![]() |
ऑस्ट्रेलियाच्या फाल्कन लॅब्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष कापसे यांचे स्वागत करताना भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे. |
कोल्हापूर, दि. २५ मार्च: ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी, संस्थांनी सायबर सुरक्षेबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाच्या फाल्कन लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष कापसे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागातर्फे
काल (दि.
२४)
"सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय): आव्हाने आणि संधी" या
विषयावर श्री. कापसे यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले. अधिविभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे अध्यक्षस्थानी होते.
डिजिटल युगातील सुरक्षा आणि तंत्रज्ञान
विकासाच्या क्षेत्रातील आव्हानात्मक पैलूंवर प्रकाश टाकताना कापसे म्हणाले, प्रत्येक
व्यक्ती आणि संस्थेला त्यांच्या डेटाच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेणे अत्यावश्यक
आहे. विशेषतः, डिजिटल युगात वैयक्तिक आणि संवेदनशील
माहिती सहज उपलब्ध होते, त्याचे
दुरुपयोग टाळण्यासाठी एन्क्रिप्शन आणि नियमित सॉफ्टवेअर अपडेट्सचा वापर करणे
गरजेचे आहे. डिजिटल गोपनीयता राखण्यासाठी आणि सुरक्षित डेटा शेअरिंग सुनिश्चित
करण्यासाठी, मजबूत प्रमाणीकरण पद्धती आणि विश्वसनीय
नेटवर्क सुरक्षा प्रोटोकॉल वापरावेत. फिशिंग हल्ल्यांच्या संदर्भात सातत्याने
जागरुक राहणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी खाजगी माहिती, छायाचित्रे
उघड करीत असताना सावधगिरी बाळगावी. कोणतेही ॲप अधिकृत ॲप स्टोअरमधूनच इन्स्टॉल
करावे, अन्यथा डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. कोणत्याही बँकिंग व्यवहारासाठी
कधीही मोफत वायफाय वापरू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात बोलताना कापसे म्हणाले, एआयच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर डेटा विश्लेषण, ऑटोमेशन आणि संशोधन प्रक्रियांमध्ये
सुधारणा शक्य आहे. तथापि, एआयचे विश्लेषण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये अद्यापही मर्यादा असून त्यासाठी
मानवी निरीक्षण आणि नियंत्रण आवश्यक आहे. अधिक कनेक्टिव्हिटीमुळे आय.ओ.टी.
उपकरणांमध्ये अनेकदा सुरक्षाविषयक त्रुटी आढळतात. अशा परिस्थितीत, योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्यास
हल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो. या संदर्भात सतर्कता बाळगण्याचे महत्त्व
त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. सोनकवडे यांनी तांत्रिक प्रगतीशी संबंधित
फायदे आणि जोखीम याबाबत जागरूक राहण्याचे महत्त्व सांगितले. ऑनलाइन फसवणुकीमध्ये
गेलेले पैसे परत मिळवणे खूप कठीण असल्याने शेअर बाजाराशी निगडित अधिकृत ॲप्सव्यतिरिक्त
इतर ॲपचा वापर करणे धोक्याचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरवातीला डॉ. मानसिंग टाकळे यांनी प्रास्ताविक
व परिचय करून दिला. सुप्रिया पाटील आणि वैष्णवी यादव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.
ए. आर. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. केशव राजपुरे, डॉ. आण्णासाहेब मोहोळकर, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. एस. पी. दास, डॉ. व्ही. एस. कुंभार, डॉ. एम. आर. वायकर, डॉ. एस. एस. पाटील आदींसह विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment