![]() |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना लेखिका विनिता तेलंग. |
कोल्हापूर, दि. २७ मार्च: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य म्हणजे
महिला सक्षमीकरणाचे मोठे आदर्श उदाहरण आहे, असे प्रतिपादन लेखिका विनिता तेलंग यांनी
केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या
सांस्कृतिक कार्य विभागाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठ
यांच्या संयुक्त विद्यमाने काल (दि. २६) विद्वत्ता परिषद आणि सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रथम सत्रात ‘पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य व महिला सबलीकरण’ या विषयावर त्या बोलत
होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे समन्वयक डॉ.
मच्छिंद्र गोफणे होते.
विनिता तेलंग म्हणाल्या, अहिल्यादेवींनी केवळ
धार्मिक कार्य केले, असे नव्हे, तर त्याबरोबरीनेच अनेक लोककल्याणकारी कामे केली. महिला
सक्षमीकरणाचे त्या स्वतः प्रतीक होत्याच, पण त्यांच्यामुळे राज्यातील इतर
महिलांसाठीही त्यांचे कर्तृत्व प्रेरणादायी ठरले. आजही त्यांचे कार्य स्फूर्तीदायक
आहे. त्यांचे कार्य देशातील प्रत्येकासाठी महत्त्वाचे असून त्याची जाणीव प्रत्येक भारतीयाने ठेवली पाहिजे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रापासून नव्या पिढीने सर्वसमावेशक, सर्वव्यापक
प्रेमाचा, सर्वांच्या हिताचा बोध घ्यावा आणि त्याप्रमाणे जीवन व्यतित करावे. अहिल्यादेवींचा
आदर्श घेवून लोककल्याणाचे राजकारण, समाजकारण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर दुसऱ्या
सत्रात सुखदेव थोरात यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राजकीय, सामाजिक
धोरण व प्रशासकीय कार्य या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी सांस्कृतिक कार्य
विभागाचे चंद्रकांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रशांत आयरेकर यांनी
सूत्रसंचालन केले, तर दत्तात्रय घोटुगडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रभंजन
माने, सामाजिक कार्यकर्ते बबनराव रानगे, शहाजी सिद, प्रा.लक्ष्मण करपे, डॉ. संतोष
कोळेकर यांच्यासह विविध अधिविभागांचे शिक्षक, संशोधक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित
होते.
गौरवगाथा आणि सांस्कृतिक कार्यक्रम
कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची गौरवगाथा व सांस्कृतिक
कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले. यामध्ये अहिल्यादेवींची
जीवन गाथा सांगणारी नाटिका, गीते, पोवाडे, ओव्या, लोकगीते व पारंपरिक नृत्यांचे
सादरीकरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment