Tuesday, 18 March 2025

‘एलजीबीटीक्यूएआय’ समुदायाला समता, सन्मानाचा अधिकार: कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'एलजीबीटीक्यएआय'विषयक जागृतीपर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) पूर्वा, प्रिन्स, स्मिता, डॉ. भारती पाटील, मीना शेषू, विशाल पिंजानी


'एलजीबीटीक्यूएआय'विषयक कार्यशाळेत बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) मीना शेषू, विशाल पिंजानी आणि डॉ. भारती पाटील

शिवाजी विद्यापीठात 'एलजीबीटीक्यूएआय'विषयक कार्यशाळेत बोलताना  मीना शेषू

शिवाजी विद्यापीठात 'एलजीबीटीक्यूएआय'विषयक कार्यशाळेत बोलताना विशाल पिंजानी


('एलजीबीटीक्यूएआय'विषयक कार्यशाळेचा व्हिडिओ)





 

कोल्हापूर, दि. १८ मार्च: एलजीबीटीक्यूएआयहा समुदाय आपल्या समाजातील एक घटकच आहे, याची सर्वांना जाणीव होणे आवश्यक आहे. कोणताही भेदभाव न करता त्यांचे जीवन समानतेचे आणि सन्मानाचे असले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, अभिमान, कोल्हापूर आणि मुस्कान, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये एलजीबीटीक्यूएआयसमुदायाविषयी एकदिवसीय जागृतीपर कार्यशाळा आज झाली. त्यावेळी कुलगुरू डॉ.शिर्के अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  यावेळी मुस्कानच्या मीना शेषू आणि अभिमानच्या विशाल पिंजानी यांची विशेष उपस्थिती होती. 

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, या कार्यशाळेकडे सामाजिक कार्य म्हणून पाहिले पाहिजे. या समुदायास न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता आली तरी निसर्गाचे आकलन कोणाला शक्य नाही.  त्यामुळे आपणच या समुदायाला समजून घेतले पाहिजे. दृष्टीकोन बदलला पाहिजे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. समानता आणि सर्वांची प्रतिष्ठा हा संविधानाने प्रदान केलेला अधिकार सर्वांना आहे, याची जाणीव जागृती करण्यामध्ये कार्यशाळा निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मीना शेषू म्हणाल्या, लिंगभाव हा केवळ जैविक नाही, तर तो समाज आणि संस्कृतीने तयार केलेला आहे. मुलांना समाजाबरोबर बाहेर जाऊन शिकण्याची आणि माणूस म्हणून तयार होण्याची संधी मिळते आणि मुलींना घरात बसविले जाते. हा समुदाय आणि समाजामध्ये पुल बांधण्याचे काम असे उपक्रम करतात. सर्वांना सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. तो या समुदायासाठीही मान्य व्हायला हवा.

यावेळी विशाल पिंजानी म्हणाले, या समुदायातील लोकांचे आयुष्य वाचविण्याची संधी तुमच्या हातात आहे.  योग्य माहितीअभावी या लोकांबद्दल गैरसमज निर्माण होवून द्वेष, हिंसा आणि अत्याचार घडतात.  लोकांमध्ये यांच्याप्रती जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. या लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही.  परंतु, अशा स्वरूपाचे लोक एकत्र आल्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य सुधारते. छोटया प्रयत्नांमुळे त्यांचे जीवन सुधारू शकते.  सर्वत्र प्रवेश, समान वागणूक, आरोग्य आणि शांततामय जीवन जगण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला पाहिजे.

यावेळी अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. ऊर्मिला दशवंत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. मेघा पानसरे, डॉ. उमेश गडेकर, डॉ. परशुराम वडर, डॉ. सोनिया रजपूत, डॉ. सुरेश आपटे, एलजीबीटीक्यूएआय समुदायातील प्रिन्स, सँडी, यशश्री, सना, पूर्वा, मयुरी यांच्यासह सायबर कॉलेज आणि विद्यापीठातील समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment