
विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण ८१ संशोधक व पदव्युत्तर पदवीच्या
विद्यार्थ्यांनी कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला.
No comments:
Post a Comment