Tuesday, 4 August 2026

डॉ. डी.वाय. पाटील: ज्ञानदेवांचे पसायदान मुरलेले व्यक्तीमत्त्व

पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची डी.लिट. ही सन्मानदर्शक पदवी प्रदान करताना तत्कालीन कुलगुरू डॉ. एन.जे. पवार. सोबत (डावीकडून) परीक्षा नियंत्रक महेश काकडे, दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे आणि कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळ्ये.


(शिवाजी विद्यापीठाने पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना दि. २९ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या ५१ व्या दीक्षान्त समारंभात डी.लिट. ही सन्मानदर्शक सर्वोच्च पदवी देऊन गौरविले. त्यावेळी डॉ. पाटील यांना प्रदान करण्यात आलेले गौरवपत्र...)

शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा वैशिष्टयपूर्ण ठसा उमटविणारे, राजकीय क्षेत्रात अत्यंत निःस्पृह वृत्तीने राहून यशोशिखरे सर करणारे, बिहार आणि त्रिपुरा या राज्याचे राज्यपालपद यशस्वीपणे भूषविलेले आणि स्वतःच्या कार्याचा ठसा अखिल भारतीय पातळीवर उमटवून नावलौकिक प्राप्त करणारे, कोल्हापूरच्या वैभवशाली परंपरेला अधिक समृध्द आणि देदिप्यमान करणारे, उंच यशोशिखरावर आरूढ झालेले अत्यंत विनयशील व्यक्तिमत्व म्हणजे प‌द्मश्री डॉ. डी. वाय. पाटील तथा दादा.

जन्मतःच सामाजिकतेचे भान असलेले आणि दुःखी जनांच्या सांत्वनासाठी, अज्ञान अंधःकारात पिचत पडलेल्या समाजासाठी शिक्षणाचा प्रारंभ झाला पाहिजे असे, मौलिक विचारचिंतन करणारे, अवघ्या समष्टीचा विचार हाच ज्यांचा ध्यास आहे, असे थोर, झळझळीत रत्न या कोल्हापूरच्या मातीच्या कुशीत जन्मले ते म्हणजे प‌द्मश्री डॉ. डी. वाय. पवार पाटीलसाहेब हे होत.

डी. वाय. पाटीलसाहेब! शेतकऱ्यांचे कैवारी, गरिबांचे वाली, प्रतिष्ठित शेतकरी आणि साऱ्या पंचक्रोशीत ज्यांना बावड्याचे आबा म्हणून ओळखले जात असे, त्या आध्यात्मिक वृत्तीच्या यशवंतराव या पित्याच्या आणि वत्सलाबाई या मातेच्या पोटी २२ ऑक्टोबर १९३५ रोजी आपला जन्म झाला. आपण केवळ सात वर्षाचे असताना १९४२ मध्ये आपल्या मातोश्री देवाघरी गेल्या आणि ६ फेब्रुवारी १९५४ रोजी वडिलांचा मृत्यू झाला. आईवडिलांचा मृत्यू हा आपल्यावर झालेला वज्राघात होता. प्राप्त परिस्थितीला आपण धैर्याने सामोरे गेलात आणि शिक्षण अर्धवट सोडून आपण मोठ्या हिमतीने शेतीची आणि घराची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतलीत. आपण स्वतःला सावरून शेतीत लक्ष घातलंत. शेतीबरोबरच लाल मातीची मशागत सुरू झाली, नामवंत मल्ल म्हणून अल्पकाळात लौकिक प्राप्त केला. कुस्तीबरोबर, क्रिकेट हा देखील आपला आवडता खेळ होता कुस्तीमुळे आपलं शरीर बलदंड झालं आणि क्रिकेटमुळे ते पोलादी बनलं.

अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपण कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन बी.ए. ही पदवी घेतली आणि पुढे शिवाजी विद्यापीठाच्या एल.एल.बी. या परीक्षेत आपण प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालात. तसेच राज्यशास्त्र एम.ए. ही पदवी आपण पुणे विद्यापीठातून प्राप्त केली. वयाच्या १९ व्या वर्षी आपण सहकार आणि राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. कोल्हापूर जिल्हा मार्केटिंग कमिटीचे चेअरमन, शेतकरी सहायक मंडळाचे अध्यक्ष अशी मानाची पदे आपल्यापर्यंत चालत आली, १९६४ साली कैरो व युगोस्लाव्हिया येथे भरलेल्या युथ कॉन्फरन्ससाठी आपण प्रतिनिधित्व केले. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काळम्मावाडी धरण झाले पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढा उभा केला. त्यासाठी आपली आमदारकी पणाला लावली आणि त्या कामात आपण यशस्वी झालात.

शेती महामंडळाचे संचालक, इंटकचे अध्यक्ष, रेल्वे सल्लागार मंडळाचे सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे चेअरमन अशा विविध पदांवर आपण १९७२ पासून सतत कार्यरत राहिलात.

आपणास भूतकाळाचा आधार असला तरी त्यातच रमून न जाता आपण वर्तमानातून उज्ज्वल भविष्याचा वेध घेतला. कोणतेही सामर्थ्य हे नित्यकर्मातून मिळते असे मानून कर्मसाधना केली. प्रारब्ध हे काही आकाशातून पडत नाही, आपल्या सत्त्वशील कर्मातूनच ते साकार होते. अशी मनोमनी खूणगाठ बांधून आपण समाजाच्या उत्कर्षाच्या क्षितिजाकडे झेपावत राहिलात.

आपल्या अंतःकरणात गोरगरीब, दुःखीत, वंचित यांच्याविषयी अपार करूणा असल्याने त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ऐन तारुण्यात चळवळ उभी केली. अशा चळवळी उभ्या करताना आपण सतत भलेपणाची, सच्चेपणाची सोबत केली. कोल्हापूर शुगर मिल हा खाजगी मालकीचा कारखाना शेतकऱ्यांच्या घामाला न्याय देत नाही असे दिसताच आपण त्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी, त्याविरुद्ध लढा उभारण्यासाठी शेतकऱ्यांची संघटना बांधली. महाराष्ट्रातील ही पहिलीच शेतक-यांची संघटना होती. या संघटनेद्वारे अन्यायाविरुध्द लढा उभारला आणि खाजगी कारखाना सहकारी कारखाना व्हावा यासाठी प्रयत्न केला. अशाप्रकारे 'सहकार' तत्त्वाचा पहिला उद्घोष आपण केलात.

वारणेतील चांदोली धरणाच्या चळवळीत आपला सक्रीय सहभाग सर्वपरिचित आहे. धरणग्रस्तांविषयी, विस्थापित होणाऱ्या भूधारकांच्याविषयी आपल्या मनात आस्था होती. काळम्मावाडी धरणाच्या आंदोलनात तर आपण अग्रणी होताच. त्यासाठी आपण त्याची निर्गत लागेपर्यंत अथक परिश्रम केले. सीमाप्रश्नाची चळवळ उभी राहिली, तेव्हा मराठी भाषकांवर होणारा अन्याय पाहून आपण पेटून उठलात आणि विधानसभेत आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केलीत.

कसबा बावड्याच्या श्रीराम सोसायटीला विकासाची योग्य दिशा मिळावी, तिचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक व्हावे, म्हणून अल्प वयातच तिची धुरा आपण सांभाळलीत. दुर्बल, निराधार, असहाय, वंचित, उपेक्षित घटकांविषयी केवळ शाब्दिक, भावनिक, पोकळ आणि भोंगळ असा कैवार आपल्या ठायी कधीच नव्हता. तो आपल्या आत्मिक कर्मनिष्ठेचा सबल उद्‌गार होता. 'संकल्पसिध्दी'साठी होकारार्थी मन असणे महत्त्वाचे असते, तसे ते आपले आहे. आपण हाती घेतलेले संकल्पित कार्य आपल्या मनावर अगोदरच पूर्णार्थाने ठसलेले असावे, असे आपले मत आहे.

जीवनात यशस्वी, सुखी, स्थिर व्हायचे असेल तर, आपले विचार, भावना आणि वर्तन यात समतोल असावा. निर्णयक्षमता, जजमेंट, परिपक्वता, प्रगल्भता या सर्वांचा सुमेळ विचारपूर्वक घालावा लागतो. अशी निर्णयक्षमता आपण मिळवली, म्हणूनच आपण नवनव्या वाटा शोधल्या, आपण राजकारण स्वीकारले तेही समाजकारणासाठीच. लोकविकास हेच त्याचे मूळ सूत्र होते. आपल्या राजकारणातील अकरा वर्षे जनसामान्यांच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी वेचली. डोंगराळ, मागास, अडाणी, उपेक्षित, दुर्लक्षित भागांचा विकास हाच आपला ध्यास होता. म्हणूनच आपल्या कार्यकर्तृत्त्वाने भारावलेली निरपेक्ष लोकशक्ती आपल्या पाठीशी उभी राहिली, असा लोकजिव्हाळा उगाच मिळत नाही. त्यासाठी निर्मम वृत्तीने वागावे लागते. आचरण शुद्ध राहावे लागते. निर्वैर वृत्तीने प्रत्येक पाऊल टाकावे लागते. आपण अष्टावधानी वृत्तीने हे साधले आहे.

आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात १९५७ ला झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा तो काळ. या काळात कोल्हापुर म्युनिसिपल कौन्सिलवर काँग्रेसचा फक्त एक नगरसेवक निवडून आला. तो नगरसेवक म्हणजे डी. वाय. पाटील! एवढी लोकप्रियता आपण त्या काळात मिळवलेली होती. त्यानंतर आपण अनेक पदांवर काम केले. १९६७ ते १९६८ या काळात आपण महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय सदस्य होतात. १९८८ पासून आपण भारत 'मॉरीशस ब्रदरहूड ऑफ महाराष्ट्राचे' अध्यक्ष म्हणून काम पहात आहात. आपल्या नेतृत्वाखाली हे मैत्रबंध खूपच दृढ झाले आहेत. अनेक जबाबदाऱ्या आपल्या राजकीय कारकिर्दीत आपण स्वीकारल्या आणि त्या आपण समर्थपणे पार पाडल्यात. परंतु आपण राजकारणात फार काळ रमला नाहीत.

पाटीलसाहेब, आपला पिंड मुळात राजकीय नेता म्हणून नव्हता. समाजाभिमुख व्यापक जनहितासाठी कळवळा असलेल्या मनस्वी साधकाचा हा मनोधर्म होता. मतदारांकडे मतदाता म्हणून पाहणाऱ्या कोरड्या राजकारण्यांच्या पलीकडे आपण उमदेपणाने उभे होता. सर्वस्पर्शी, सर्वांगीण विकासाने समाजऋण फेडता येईल, या प्रांजल भावनेने आपण राजकारण केले. मतलबी, सत्तास्पर्धा, राजकीय डावपेच, भेदाभेद, कपटनीती यांचा स्पर्शही आपल्या मनाला झाला नव्हता. सर्वात्मक समभावाने विकासाची सर्व क्षेत्रे आपण जवळ केलीत. म्हणूनच राजकारणाचा पट सोडल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनःपटलावर जिव्हाळ्याचे स्थान मिळवता आले. आपल्याविषयी माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण "सत्य, चारित्र्य, प्रामाणिकपणा व ध्येयपूर्तीची जिद्द जीवनाची मूल्ये मानल्याने आज आपण समाजाच्या विश्वासाचे प्रतीक बनले आहात," असे म्हणतात, ते सर्वार्थाने खरेच आहे. राजकारणात कटू अनुभव आल्याने प्रसंगी सत्याचा अपलाप झालेला पाहून आपण राजकारणातून संन्यास घेऊन शैक्षणिक कार्याकडे वळलात. मूलतः मानवी कल्याणाला हितकारक असणारे शिक्षण आपल्या अध्यात्मप्रवण मनाला अधिक भावत होते. साधुसंतांच्या शिकवणुकीचा प्रभाव आपल्या श्रध्दाशील अंतःकरणावर होता. म्हणूनच आपण शिक्षण प्रसाराचा ज्ञानमार्ग अंगीकारला.

दुरितांचे तिमिर जाओ! विश्व स्वधर्म सूर्येपाहो!

जो जे वांछिल तो ते लाहो! प्राणीजात!

हेच संत ज्ञानदेवांचे पसायदान आपल्या व्यक्तिमत्वात मुरलेले आहे, त्या ज्ञानसूर्याची आराधना आरंभण्यापूर्वी म. फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याची मुद्रा आपल्या मनावर ठसली होती. त्यांच्या सामाजिक समतेचा स्फुल्लिंग आपल्या मनाला चेतवित होता. कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे, पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक कार्याचे प्रत्यक्ष दर्शन आपणास घडले होते. आपण अमर्याद जि‌द्दीने महाराष्ट्राचे शैक्षणिक अवकाश उजळून टाकलेत.

नित्याचे दूरदर्शी विचारमंथन व नव्याचा शोध घेणाऱ्या विचारांची खंबीर बैठक यामुळे पारंपरिक शिक्षणाची कालबाह्यता ओळखून, गतिमान विज्ञान युगाचा वेध घेऊन आपण तंत्रज्ञान शिक्षणाची कास धरली. आपली क्रिकेटची आवड नव्या मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान या रुपाने फलद्रूप झाली.

देशविख्यात मौनी विद्यापीठाचा अनुभव आपल्या गाठीशी होताच. शिवाय कर्नाटकातील बंगळूर येथील टी.एम.ए. पै यांची तांत्रिक शिक्षणसंस्था १९६७ साली पाहून तशीच शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रात झाली पाहिजे, असा ध्यास आपल्या मनाला स्वस्थ बसू देत नव्हता. या विचाराला पूरक व प्रेरणा देणारी घटना १९८३ साली घडली. महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, सहकार महर्षी मा. वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना विनाअनुदान तत्त्वावर तांत्रिक व वैद्यकिय शिक्षणसंस्था सुरू करण्याचा क्रांतिकारक, तितकाच धाडसी निर्णय घेतला गेला. त्यामध्ये सक्रीय सहभागी होण्याचे आपण निश्चित केले, त्यासाठी एक संस्थात्मक संरचनेची गरज होती. ती गरज आपण १९८३ मध्ये रामराव आदिक यांच्या पाठिंब्याने संस्था स्थापना करून भरून काढली. पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आपण स्वतःची सर्व स्थावर, जंगम मालमत्ता गहाण ठेवली आणि शैक्षणिक कार्याची सुरूवात केली. याचबरोबर आपण महाराष्ट्रातील इतर शिक्षण संस्थांच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलला आहे. १९७५ ते १९९४ या काळात आपण गारगोटी, जि. कोल्हापूर येथील मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष होतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या कार्यकारिणीचे सदस्य (१९७२-१९७८) मुंबई विद्यापीठ (१९८५-८७) तसेच पुणे विद्यापीठ (१९८९-१९९१) आणि शिवाजी विद्यापीठ (१९९०-१९९३) यांच्या सिनेटचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. एआयसीटीईच्या वेस्टर्न रिजनचे चेअरमन म्हणून १९९४-१९९८ या काळात आपण उत्कृष्ट काम केले आहे.

आपण शिक्षण क्षेत्रात पदार्पण केलेत आणि महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून टाकला. जागतिक घटितांच्या संदर्भातून नवनिर्माण सुरू झाले. एकविसाव्या शतकाच्या अवघ्या पटावर आत्मविश्वासाने पावले टाकणारी समर्थ अशी नवी पिढी घडत राहिली, घडत राहील. आपल्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. शिक्षण समूहाने शिक्षणक्षेत्रात गरूडभरारी घेतली आहे. आर्टस, कॉमर्स, वैद्यकिय, अभियांत्रिकी, फार्मसी, आय.टी., आर्किटेक्चर, कृषी व हॉस्पिटॅलिटी अशा सर्वच क्षेत्रातील शिक्षणसाठीच्या सर्व सोयीसुविधा आपण उपलब्ध करून दिल्या. आज आपल्या नावे तीन अभिमत विद्यापीठे कार्यरत आहेत. आणि त्याअंतर्गत १५० हून अधिक शैक्षणिक केंद्रे उभी आहेत. त्यामधून २ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी अध्ययन करीत आहेत.

आपण एवढ्यावर थांबला नाहीत, तर त्रिपुराच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्रिपुरा हे 'एज्युकेशन हब' म्हणून विकसित करण्यास आपण सुरूवात केली. त्यास आज मूर्त स्वरूप आले असून तेथे दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, दोन अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्रिपुरा विद्यापीठाची स्थापनाही आपण केली. तथापि, आपल्या मनात घर करून असलेला शेतकरी आपणास शांत बसू देत नव्हता. राजभवनातच ऊस लागवडीचा प्रयोग सुरू केला आणि त्रिपुरामधील शेतकऱ्यांना ऊस लागवडीस प्रोत्साहन दिले. त्रिपुरावासियांना फक्त आपण सहकाराचा मंत्र सांगितला नाही, तर सहकारामधून विकास कसा साधता येतो याचे प्रत्यक्ष दर्शन घडावे, म्हणून त्रिपुराच्या शिष्टमंडळास कोल्हापुरातील गोकुळ दूध प्रकल्पपाहण्यासाठी पाठविले आणि त्या प्रकल्पास गती दिली. त्रिपुरामधील हायकोर्ट बेंचही आपल्याच प्रयत्नाने सुरू झाले. काही काळ आपणास बिहारचे राज्यपाल म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करण्याची आपली जीवनपद्धती असल्याने आपण तेथे पाटणा येथील गंगा नदीवर लिफ्ट इरिगेशन सुरू करून दाखविले. बारा खाजगी साखर कारखाने बंद पडले होते. त्यांना प्रोत्साहन दिले. परिणामी बंद साखर कारखाने सुरू झाले. त्रिपुरा आणि बिहारच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळताना राज्यपालपदाचे मानधन म्हणून फक्त रूपया मानधन स्वीकारण्याचा एक नवीन पायंडा पाडला. हे एक वेगळेपण डी. वाय. या नावातच दडलेले आहे.

विधायक विचार, ज्ञानप्रसाराची दुर्दम्य आकांक्षा, हितचिंतकांची सदिच्छा, संकल्पसिद्धीला पूर्णत्वाला नेणारी अनाकलनीय शक्ती, मानवी करूणा यामुळे आपले हे सामाजिक उत्थानाचे शिक्षणकार्य अधिक व्यापक विशाल रूप घेऊन देशविदेशात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करीत आहे. यामुळेच विदेशातही आपला गौरव झाला. सन्मान मिळाले. १९८८ मध्ये अमेरिकेतील अॅरिझोना विद्यापीठाने आपणास 'डॉक्टरेट' पदवी देऊन आपला सन्मान केला तर १९९६ मध्ये इंग्लंडच्या नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठानेही आपणास डॉक्टरेट ही सन्माननीय पदवी बहाल केली. अलीकडेच भारतातील काही विद्यापीठांनीही आपणास डॉक्टरेट पदवी देऊ केली आहे. २०१२ साली भुवनेश्वरच्या कलिंगा इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रिअल टेक्नॉलॉजीने आपणास डॉक्टरेट तर महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २०१४ मध्ये डी. एस्सी. पदवी देऊन आपल्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला आहे.

आपल्या देशानेही 'प‌द्मश्री' ही बहुमानाची पदवी बहाल करून आपणास सन्मानाने अलंकृत केले आहे. पाटीलसाहेब, आपण राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार, सांस्कृतिक क्षेत्र, कला, क्रीडा, साहित्य इत्यादी क्षेत्रात निर्लोभी वृत्तीने भरघोस असे कार्य केले आहे. निरलसपणे, अखंड व्रत घेऊन आपण माणसं घडवली. समाज घडवला. भौतिकातून आधिभौतिकातून मानव घडणीचे काम केले आहे. ज्ञान हाच आपला श्वास आहे. निगर्वी वृत्ती हा ध्येयधर्म आहे.

आपण विचारवंत शिक्षणमहर्षी, समाजसेवी राजकारणी आहात. भरभरून प्रेम देणारे कलाप्रेमी आहात. मनोज्ञ रसिक आहात. प्रत्येक गोष्टीकडे पाहाण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असणारे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे श्रध्दानिष्ठ भक्त आहात. सौंदर्यवादी संवेदनशीलता असलेले आस्वादक आहात. अनेक विचारवंताच्या, समाज सुधारकांच्या, संत महंतांच्या तत्त्वविचारांचा व्यासंग असणारे समृद्ध व्यक्तिमत्व आहात.

आपण एक गुरूकुलच आहात. आपल्या सहवासातले क्षण माणसाला जग विसरायला लावतात. विविध मानसिक स्तरांतील, अनेकविध परिस्थितीच्या अवस्थांतील, अशिक्षितांपासून उच्च विद्याविभूषितांपर्यत, सामान्य जनांपासून देशाच्या सर्वोच्च पदावरील महनीय व्यक्तिंपर्यंत सारेच आपल्यावर मनापासून प्रेम करताना दिसतात.

पाटीलसाहेब, आपण शिवाजी विद्यापीठाचे पदवीधर आहात. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य म्हणून आपण काम केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आपण शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीय, कृषी अशा विविध शिक्षण शाखांची सुरूवात केली, त्यामधून पिढ्या घडविल्या जात आहेत. कोल्हापूरच्या शैक्षणिक परंपरेत आपल्या माध्यमातून जी चळवळ सुरू झाली आहे, ती फक्त कोल्हापूरपुरती मर्यादित न राहता पुणे, मुंबई, मॉरीशस पर्यंत पोहचली आहे. आपल्या शैक्षणिक दृष्टिकोनाचा फायदा त्रिपुरा आणि बिहार राज्यांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे. अशा करवीर नगरीतल्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याची संधी शिवाजी विद्यापीठास मिळत आहे, हा सुयोग आहे. आदरणीय पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटीलसाहेब, मोठ्या कृतज्ञ भावनेने डी. लिट. ही सन्मानदर्शक पदवी शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या वतीने आपणास आज प्रदान करीत आहोत. प्रस्तुत पदवीचा आपण स्वीकार करावा, अशी विनंती आहे.

“कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा”

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञ भावना

कोल्हापूर, दि. ४ ऑगस्ट: शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठ परिवारालाही मोठा धक्का बसला. दादा या नावाने सुप्रसिद्ध असणाऱ्या डॉ. पाटील यांच्या अनेक स्मृतींना या निमित्ताने उजाळा देण्यात येत होता.

शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभांसह विविध कार्यक्रमांना शक्य असेल त्यावेळी डॉ. डी.वाय. पाटील हे आवर्जून उपस्थित राहात असत. इथल्या अधिकारी, कर्मचारी यांच्याशीही त्यांचे आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. विद्यापीठ परिवारातील घटकांना ते आपलेच वाटत असत. दादांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारीही आवर्जून भेटीसाठी जात असत. इतका स्नेहभाव दादांनी अखेरच्या क्षणापर्यंत जपला.



शिवाजी विद्यापीठाने जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या ५१ व्या दीक्षान्त समारंभामध्ये शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी.वाय पाटील यांना डी.लिट. ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी देऊन गौरविले होते. या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर होते. (छायाचित्रात) तत्कालीन कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली होती. सोबत (डावीकडून) तत्कालीन परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ. नारळीकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे आणि कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळ्ये दिसत आहेत.

यावेळी डॉ. डी.वाय. पाटील यांनी, मला आतापर्यंत अनेक विद्यापीठांनी डी. लिट. दिली. राज्यपाल असताना मी अनेकांना डी. लिट. प्रदान केली; परंतु आज माझ्या जन्मभूमी व कर्मभूमीतील विद्यापीठाने माझा सन्मान केला, ही बाब माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्याबद्दल मी शिवाजी विद्यापीठाचा कृतज्ञ असल्याची भावना डॉ. डी. वाय. पाटील व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे, शिवाजी विद्यापीठाकडून दर्जेदार विद्यार्थी घडविला जात आहे. त्याचा फायदा विधायक समाजनिर्मितीसाठी होत आहे. मानवाच्या जीवनात ज्यावेळी अहंकाराचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याचे खरे जीवन सुरू होते. ध्येय निश्‍चित असल्यास यश मिळते. ज्ञानासाठी धडपड करावी. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी पुस्तके वाचावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले होते.

 

गुरूकडून शिष्याचा सन्मान


दि. १३ एप्रिल २०२२ रोजी पद्मश्री डी.वाय. पाटील यांना शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि तत्कालीन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. यावेळी (छायाचित्रात डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास शिंदे, तत्कालीन प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, शांतादेवी डी. पाटील आणि प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत मंचावर उपस्थित होते.

यावेळी डॉ. डी.वाय. पाटील यांनी म्हटले होते की, प्राचार्य कणबरकर सर हे माझे गुरू आहेत. गुरूंच्या नावे असणारा पुरस्कार मला मिळाला, यामुळे उपकृततेची भावना मनी दाटली आहे. त्यामुळेच अन्य पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार माझ्यासाठी खूप वेगळा आणि जवळचा आहे. पूर्वी गुरूदक्षिणा दिली जायची, पण आज गुरूकडून शिष्याचा सन्मान झाला आहे, हे या पुरस्काराचे वेगळेपण आहे, अशी भावना व्यक्त केली होती.

तसेच, डॉ. डी.वाय. पाटील यांनी पुरस्काराच्या १ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेत आणखी १० लाख रुपयांची भर घालून तो निधी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याची घोषणा केली. या निधीमधून संतसाहित्याच्या क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार योजना निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. डॉ. पाटील यांच्या हस्तेच सदर ११ लाख ५१ रुपये इतक्या निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्यामधून सदर पुरस्कार योजना डॉ. डी. वाय. पाटील यांच्याच नावे विद्यापीठाने कार्यान्वित केली आहे.

(हे भाषण ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://youtu.be/PkRq7dArgNk)




डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शिक्षणाचा महामेरू हरपला: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील


कोल्हापूर, दि. ४ ऑगस्ट: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणारे महामेरू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी शोकभावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. कामत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात अतिशय महत्त्वाचे योगदान दिले. राज्याबरोबरच देशाच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांनी अत्यंत ध्येयनिष्ठपणे काम करीत असताना व्यावसायिक शिक्षणाचा विकास व विस्तार यांसाठी त्यांनी अव्याहत परिश्रम घेतले. त्यांच्या या परिश्रमातूनच डी.वाय. पाटील समूहाचा शैक्षणिक वृक्ष विस्तारला. व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवाहात सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांचे समावेशन डॉ. पाटील यांच्यामुळे शक्य झाले. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाने त्यांना सन २०१५ मध्ये डी.लिट. ही सर्वोच्च पदवी देऊन गौरविले. त्याचप्रमाणे सन २०२२ मध्ये विद्यापीठाचा प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कारही प्रदान केला. या पुरस्काराच्या रकमेच स्वतःकडील दहा लाख रुपयांच्या निधीची भर घालून संत साहित्याच्या क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार योजना सुरू करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार विद्यापीठाने पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील पुरस्कार प्रदान करण्यास सुरवात केली. डॉ. पाटील यांचा शिवाजी विद्यापीठ परिवाराशी प्रगाढ स्नेह होता. हा स्नेहभाव अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहिला. त्यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठ परिवारावरही दुःखाची छाया पसरली आहे. डॉ. पाटील यांना चिरशांती लाभो, अशी भावनाही कुलगुरूंनी व्यक्त केली आहे. 

Monday, 3 August 2026

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विश्वात्मक दृष्टीचे प्रगल्भ विचारवंत: डॉ. श्रीपाल सबनीस

शिवाजी विद्यापीठात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ. श्रीपाल सबनीस.

शिवाजी विद्यापीठात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ. श्रीपाल सबनीस. मंचावर (डावीकडून) डॉ. अक्षय सरवदे, डॉ. विलास शिंदे आणि डॉ. प्रभंजन माने.

(चर्चासत्राची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ३ ऑगस्ट: बहुसांस्कृतिक जाणीवा असणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे विश्वात्मक दृष्टीचे साहित्यिक होते, तसेच प्रगल्भ आणि परिपक्व विचारवंत म्हणूनही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने जयंतीनिमित्त आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची सांस्कृतिक भूमिका या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना ते आज बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते.

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि विचारांचा व्यापक पट उलगडताना सबनीस यांनी त्यांना केवळ शाहिर किंवा लोककलावंत म्हणून मर्यादित न पाहता, समतेचा, स्वातंत्र्याचा आणि मानवतावादाचा साक्षेपी विचार मांडणारा विश्वात्मक दृष्टीचा साहित्यिक म्हणून अधोरेखित केले. ते म्हणाले, अण्णा भाऊंच्या लेखणीमध्ये शोषण, जातिव्यवस्था, भांडवलशाही, ब्राह्मण्य आणि विषमतावादी व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष दिसून येतो; मात्र त्याचबरोबर त्यांच्यात संवादशीलता, समन्वयशीलता आणि सर्वसमावेशकताही होती. मार्क्स, आंबेडकर, फुले, शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकडोजी महाराज अशा विविध वैचारिक-सांस्कृतिक प्रवाहांचे संचित त्यांनी आत्मसात केले होते. अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या, शाहिरी, वगनाट्य आणि लोकनाट्यांमधून महाराष्ट्र, भारत आणि विश्वमानवतेचा व्यापक विचार व्यक्त होतो. त्यांचे साहित्य हे केवळ दलित किंवा एका जातीपुरते मर्यादित नसून सर्वसमावेशक, बहुसांस्कृतिक आणि जागतिक मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहे, असे सबनीस यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यविश्वाचा अभ्यास करताना त्यांच्या लेखनातील लोकजीवनाची खोल जाण, सामान्य माणसाविषयीची आस्था आणि सामाजिक वास्तवाचे तटस्थ चित्रण प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या कथांमधून केवळ दुःख, दारिद्र्य किंवा संघर्षच नव्हे, तर माणूसपणावरचा अढळ विश्वास आणि परिवर्तनाची उमेदही व्यक्त होते. आजच्या काळात अण्णा भाऊंच्या विचारांची अधिकाधिक गरज असून त्यांच्या साहित्याचा अभ्यास समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. अण्णा भाऊंनी मांडलेली समतेची, बंधुत्वाची आणि न्यायाची भूमिका ही नव्या पिढीला दिशा देणारी असून, त्यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते न राहता आचार-विचारांना प्रेरणा देणारे जीवनमूल्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, महामानवांची जातीजातींत वाटणी होणे गैर असून केवळ अस्मिता म्हणून त्यांना मिरविण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा गांभीर्यपूर्वक स्वीकार केला जाणे आवश्यक आहे. अण्णा भाऊ साठे यांनी लौकिकार्थाने शिक्षण नसतानाही निसर्गवाचन, परिसर वाचन, माणसांचं वाचन, वास्तव जीवनातील चटके आणि अनुभव यांच्यावर चिंतन केले. जागतिक साहित्याचे वाचन केले. त्यातून त्यांच्यात लेखन प्रेरणा जागल्या आणि वास्तव, आदर्श व त्यांच्या स्वप्नातील समाज यांचा मेळ घालत त्यांनी साहित्य निर्मिती केली. हा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

अण्णा भाऊंचा सांस्कृतिक हस्तक्षेप मौलिक

उद्घाटन सत्रानंतर झालेल्या परिसंवादात अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून तत्कालीन अभिजन सांस्कृतिक जाणीवांमध्ये जो हस्तक्षेप केला, तो अत्यंत मौलिक स्वरुपाचा होता. त्यामुळे साहित्याच्या मुख्य प्रवाहामध्ये दलित, शोषितांचा आवाज बुलंद झाला, असा सूर निघाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीष मोरे होते. परिसंवादात डॉ. मेघा पानसरे यांनी अण्णा भाऊंचे आंतरराष्ट्रीयत्व, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी अण्णा भाऊंच्या साहित्यातील फुले-आंबेडकरी जाणीवा आणि डॉ. अंबादास सकट यांनी महाराष्ट्राचे शेक्सपिअर अण्णा भाऊ साठे या विषयांवर मांडणी केली.

यावेळी अनिकेत कांबळे या विद्यार्थ्याने अण्णा भाऊ साठे यांना रॅप साँगद्वारे आभिवादन केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. अक्षय सरवदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शुभदा पाटील यांनी परिचय करून दिला. मनीषा कदम-देसाई, सरिता बनके यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रभंजन माने यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. ललिता सबनीस, डॉ. किसनराव कुराडे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. मच्छिंद्र गोेफणे, डॉ. कबीर दास, डॉ. उत्तम सकट, डॉ. नीलेश बनसोडे, विलास सोयम, अनिल म्हमाणे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 1 August 2026

गणित आणि संख्याशास्त्रामध्ये ‘एआय’चा पाया: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय एआय व मशीन लर्निंगविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. मंचावर (डावीकडून) डॉ. सोमनाथ पवार, डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. राजगुरू आणि डॉ. एस.आर. कुलकर्णी.

समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शिक्षक आणि विद्यार्थी.

कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट : कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया हा गणित आणि संख्याशास्त्रामध्ये असून विद्यार्थी आणि शिक्षकांनी या संदर्भातील मूलभूत संकल्पना भक्कम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा संख्याशास्त्र अधिविभाग आणि सेंटर फॉर एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (CoEAISD) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधान मंत्री उच्चतर शिक्षण अभियान या योजनेअंतर्गत "कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग" (Artificial Intelligence and Machine Learning) या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. कामत बोलत होते. संख्याशास्त्र अधिविभागाचे माजी प्राध्यापक डॉ. एस. आर. कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, संख्याशास्त्र विषयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांकडे कृत्रिम बुद्धिमत्तेमागील गणितीय व सांख्यिकीय तत्त्वे समजून घेण्याची क्षमता असते. त्याद्वारे त्यांनी मूलभूत संकल्पनांवर प्रभुत्व मिळवून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आत्मसात करावे. संख्याशास्त्र अधिविभाग आणि सेंटर फॉर एक्सलन्सने कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे, अभ्यासक्रम विकासाचे आणि शिक्षक प्रशिक्षण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

डॉ. एस. आर. कुलकर्णी म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अत्यंत गतीने बदल होत आहेत. ते समजून घेणे आवश्यक आहे. या झपाट्याने घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेत शिक्षकांनी सतत अद्ययावत ज्ञान आत्मसात करावे. विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत संकल्पनांची भक्कम पायाभरणी करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत केले. डॉ. सोमनाथ पवार यांनी प्रास्ताविक केले. अंजली मंगोरे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. एस. व्ही. राजगुरू यांनी आभार मानले.

या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील संख्याशास्त्र विषयाचे शिक्षक तसेच संख्याशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी सहभागी झाले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या विविध पैलूंवर डॉ. एस. आर. कुलकर्णी, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू तथा शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, श्री. एस. ई. परिट, डॉ. एस. एस. सुतार, डॉ. एस. व्ही. राजगुरू आणि डॉ. एस. डी. पवार यांनी मार्गदर्शन केले. आर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मशीन लर्निंग तंत्रांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. संजय गंजावे, डॉ. सचिन पाटील, डॉ. कुंदन कोंडके, प्रसेनजित कांबळे, शुभम पाटील, संजय पाटील, अमोल चव्हाण आणि डॉ. उल्का दिंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या लेखनाचा परीघ मानवतावादी: संजय कृष्णाजी पाटील

शिवाजी विद्यापीठात लोकशाही अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना संजय कृष्णाजी पाटील. मंचावर डॉ. नंदकुमार मोरे व डॉ. रणधीर शिंदे.


कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट: अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या लेखनाचा समग्र परीघ मानवतावादी आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कवी, नाट्यकर्मी व सिने-दिग्‍दर्शक संजय कृष्‍णाजी पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्‍या मराठी अधिविभागात लोकशाहीर अण्‍णा भाऊ साठे जयंती व लेखन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. नंदकुमार मोरे अध्यक्षस्थानी होते.

पाटील म्‍हणाले, अण्णाभाऊंना शाळेने अक्षर दिले नाही, पण त्यांनी मात्र मराठी साहित्याला प्रचंड शब्‍दभांडार दिले. या प्रतिभावंत साहित्यिकाने आपल्‍या एकूण कथासाहित्‍यात समाजातील दलित, उप‍ेक्षित, भटके, शहरी, ग्रामीण आणि झोपडपट्टी अशा सर्व घटकांच्या समस्‍यांचा वेध घेतला. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या साहित्‍याने लेखनबळ दिले. मराठी साहित्‍याला अपरिचित असलेल्या विश्‍वाचे दर्शन त्‍यांनी घडविले. संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या चळवळीला अण्‍णा भाऊंच्‍या लेखणीने प्रेरणा दिली.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. मोरे म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी विपुल साहित्य निर्मिती करून पुढील पिढ्यांना लेखन प्रेरणा दिली. त्यांच्या साहित्याची दिग्गज निर्माता दिग्दर्शकांना भुरळ पडली. त्यांच्या साहित्यकृतींवर चित्रपटही निघाले, तथापि, मराठी माणसांना अण्णा भाऊ खूप उशीरा समजले. लोकजीवनाला बांधून ठेवणाऱ्या अनेक साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी आपली लेखणी चालवली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी अतुलनीय योगदान दिले. त्यांचे माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन म्हणजे अभ्यासपूर्ण प्रवासाची दृष्टी कशी असायला हवी, याचा वस्तुपाठ आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा लेखन आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अनिता मिस्‍कूळ, अमोल देशमुख आणि विष्‍णू पावले यांनी मनोगते व्यक्त केली. अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्‍योती वराळे यांनी सूत्रसंचालन केले, तर रूपाली पाटील यांनी आभार मानले.

 

सामाजिक शास्त्रांमध्येही उपयुक्त संशोधन होणे आवश्यक: डॉ. जॅस्मिन

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन. शेजारी डॉ. प्रकाश पवार आणि डॉ. शार्दुल सेलुकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन.


कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट: विज्ञान क्षेत्रांमधील संशोधनाइतकेच सामाजिक शास्त्रांमधील संशोधनही उपयुक्त असून त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी व्यक्त केले. ग्रामीण विकासामध्ये जिल्हा परिषद अत्यंत मूलभूत व महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाद्वारे काल 'जिल्हा परिषदेच्या अभ्यासाची चौकट' या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यावेळी प्रमुख साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

डॉ. जॅस्मिन म्हणाल्या, बदलत्या काळात सामाजिक शास्त्रे मागे पडताना दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते संशोधन न करता आपल्या संशोधनाचा समाजाला प्रत्यक्ष कसा उपयोग होईल, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. संशोधनासाठी विषयाची निवड करताना सध्याची सामाजिक गरज काय आहे, हे ओळखूनच विषयांची निवड करावी, जेणेकरून या संशोधनातून समाजाला योग्य दिशा मिळेल.

यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेची प्रशासकीय रचना, तिचे प्रत्यक्ष कामकाज आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने तळागाळातील घटकांसाठी राबवले जाणारे विविध उपक्रम व विकास योजना यावर सविस्तर मांडणी केली.

संशोधनक्षम विद्यार्थ्यांकडून आत्मनिर्भर भारताकडे

तत्पूर्वी, कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करून त्यांची रोजगारक्षमता वाढवणे हे आहे. या धोरणात संशोधनालाही रोजगाराचे महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संशोधन क्षमता वाढवणे आणि त्यांच्यात संशोधन कौशल्ये विकसित करणे ही आजची गरज आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे यांनी संयुक्त संशोधन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.

'गाथा ग्रामविकासाची'मधून उलगडला अभ्यासपूर्ण प्रवास

कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी 'गाथा ग्रामविकासाची- कोल्हापूर जिल्हा परिषद: अनुभव आणि आठवणी' या विषयावर उपस्थितांशी सविस्तर संवाद साधला. ग्रामविकासाच्या अनेक चांगल्या आणि नाविन्यपूर्ण संकल्पना कागदावर अतिशय उत्तमरित्या उतरतात, परंतु त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र तितक्याच ताकदीने आणि प्रभावीपणे होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी गेल्या काही दशकांत बदलत गेलेल्या राजकारणाच्या आणि निवडणुकांच्या स्वरूपावर प्रकाश टाकला. ग्रामीण भागाचा कणा असलेल्या या मराठी शाळांच्या अडचणी सोडवून त्या टिकवणे आणि मजबूत करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्राचार्य डॉ. दिनकर पाटील अध्यक्षस्थानी होते.

कार्यशाळेला मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. भारती पाटील, डॉ. शार्दुल सेलुकर, डॉ. संजय सपकाळ, डॉ. नेहा वाडेकर, डॉ. दत्तात्रय सावंत यांच्यासह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा समन्वयक डॉ. सुखदेव उंदरे यांनी स्वागत केले. राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले. आयेशा अत्तार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्तात्रय सावंत यांनी परिचय करून दिला, तर डॉ. नेहा वाडेकर यांनी आभार मानले.