Saturday, 1 March 2025

कॉ. दत्ता देशमुख हे महाराष्ट्राचे लोकशिक्षक: प्रा. राजू पांडे

 


शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना प्रा. राजू पांडे

 

कोल्हापूर, दि. १ मार्च: कॉ. दत्ता देशमुख यांनी ग्रामीण व शहरी भागातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांचे संघटन केले. शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे प्रश्न लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. शेतकरी, कामगार वर्गामध्ये जाणीव जागृती केली. खऱ्या अर्थाने कॉ. दत्ता देशमुख हे महाराष्ट्राचे लोकशिक्षक होते, असे प्रतिपादन प्रा. राजू पांडे यांनी काल केले.

शिवाजी विद्यापीठाचे कॉ. दत्ता देशमुख अध्यासन आणि राज्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॉ. दत्ता देशमुख: व्यक्ती, विचार आणि कार्य या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कॉ. दत्ता देशमुख पुरोगामी विचार मंचाचे सचिव बाबुराव तारळी अध्यक्षस्थानी होते.

प्रा. पांडे म्हणाले, कॉ. दत्ता देशमुख यांनी तत्त्वनिष्ठ राजकारण केले. आज महाराष्ट्रात संधीसाधू आणि तडजोडीचे राजकारण घडत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याची विनंती केली होती. परंतु काँग्रेसमध्ये येऊन कदाचित मला सत्ता, पद, प्रतिष्ठा मिळेल. मात्र ज्या शेतमजूर, शेतकरी, कष्टकरी, कामगार समाजासाठी काम करतो. त्यांच्यासाठी काँग्रेसमध्ये मला कार्य करता येईल, याची शाश्वती नाही, असे म्हणत काँग्रेसमध्ये जाण्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला. कॉ. दत्ता देशमुख हे खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते. कारण त्यांनी रचनात्मक आणि विधायक कार्य केले. कॉ. देशमुख यांनी शेतकरी, कामगार समूहामध्ये समन्यायी भावना निर्माण करण्याचे काम केले. शेती प्रश्न, पाणी प्रश्न यांसह दुष्काळग्रस्त, विस्थापित, धरणग्रस्त, पर्यावरण, लोकसंख्या नियंत्रण अशा विविध घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांनी आवाज उठविला.

अध्यक्षीय मनोगतात बाबूराव तारळी म्हणाले, आपण एखाद्या संस्थेत काम करत असू आणि तिथे एक रुपयाचा फायदा झाला तर आपल्याला फक्त पंचवीस पैसे घेण्याचा नैतिक अधिकार असतो. ज्या संस्थेत आपण काम करतो, ती संस्था जिवंत ठेवली पाहिजे, असे दत्ता देशमुख म्हणायचे. तरुणांनी पुरोगामी विचारांची जपणूक करावी. विस्कटलेल्या महाराष्ट्राची घडी बसवावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. श्रीराम पवार, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. जयश्री कांबळे उपस्थित होते. डॉ. नेहा वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. अक्षय जहागिरदार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment