झाडाच्या प्रतिबिंबात रासायनिक संयुगाच्या संरचनेचा आभास;
डॉ. सुशीलकुमार जाधव
यांच्या निरीक्षणाचे फलित
![]() |
आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेच्या मुखपृष्ठावर शिवाजी विद्यापीठाचा 'संगीत' तलाव |
![]() |
डॉ. सुशीलकुमार जाधव |
कोल्हापूर, दि. १४ मार्च: ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ अशी एक सुप्रसिद्ध
म्हण आहे. म्हणजे जे सूर्यालाही दिसत नाही, ते कवीच्या नजरेला
दिसते. ही बाब संशोधकांनाही लागू आहे. सतत आपल्या संशोधनाच्या विचारात गुंतलेल्या
संशोधकांनाही ‘जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी’ अशी सर्वत्रच आपल्या
संशोधनाची प्रतिबिंबे दिसू लागतात. शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, संशोधक डॉ.
सुशीलकुमार जाधव यांच्या बाबतीतही असेच घडले. एरव्ही विद्यार्थ्यांमध्ये सनसेट
पॉईंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाशेजारील तलावामधील
झाडाच्या प्रतिबिंबामध्ये त्यांना एका रासायनिक संयुगाच्या संरचनेचा आभास झाला. ते
छायाचित्र त्याच ठिकाणाहून त्यांनी टिपले आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या
स्प्रिंजर नेचर प्रकाशनाच्या ‘मॅक्रोमॉलेक्युलर रिसर्च’ (मार्च २०२५) या
आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान या छायाचित्राला
लाभला.
या संदर्भात शिवाजी विद्यापीठातील नॅनो सायन्स व
तंत्रज्ञान अधिविभागातील प्राध्यापक डॉ. सुशीलकुमार जाधव यांनी दिलेल्या
माहितीनुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराज कापसे आणि
प्रणोती पाटील हे विद्यार्थी संशोधन करीत आहेत. त्यांच्याच शोधनिबंधाच्या विषयास
अनुसरून हे मुखपृष्ठ तयार केलेले आहे. छायाचित्रातील झाडाच्या फांद्या आणि त्यांचे
पाण्यातील प्रतिबिंब हे ब्रँच्ड-पॉलिथिलिनमाईन या बहुलकाप्रमाणे (पॉलिमरसारखे)
दिसते. हा पॉलिमर पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येतो. या पॉलिमरद्वारे पाण्यातील
सेंद्रिय तसेच असेंद्रिय विषारी घटक वेगळे केले जाऊ शकतात. ‘मॅक्रोमॉलेक्युलर
रिसर्च’ या आंतरराष्ट्रीय मानांकित जर्नलच्या प्रत्येक
अंकामध्ये साधारण पंधरा ते वीस शोधनिबंध प्रसिद्ध होतात. या सर्वांमध्ये स्पर्धा
घेऊन एका शोधनिबंधाशी संबंधित छायाचित्र मुखपृष्ठासाठी निवडले जाते. त्यामधून
शिवाजी विद्यापीठ परिसरातील संगीत तलावाचे डॉ. जाधव यांनी काढलेल्या छायाचित्राची
निवड या महिन्याच्या मुखपृष्ठासाठी करण्यात आली. या छायाचित्राचा वापर
शोधनिबंधातील वैज्ञानिक माहिती कलात्मक पद्धतीने दर्शवण्यासाठी करण्यात आला आहे.
शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा हिरवाईने, जैवविविधतेने
नटलेला आहे. विद्यापीठातील ही नैसर्गिक स्थळे संशोधकांसाठी सुद्धा आता
प्रेरणास्थळे ठरत आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. विद्यापीठाच्या या
नैसर्गिक विविधतेला आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेच्या मुखपृष्ठावर झळकवल्याबद्दल डॉ.
जाधव आणि संशोधक विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment