शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात तंत्रज्ञान अधिविभागास सर्वसाधारण विजेतेपद
![]() |
शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना तंत्रज्ञान अधिविभागाचा संघ |
![]() |
शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या द्वितिय सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना क्रीडा अधिविभागाचा संघ |
![]() |
शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या तृतीय सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना गणित अधिविभागाचा संघ |
कोल्हापूर, दि. १४ मार्च: शिवाजी
विद्यापीठाच्या कॅम्पसमधूनही उत्तमोत्तम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रीडापटू
घडावेत, या भूमिकेतून शिवस्पंदन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरवात केली.
विद्यार्थ्यांनी विद्यापीठात उपलब्ध सुविधांचा वर्षभर लाभ घेऊन आपली कामगिरी
उंचावत राहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी
काल (दि. १३) केले.
शिवाजी विद्यापीठात गेल्या आठवड्यात पार पडलेल्या
शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेत्यांची घोषणा आणि पुरस्कार प्रदान
सोहळा काल सायंकाळी क्रीडा अधिविभागाच्या सभागृहात झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन
ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची
प्रमुख उपस्थिती होती. तंत्रज्ञान अधिविभागाने स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद
पटकावले.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने
गतवर्षीपासून कॅम्पसवरील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना संधी प्रदान
करण्याचे ठरवून ‘शिवस्पंदन’ वार्षिक महोत्सवाला
प्रारंभ केला. याला विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. क्रीडा स्पर्धांत गतवर्षी
७०० विद्यार्थी सहभागी झाले. यंदा हाच आकडा २५०० च्या घरात गेला. पुढील वर्षी तो आणखी
वाढावा. त्याचप्रमाणे केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न राहता क्रीडापटूंनी आपल्या
शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडाकौशल्यांच्या विकासाकडेही लक्ष द्यावे. क्रीडा
विभागाने विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यांचा विद्यार्थ्यांनी
वर्षभर लाभ घ्यावा आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांपर्यंत झेप
घेऊन विद्यापीठाचे नाव उंचावावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनीही
मनोगत व्यक्त केले. क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. डॉ. एन.डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. किरण पाटील
यांनी आभार मानले. यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव
देशमुख, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार उपस्थित होते. क्रीडा
स्पर्धा नेटकेपणाने पार पाडण्यासाठी डॉ. राजेंद्र रायकर, प्रा. किरण पाटील, डॉ. राम पवार, डॉ. धनंजय पाटील, डॉ. निलेश पाटील, प्रा. एन. आर.
कांबळे, डॉ. विक्रम नांगरे- पाटील, सुभाष पवार, सुचय खोपडे, डॉ. प्रशांत पाटील, प्रा. मनीषा शिंदे, प्रदीप हंकारे यांनी
परिश्रम घेतले.
तंत्रज्ञान अधिविभाग
सर्वसाधारण विजेता
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये तंत्रज्ञान
अधिविभागाच्या संघाने स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. त्यांना विजेतेपदाचा
चषक प्रदान करण्यात आला. क्रीडा अधिविभागाच्या संघाने सर्वसाधारण द्वितिय तर गणित
अधिविभागाने तृतीय क्रमांकाचे विजेतेपद पटकावले.
No comments:
Post a Comment