आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यशाळा उत्साहात
![]() |
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर उपस्थित मान्यवर. |
![]() |
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेस उपस्थित महिला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी |
![]() |
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेस उपस्थित महिला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी |
कोल्हापूर, दि. ५ मार्च: शिवाजी
विद्यापीठाच्या वाटचालीत महिला शिक्षकांसह प्रशासकीय सेविकांनी दिलेले योगदान महत्त्वाचे
आहे. विद्यापीठामधील महिला उच्च नितीमूल्यांनिशी कार्यरत असून सर्व घटकांना न्याय
प्रदान करण्यातही त्या आघाडीवर आहेत, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर
शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या
राजर्षी शाहू सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्री अभ्यास केंद्र, बेटी बचाओ अभियान, श्रीमती शारदाबाई
गोविंदराव पवार अध्यासन, विद्यापीठ अंतर्गत तक्रार समिती,
महिला वसतिगृह, विद्यार्थी विकास विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने 'महिलांचे उच्च शिक्षणातील शैक्षणिक आणि प्रशासकीय
योगदान' या विषयावर आज एकदिवसीय कार्यशाळा झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून
कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ.मेघा गुळवणी
यांची विशेष उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. शिर्के
म्हणाले, मुलींच्या शिक्षणाच्या
बाबतीत समाजाची दृष्टी वेगाने बदलत आहे. त्यांच्या शिक्षणास मदत करण्याकरिता अनेक
घटक पुढे येत आहेत. परिणामी विद्यापीठात नूतन विद्यार्थिनी वसतिगृह आणि अभ्यासिका निर्माण
झाली. गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टीने विद्यापीठात विद्यार्थिनींची मोठी वाढ झाली
आहे, ही स्तुत्य बाब आहे. विविध प्रकारच्या जबाबदाऱ्यांचे ओझे आणि सामोऱ्या
येणाऱ्या अनंत अडचणींना तोंड देत महिला अग्रक्रमाने पुढे जात आहेत, याचा अभिमान
वाटतो.
कुलसचिव डॉ.विलास
शिंदे म्हणाले, भारतामध्ये स्त्रियांना
समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे
प्रत्येक व्यक्तीला समतेची, एकतेची वागणूक देण्याचे धोरण होते.
तेच धोरण स्वीकारून महात्मा जोतीराव फुले यांनी महिलांच्या शिक्षणामध्ये मोठे योगदान
दिले.
अधिष्ठाता डॉ. मेघा
गुळवणी म्हणाल्या, घर जबाबदारीने सांभाळणाऱ्या
स्त्रियांनाही माणूस म्हणून बरोबरीचा अधिकार आणि सन्मान मिळणे आवश्यक आहे.
यावेळी वित्त व लेखाधिकारी
डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. भारती पाटील यांनीही मार्गदर्शन केले. स्त्री अभ्यास केंद्राच्या
संचालक डॉ.निशा मुडे- पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बेटी बचाओ अभियानाच्या
समन्वयक डॉ.प्रतिभा देसाई यांनी आभार मानले. प्राजक्ता शहा यांनी सूत्रसंचलन केले.
कार्यक्रमास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.तानाजी चौगुले, महिला वसतिगृहाच्या मुख्य अधीक्षक डॉ. माधुरी वाळवेकर,
समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रतिमा पवार, डॉ. ज्योती जाधव, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. विनिता रानडे, संध्या अडसूळे यांच्यासह शिक्षिका, महिला अधिकारी,
कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment