डिजिटल माध्यम उद्योग कार्यशाळेचा समारोप
![]() |
डिजिटल माध्यम उद्योग कार्यशाळेस उपस्थित असणारे (डावीकडून) दिग्दर्शक सुमित पाटील, बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी, दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव, जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. शिवाजी जाधव आदी.
कोल्हापूर, दि. २१ मार्च: कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) जगभर
बोलबाला आहे. माध्यमांमध्ये हे तंत्रज्ञान स्वीकारणे अपरिहार्य आहे. तथापि,
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सर्वस्व नसून ते पूरक असेल, पण
पर्याय असू शकत नाही, असे मत ‘दैनिक
सकाळ’चे
संपादक निखिल पंडितराव यांनी आज व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या जर्नलिझम
अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित डिजिटल माध्यम उद्योग या दोन दिवसीय
कार्यशाळेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी अध्यक्षस्थानी
होते.
पंडितराव म्हणाले, मुद्रित माध्यमांनी गेल्या पावणेतीनशे वर्षांमध्ये अनेक बदल केले आहेत.
डिजिटल माध्यमाच्या प्रभावाच्या काळातही वर्तमानपत्रे आपले अस्तित्व टिकवून आहेत.
उलट कोविडनंतर वर्तमानपत्राच्या खपामध्ये आणि संख्येमध्ये वाढ झाली आहे.
विश्वासार्हता जपल्यामुळे मुद्रित माध्यमांना या पुढील काळातही धोका असणार नाही.
परंतु डिजिटल माध्यमांच्या प्रभावामुळे काही प्रमाणात वर्तमानपत्रातील वृत्त
सादरीकरण बदललेले आहे. मुद्रित माध्यम आणि डिजिटल माध्यम यांचा स्वतंत्र वाचक आणि
ग्राहक आहे. ही दोन्ही माध्यमे एकत्र येणं शक्य नाही. या पुढील काळात
वर्तमानपत्रांसाठी संशोधन, शोध पत्रकारिता आणि मानवी
स्वारस्याच्या बातम्या दिल्याशिवाय गत्यंतर नाही.
चारुदत्त जोशी म्हणाले, टेलिव्हिजन पत्रकारितेमध्ये अनेक तांत्रिक बदल झाले आहेत. हे बदल
स्वीकारणे अपरिहार्य आहे. सध्या देशभर बाराशेपेक्षा जास्त विविध चॅनल्स आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे यातील अनेक चॅनलवर परिणाम होताना दिसत आहे. डिजिटल
माध्यम हेच टीव्हीकडे जाण्याचे भविष्यातील माध्यम असेल. विशेषतः मोबाईलच्या
माध्यमातून मोठा वर्ग टीव्हीशी जोडला जाईल. केबल नेटवर्क कंपन्यांमध्ये अलीकडच्या
काळात मनोमिलन सुरू असून स्पर्धा करण्यामध्ये त्यांना विशेष रुची उरली नाही. त्या
ऐवजी आपला ग्राहक टिकवून ठेवण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे चित्र आहे. भारतात
इंटरनेटची गती वाढल्यानंतरचे चित्र अजून वेगळे असू शकेल, असेही
त्यांनी नमूद केले.
चित्रपट दिग्दर्शक सुमित पाटील
म्हणाले, चित्रपट क्षेत्रापुढे आज अनेक आव्हाने
आहेत. चांगला आशय असूनही लोक चित्रपटगृहात जात नाहीत, हे वास्तव आहे. चित्रपटाच्या
पायरसीमुळे निर्माते आणि दिग्दर्शकांची खूप मोठी आर्थिक हानी होऊ लागली आहे.
डिजिटल माध्यमामुळे मोठ्या प्रमाणात आशयाची निर्मिती होत असली तरी चित्रपट
माध्यमांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म फारसे फलदायी ठरले नसल्याचे दिसते.
विभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख डॉ. शिवाजी जाधव यांनी करून दिली. चंद्रशेखर वानखेडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment