Wednesday, 25 March 2026

सौंदर्य विवेकातही प्रतिबिंबित व्हावे: डॉ. माया पंडित

नकाब एकांकिकेचे शिवाजी विद्यापीठात सादरीकरण


शिवाजी विद्यापीठात आयोजित एकांकिका सादरीकरण व मुक्तसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी. मंचावर (डावीकडून) डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. माया पंडित, डॉ. मच्छिंद्र गोफणे, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. चैत्रा राजाज्ञा.

शिवाजी विद्यापीठात आयोजित एकांकिका सादरीकरण व मुक्तसंवाद कार्यक्रमात बोलताना डॉ. माया पंडित. शेजारी डॉ. आलोक जत्राटकर आणि ओंकार वर्णे.

शिवाजी विद्यापीठात सादर झालेल्या 'नकाब' एकांकिकेमधील एका दृश्यात रमा घोलकर आणि मानसी बोळुरे.


शिवाजी विद्यापीठात सादर झालेल्या 'नकाब' एकांकिकेमधील एका दृश्यात मानसी बोळुरे आणि सहकलाकार.

(एकांकिका सादरीकरण व मुक्तसंवाद कार्यक्रमाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. २५ मार्च: सौंदर्य ही केवळ बाह्य गोष्ट नसून, ती आपल्या विचारांमध्ये आणि विवेकातही प्रतिबिंबित व्हायला हवी. आपण जे पाहतो तेच सत्य असतेच असे नाही; ‘नकाब’ आपल्याला या आभासी जगाचे भान करून देते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. माया पंडित यांनी काल (दि. २४) येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे शरण साहित्य अध्यासन, अहिल्यादेवी होळकर अध्यासन, हिंदी अधिविभाग आणि विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ओंकार वर्णे लिखित व दिग्दर्शित ‘नकाब’ या एकांकिकेचे सादरीकरण आणि त्यावर मुक्तसंवाद अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर मार्गदर्शक म्हणून, तर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.

नकाब या एकांकिकेच्या सादरीकरणाचे कौतुक करताना डॉ. पंडित म्हणाल्या, शारीरिक अभिव्यक्तीचे आकर्षण क्षणिक असते; पण विचारांची खोली आणि संवेदनशीलता माणसाला खऱ्या अर्थाने सुंदर बनवते, हे ‘नकाब’ खूप प्रत्ययकारकपणे दाखवते. माध्यमांनी निर्माण केलेल्या सौंदर्याच्या साच्यांमध्ये अडकून न राहता, स्वतःची ओळख शोधणे अधिक महत्त्वाचे आहे. सौंदर्यस्पर्धा आपल्याला एक प्रतिमा देतात; पण त्या प्रतिमेपलीकडील वास्तव समजून घेणे हीच खरी जाणीव आहे. तरुणाईने बाह्य आकर्षणाच्या मोहापेक्षा विवेक, मूल्ये आणि आत्मभान यांना प्राधान्य द्यायला हवे. शरीर आणि विचार यांचा समतोल साधला, तरच व्यक्तिमत्त्व परिपूर्ण बनते. महिलांची या वस्तुकरणातून सुटका करणे हीच आजघडीची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

उपलब्ध मंचीय व्यवस्थेमध्ये उत्तम सादरीकरणाविषयी डॉ. आलोक जत्राटकर यांनी ‘नकाब’च्या चमूचे अभिनंदन केले. ते म्हणाले, सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारपेठेच्या विस्तारासाठी सौंदर्यस्पर्धा साह्यभूत ठरतात. सौंदर्यस्पर्धा या केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून, त्या जागतिक भांडवलशाहीच्या बाजारपेठेचे प्रभावी साधन आहेत. सौंदर्य प्रसाधनांचा उद्योग हा अब्जावधींची उलाढाल करणारा बाजार आहे, जो ‘आदर्श सौंदर्य’ संकल्पनेची विक्री करतो. भांडवलशाही व्यवस्थेत सौंदर्य ही नैसर्गिक गोष्ट न राहता ‘उत्पादन’ बनते आणि त्याची मागणी कृत्रिमरीत्या निर्माण केली जाते. भारतीय बाजारपेठेची प्रचंड व्याप्ती लक्षात घेता, जागतिक ब्रँड्ससाठी ती एक मोठी आर्थिक संधी ठरते. माध्यमे आणि जाहिराती सौंदर्याचे विशिष्ट मापदंड तयार करतात, ज्यामुळे ग्राहकांची मानसिकता आणि खरेदीची प्रवृत्ती घडवली जाते. सौंदर्याच्या नावाखाली असुरक्षिततेची भावना निर्माण करून बाजारपेठ स्वतःची वाढ सुनिश्चित करते. आपण ‘सुंदर’ दिसण्यासाठी जे खर्च करतो, त्यामागे एक प्रचंड आर्थिक साखळी कार्यरत असते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

अध्यक्षीय मनोगतात अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी म्हणाल्या, महिला दिन हा केवळ उत्सव नसून, महिलांच्या आत्मसन्मान, समानता आणि स्वनिर्णयाच्या अधिकाराचा पुनरुच्चार आहे. सौंदर्याच्या संकल्पना बदलताना, महिलांनी स्वतःची ओळख आणि मूल्ये यांना केंद्रस्थानी ठेवणे, हेच खरे सक्षमीकरण आहे.

सुरवातीला शरण साहित्य अध्यासनाच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयसिंग कांबळे, प्रकाश निकम यांनी सूत्रसंचालन केले. चैत्रा राजाज्ञा यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुरेश शिपूरकर, डॉ. अनमोल कोठडिया, डॉ. चैत्रा राजाज्ञा, डॉ. मच्छिंद्र गोफणे, सरला पाटील, भारती पोवार, सुरेखा आडके, विलास आंबोळे, सुभाष महाजन, चंद्रशेखर बटकडली, यश आंबोळे, स्वाती कृष्णात, रेश्मा खाडे, ॲड. अंकिता त्रिभुवने, शुभांगी चितारी, महानंदा पाटील आदी उपस्थित होते.

नकाब एकांकिकेविषयी...

ओंकार वर्णे लिखित व दिग्दर्शित नकाब या मालिकेच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शारीर सौंदर्याच्या अशाश्वततेवर भाष्य करणाऱ्या या एकांकिकेत सौंदर्याच्या प्रचलित कृत्रिम संकल्पनांमध्ये अडकत जाऊन स्वतःचे अस्तित्व हरवून बसणाऱ्या एका तरुणीच्या स्वप्नांची ही कथा आहे. मानसी बोळुरे हिने ही मध्यवर्ती व्यक्तीरेखा खूप ताकदीने साकारली. तिच्याखेरीज यात ओंकारसह रमा घोलकर, साहिल बारस्कर, ऋतुराज पाटील, करण शेडगे, मयंक जैन आणि पवन यांनी अत्यंत चपखल भूमिका केल्या. प्रितेश पटेल यांचे पार्श्वसंगीत होते, तर पार्थ घोरपडे यांनी प्रकाशयोजना केली.


भ्रमाचे फुगे फोडत केले उद्घाटन

मुलगी शिकली; पण शिक्षणाचे उपयोजन काय?, महिला कमावत्या झाल्या; पण खर्चाचे स्वातंत्र्य आहे का?समाजात सर्वत्र मुक्त संचार; पण सुरक्षित भवताल दिला का?, महिलांसाठीचे कठोर कायदे; पण सन्मानाची जनभावना निर्माण झाली का? आणि वैवाहिक स्थिरता; पण सहजीवनाचे काय? असे भ्रम आणि वास्तव पुरुषी मानसिकतेतून समाजात निर्माण झाले. महिलांच्या उदात्तीकरणाचे असे भ्रमाचे फुगे चिकित्सेच्या टाचणीने फोडून वास्तवातील स्त्री प्रश्नांची जाणीव करून घेण्याची प्रतिकात्मक कृती करीत अभिनव पद्धतीने या मुक्तसंवादाचे उद्घाटन करण्यात आले.

मुक्तसंवादाच्या अभिनव उद्घाटन प्रसंगी डॉ.वर्षा मैंदर्गी यांच्यासमवेत (डावीकडून) डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. माया पंडित, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. मच्छिंद्र गोफणे आणि डॉ. चैत्रा राजाज्ञा.



Tuesday, 24 March 2026

सार्वजनिक सुविधांसाठीच्या निधीत जीएसटीचा ७५ टक्के वाटा: सहायक आयुक्त दीपाली पुजारी

शिवाजी विद्यापीठात आयोजित जीएसटीविषयक राष्ट्रीय चर्चासत्रातील परिसंवादात बोलताना कोल्हापूर जीएसटी कार्यालयाच्या सहायक आयुक्त दीपाली पुजारी. मंचावर (डावीकडून) दीपक पाटील, अजित कोठारी, गिरीष सामंत, डॉ. श्रीकृष्ण महाजन, श्रीकांत बच्चे, अजित चौगुले आणि साईता बारस्कर.


 

कोल्हापूर, दि. २३: एक देश, एक करधोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून देशात अनेक सुधारणा झाल्या आहेत. सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सोयीसुविधा पुरवण्यासाठी लागणाऱ्या निधीमध्ये ७५% वाटा वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) आहे, अशी माहिती कोल्हापूरच्या वस्तू व सेवा कर सहायक आयुक्त दीपाली पुजारी यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठाचा वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिविभाग आणि इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (नवी दिल्ली) यांच्या सहयोगाने आयोजित जीएसटी सुधारणा, डिजीटलायझेशन अँड इझ ऑफ डुईंग बिझनेस: मार्चिंग टुवर्ड्स विकसित भारत@२०४७ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये दुसऱ्या दिवशी त्या बोलत होत्या.

आज दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात "जीएसटी सुधारणांचा व्यवसाय आणि ग्राहकांवरील परिणाम" या विषयावरील परिसंवाद झाला. डॉ. केदार मारुलकर प्रास्ताविक केले. वस्तू आणि सेवा कराच्या नवीन रचनेमुळे खेळत्या भांडवली तुटवड्याला उद्योगांना सामोरे जावे लागेल, असे मत सी. ए. गिरीश सामंत यांनी मांडले. उद्योगपती अजित कोठारी यांनी इ-वे बिल मध्ये चुका दुरुस्त करण्यासाठी काही दिवसांची मुदत असावी, अशी आवश्यकता व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाचे अंतर्गत लेखापरीक्षक अजित चौगले यांनी शिक्षण संस्थांवर आकाराला जाणारा वस्तू आणि सेवा कर, विद्यार्थ्यांची करामुळे होणारी गैरसोय आणि सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अडचणी या गोष्टींवर प्रकाश टाकला. सेक्शन ६५ वर चर्चा करत शिक्षक प्रतिनिधी सी.ए. श्रीकांत बच्चे यांनी करातील तरतुदींवर आवश्यक सुधारणांची माहिती दिली. सी.ए. दीपक पाटील यांनी वार्षिक करारात व्हॅल्यू आणि रेट यांमुळे होणारी गैरसोय दूर करण्याची आवश्यकता व्यक्त केली. विद्यार्थी प्रतिनिधी साईता बारस्कर यांनीही आपले मत मांडले.

वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी भारताचे जबाबदार नागरिक म्हणून आपण करचुकवेगिरीला आळा घातला पाहिजे आणि करप्रणालीबाबत जागरूक असले पाहिजे, असे मत व्यक्त केले. विद्यार्थिनी वैशाली वाघमारे यांनी आभार मानले.

 



 

Monday, 23 March 2026

दिव्यांगांना निर्णयप्रक्रियेत प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक: ‘युजीसी’चे सहसचिव डॉ. मनोज कुमार


शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना युजीसीचे सहसचिव डॉ. मनोज कुमार.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना युजीसीचे सहसचिव डॉ. मनोज कुमार. मंचावर डॉ. प्रतिभा देसाई, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आदी.



कोल्हापूर, दि. २३ मार्च: दिव्यांगांना निर्णयप्रक्रियेत आणि राजकीय सहभागात पुरेसे प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. अपंगत्वाच्या आधारावर त्यांच्या बाबतीत भेदभाव केला जाऊ नये, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) सहसचिव डॉ.मनोज कुमार यांनी केले.

दिव्यांग व्यक्तींसाठीची युजीसी- योजना आणि शिवाजी विद्यापीठाचे सर्वसमावेशी शिक्षण संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ''उच्च शिक्षणसंस्था आणि विद्यापीठासाठी सुलभता मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके'' या विषयावर राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या. सेंटर फॉर डिसॅबिलिटीज् स्टडीज अँड सोशल वर्क, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथील अध्यक्षा डॉ.संध्या लिमये यांची कार्यशाळेला विशेष उपस्थिती होती.

डॉ. मनोज कुमार म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना समान संधी उपलब्ध होण्यासाठी सर्व तरतुदींची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. अपंगत्वाबाबत कोरडी सहानुभूती न दाखविता त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी समाजाने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. दिव्यांगांना शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. मतदान कक्ष, वाहतूक आणि आरक्षणांमध्ये दिव्यांगांना लाभ होण्यासाठी न्यायपालिकेने अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही केली आहे. मागील तीस वर्षांमध्ये शासनाने विविध माध्यमातून अनेक योजना राबविलेल्या आहेत. आवाजहीन अशा दिव्यांग बांधवांना समाजात ताठ मानेने जगण्यासाठी सहाय्य करावे. लोकसंख्येच्या सात टक्के असलेल्या दिव्यांगांचा आवाज संसदेमध्ये आणि राजकीय परीघामध्ये पोहचू शकत नाही. त्यांच्याकरिता स्वतंत्र आयोग असणे आवश्यक आहे. विकसित भारताकडे जात असताना सात टक्के दिव्यांग समाजाने मागे राहणे संयुक्तिक नाही. दिव्यांगांना प्रवासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. दिव्यांग महिलांना दुहेरी त्रासाचा सामना करावा लागतो. शाळा-महाविद्यालयांमध्ये रॅम्प, लिफ्ट, रेलिंग, दिव्यांगांसाठी सोयीस्कर शौचालय, ब्रेल लिपीतील फलक, अडथळामुक्त परिसराची पायाभूत सुविधा दिव्यांगांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव म्हणाल्या, विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.  साधारणपणे ४६ दिव्यांग विद्यार्थी विद्यापीठातील विविध अधिविभागांत शिकत आहेत. दोनशे दिव्यांग विद्यार्थी संलग्नित महाविद्यालयांत शिकत आहेत. सर्वसमावेशक शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींसाठी यूजीसी योजनेच्या समन्वयक डॉ.प्रतिभा देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथील सहा.प्राध्यापक डॉ. मधुरा नागचौधरी यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिविभागप्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विविध संस्थांचे दिव्यांग विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते. 


अनेक अडथळ्यांवर मात करीत ‘जीएसटी’ करप्रणाली देशात यशस्वी: सुरेंद्र माणकोस्कर

शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित जाएसटीविषयक दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ऑनलाईन मार्गदर्शन करताना बडोदा येथील जीएसटी आयुक्त सुरेंद्र माणकोस्कर.


शिवाजी विद्यापीठात आयोजित जाएसटीविषयक दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ऑनलाईन मार्गदर्शन करताना बडोदा येथील जीएसटी आयुक्त सुरेंद्र माणकोस्कर. मंचावर (डावीकडून) डॉ. तेजपाल मोहरेकर, डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. पांडुरंगा व्ही., डॉ. केदार मारुलकर.

शिवाजी विद्यापीठात आयोजित जाएसटीविषयक दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना कलबुर्गी येथील कर्नाटक केंद्रीय विद्यापीठाचे डॉ. पांडुरंगा व्ही. मंचावर  (डावीकडून) डॉ. तेजपाल मोहरेकर, डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. केदार मारुलकर.

शिवाजी विद्यापीठात आयोजित जाएसटीविषयक दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना कलबुर्गी येथील कर्नाटक केंद्रीय विद्यापीठाचे डॉ. पांडुरंगा व्ही.

(जीएसटी राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. २३ मार्च: विविध करप्रणालींच्या गुंतागुंतीतून मार्ग काढत ‘एक देश, एक कर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे मोठे आव्हानात्मक होते. तथापि, वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणाली अनेक अडथळ्यांवर मात करत देशात यशस्वीपणे स्थिरावल्याचे मत बडोदा येथील वस्तू व सेवा कर आयुक्त सुरेंद्र माणकोस्कर यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागातर्फे इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (नवी दिल्ली) यांच्या सहकार्याने आयोजित ‘जीएसटी सुधारणा, डिजिटलायझेशन अँन्ड ईझ ऑफ डुईंग बिझिनेस: विकसित भारत@२०४७कडे मार्गक्रमण’ या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते. कलबुर्गी येथील कर्नाटक केंद्रीय विद्यापीठातील विषयतज्ज्ञ डॉ. पांडुरंगा व्ही. हे बीजभाषक म्हणून तर विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी या प्रमुख उपस्थित होत्या.

सुरेंद्र माणकोस्कर म्हणाले, पूर्वी केंद्र व राज्य सरकारांच्या वेगवेगळ्या करांमुळे उद्योगांवर मोठा करभार होता. मनोरंजन कर, उत्पादन शुल्क, विक्रीकर, ऑक्ट्रॉय यांसारख्या अनेक करांचा एकत्रित परिणाम ७० ते ८० टक्क्यांपर्यंत जात असे. या पार्श्वभूमीवर जीएसटीमुळे एकसंध आणि सुलभ करप्रणाली निर्माण होऊन उद्योगांना दिलासा मिळाला. जीएसटी लागू करताना कर दरांचे एकीकरण, वस्तू व सेवांचे वर्गीकरण, कर संकलनाची पद्धत यांसारखी अनेक तांत्रिक आव्हाने होती. विविध राज्यांमध्ये कर महसूल वाटप, वस्तूंच्या पुरवठ्याचे मूल्य ठरवणे, तसेच ‘रोटी, कपडा आणि मकान’ या मूलभूत गरजांवर एकसमान कर लागू करणे ही मोठी कसरत होती. मात्र या सर्व अडचणींवर मात करत जीएसटी प्रणाली कार्यान्वित करण्यात यश आले.

उद्योग क्षेत्रासाठी जीएसटीने मोठी क्रांती घडवली असल्याचे सांगताना माणकोस्कर म्हणाले, व्यवसाय नोंदणी प्रक्रिया करण्यास पूर्वी ४० दिवस लागत. ती आता अवघ्या ३ ते ४ दिवसांत पूर्ण होत आहे. ऑनलाईन आणि ‘फेसलेस’ प्रणालीमुळे पारदर्शकता वाढली असून, देशभरातून व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. एका ठिकाणाहून संपूर्ण देशात व्यवसायाचे संचालन शक्य झाले आहे. जीएसटीमुळे उद्योगांचा विस्तार वेगाने होत असून पूर्वी मर्यादित क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योगांनी आता देशभर शाखा विस्तार सुरू केला आहे. मोठ्या लोकसंख्येच्या बाजारपेठेत प्रवेश मिळवणे सुलभ झाल्याने उद्योगांना नवी संधी उपलब्ध झाली आहे. तथापि, जीएसटी प्रणाली अजूनही विकसित होत असून, त्यात सुधारणा करण्याची गरज कायम आहे. करचुकवेगिरी, बनावट बिले यांसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तांत्रिक उपाययोजना सुरू आहेत. तसेच करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि उद्योगस्नेही करण्यासाठी आगामी काळात आणखी महत्त्वपूर्ण सुधारणा विचाराधीन असल्याचेही माणकोस्कर यांनी सांगितले.

आज जीएसटी अंतर्गत ५%, १२% आणि २८% असे तीन प्रमुख कर दर निश्चित करण्यात आले असून, सोन्या-चांदीसाठी ३% विशेष दर आहे. कर दरांची संख्या कमी करून प्रणाली अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यात ही रचना आणखी सोपी करून दोन करदरांच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

जीएसटी हा अप्रत्यक्ष करप्रणालीतील महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळेईझ ऑफ डुईंग बिझिनेस’ला मोठी चालना मिळाली असल्याचे आपल्या बीजभाषणात सांगताना डॉ. पांडुरंगा व्ही. म्हणाले, वस्तू व सेवा कर (जीएसटी) ही भारताच्या अप्रत्यक्ष करप्रणालीतील ऐतिहासिक आणि महत्त्वाची सुधारणा असून, देशाच्या आर्थिक प्रगतीत तिची निर्णायक भूमिका आहे. जीएसटीची अंमलबजावणी १ जुलै २०१७ रोजी करण्यात आली असून, ती अप्रत्यक्ष करप्रणालीतील ‘माईलस्टोन’ ठरली आहे. विविध करांचे एकत्रीकरण करून एकसंध कररचना निर्माण करण्यात जीएसटीने यश मिळवले आहे. देशातील पूर्वीची गुंतागुंतीची करप्रणाली—उत्पादन शुल्क, विक्रीकर, सेवा कर यांना एकत्र करून सुलभ प्रणाली तयार करण्यात आली आहे.

डॉ. पांडुरंगा म्हणाले, जीएसटी ही ‘कंझम्प्शन बेस्ड’ (उपभोगाधारित) करप्रणाली आहे. म्हणजेच ज्या राज्यात वस्तू किंवा सेवांचा वापर होतो, त्या राज्याला कर महसूल मिळतो. त्यामुळे करप्रणाली अधिक न्याय्य आणि पारदर्शक झाली आहे. यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ‘ऑरिजिन बेस्ड’ करप्रणालीत अनेक विसंगती होत्या, त्या दूर करण्यात जीएसटीने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताच्या संघराज्य रचनेनुसार ‘ड्युअल जीएसटी मॉडेल’ स्वीकारण्यात आले असून, केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये कर महसूलाचे योग्य विभाजन करण्यात आले आहे. यामध्ये सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी यांसारख्या कररचनांमुळे आंतरराज्यीय व्यवहार अधिक सुलभ झाले आहेत. यामुळे देशभर एकसमान बाजारपेठ निर्माण झाली आहे. ‘ईझ ऑफ डुईंग बिझिनेस’च्या दृष्टीने जीएसटी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. कर भरणा, रिटर्न फायलिंग, इनपुट टॅक्स क्रेडिट यांसारख्या प्रक्रिया डिजिटल आणि सुलभ झाल्याने उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्यवसाय सुरू करणे आणि विस्तार करणे अधिक सोपे झाले आहे. अलीकडेच ‘जीएसटी 2.0’ अंतर्गत काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या असून, करदरांचे सुलभीकरण, इनपुट टॅक्स क्रेडिट प्रणालीतील बदल आणि प्रक्रियांचे आधुनिकीकरण यावर भर देण्यात आला आहे. यामुळे करप्रणाली अधिक कार्यक्षम आणि उद्योगस्नेही होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी म्हणाल्या, माहिती तंत्रज्ञान आणि डिजीटल क्रांतीने नागरिकांचे जीवन आणि राहणीमान सुलभ केले. त्याचप्रमाणे जीएसटीने भारताच्या करप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणत उद्योगवाढ, पारदर्शकता आणि सुलभता यांना चालना दिली आहे. तंत्रज्ञानाधिष्ठित, प्रवाही, प्रभावी आणि पारदर्शक कररचनेचा हा नमुना असून देशाच्या भविष्यातील आर्थिक विकासासाठी मजबूत पाया प्रदान करण्याचे काम करीत आहे.

जीएसटी केवळ करप्रणाली नव्हे, तर देशाच्या आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगून अध्यक्षीय मनोगतात डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, जीएसटीमुळे देशातील करप्रणालीत आमूलाग्र बदल झाला असून, डिजिटलायझेशन आणि सुलभ प्रक्रियांमुळे उद्योग व व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. ‘ईझ ऑफ डुईंग बिझिनेस’च्या दृष्टीने जीएसटी महत्त्वपूर्ण ठरत असून, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यात तिचा मोठा वाटा आहे. जीएसटी सुधारणा, डिजिटलायझेशन आणि विकसित भारत २०४७ या संकल्पनांच्या अनुषंगाने अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम महत्त्वाचे ठरत असून, विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक यांना नव्या कल्पना व दिशादर्शन मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. केदार मारुलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. स्मिता कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. चर्चासत्रासाठी देशभरातील सुमारे १२५ संशोधकांनी नोंदणी केली असून दोन दिवसांत एकूण ४६ शोधनिबंध सादर केले जाणार आहेत.

दरम्यान, उद्घाटन सत्रानंतर दिवसभरात झालेल्या विविध सत्रांमध्ये मान्यवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जीएसटी सुधारणा या सत्रात सीए गिरीष कुलकर्णी, डॉ. वर्षा मैंदर्गी आणि डॉ. नितीन माळी यांनी सहभाग घेतला. जीएसटी गव्हर्नन्सचे डिजीटलायझेशन या विषयावरील सत्रात छत्रपती संभाजीनगरचे सीए उमेश शर्मा, प्राचार्य डॉ. एन.एल. कदम आणि अविनाश भाले यांनी सहभाग घेतला. अखेरच्या सत्रात डॉ. केदार मारुलकर यांच्या अध्यक्षतेखाली शोधनिबंध सादरीकरणाचे सत्र झाले.

 

Wednesday, 18 March 2026

स्वयंसिद्धा उपक्रमातून महिलांचे सामाजिक नेतृत्व घडेल: डॉ. प्रशांत नारनवरे

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वयंसिद्धा पोर्टलविषयक कार्यशाळेत ऑनलाईन मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे.



शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वयंसिद्धा पोर्टलविषयक कार्यशाळेत ऑनलाईन मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे. इनसेटमध्ये अवर सचिव विकास कुलकर्णी, तर मंचावर (डावीकडून) डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. अनुराधा पोतदार आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वयंसिद्धा पोर्टलविषयक कार्यशाळेत ऑनलाईन मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अवर सचिव विकास कुलकर्णी.



शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वयंसिद्धा पोर्टलविषयक कार्यशाळेत ऑनलाईन मार्गदर्शन करताना एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या स्वयंसिद्धा नोडल ऑफिसर डॉ. अनुराधा पोतदार.

(स्वयंसिद्धा कार्यशाळेची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १८ मार्च: स्वयंसिद्धा उपक्रमाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होऊन सक्षम सामाजिक नेतृत्व निर्माण होईल, असा विश्वास महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठात बेटी बचाव अभियान, विद्यार्थी विकास विभाग आणि स्वयंसिद्धा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वयंसिद्धा, स्त्रीशक्ती पोर्टल आणि आदिशक्ती’ या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ऑनलाईन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या.

डॉ. नारनवरे म्हणाले, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, रोजगार आणि सक्षमीकरण ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची आहे. या त्रिसूत्रीच्या आधारावर महिलांना सक्षम करून त्यांच्यातून नेतृत्व विकसित करण्याची गरज आहे. विशेषतः महिलांचा कार्यबलातील सहभाग वाढविणे ही आजघडीसाठी महत्त्वाची बाब आहे. स्वयंसिद्धा पोर्टल हे केवळ सोशल प्लॅटफॉर्म नसून शैक्षणिक व व्यावसायिक संवादाचे प्रभावी माध्यम असून विद्यार्थिनींनी व महिलांनी या पोर्टलचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. या प्लॅटफॉर्मद्वारे कौशल्यविकास, प्रशिक्षण, ऑनलाइन कोर्सेस, तसेच उद्योजकतेच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. तसेच, विविध उपक्रम, प्रशिक्षण आणि इंटर्नशिपच्या माध्यमातून महिलांची रोजगारक्षमता वाढविण्याबाबत शासन गंभीर आहे. डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करून महिलांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यपाल महोदयांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसिद्धा उपक्रमाला बळकटी देण्यात येत असून येणाऱ्या काळात या माध्यमातून उद्योजकीय आणि सामाजिक नेतृत्व मोठ्या प्रमाणात तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी लोकभवनचे अवर सचिव (शिक्षण) विकास कुलकर्णी यांनीही ऑनलाईन संवाद साधला. ते म्हणाले, स्वयंसिद्धा व स्त्रीशक्ती पोर्टल हे महिलांसाठी महत्त्वाचे डिजिटल व्यासपीठ असून यावर जास्तीत जास्त नोंदणी करून सक्रिय सहभाग आवश्यक आहे. केवळ नोंदणी करून न थांबता विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याची नोंद पोर्टलवर करणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या कामाचा डिजिटल ठसा निर्माण होऊन त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेता येतो.

या पोर्टलच्या प्रभावी वापरातून विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो, असे सांगून ते म्हणाले, पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि कौशल्यविकासाशी संबंधित उपक्रमांचे दस्तऐवजीकरण होऊन विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभव मिळतो. शासन निर्णय समजून घेणे, सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग घेणे आणि विविध योजनांमध्ये योगदान देणे हेही महिलांच्या सक्षमीकरणाचा महत्त्वाचा भाग आहे.

कार्यशाळेत एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या स्वयंसिद्धा नोडल ऑफिसर डॉ. अनुराधा पोतदार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन केले. शिक्षण, कौशल्यविकास आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर यांद्वारे महिलांचे सक्षमीकरण साधता येते, असे सांगताना त्या म्हणाल्या, स्वयंसिद्धाच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण तसेच आदिवासी भागातील प्रत्येक महिलेला जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पोर्टलवर नोंदणी करून महिलांना शिक्षण, प्रशिक्षण आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होता येते. कौशल्याधारित प्रशिक्षण देणे ही काळाची गरज असून विद्यार्थिनींना रोजगाराभिमुख बनविण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो. सुकन्या योजना, लखपती दीदी यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचविण्याच्या कामी विद्यार्थिनींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य, सुरक्षा, आर्थिक सक्षमीकरण आणि भारतीय ज्ञान प्रणाली या घटकांवर भर देत असतानाच महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आवाज उठवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, आज राज्यात स्वयंसिद्धा पोर्टलवर नोंदणी करण्यात शिवाजी विद्यापीठ अग्रेसर आहे. पण हे अग्रेसरत्व नोंदणीपुरते मर्यादित न राहता महिलांविषयक प्रश्न, अनुभव, समस्या निवारण आदींविषयक चर्चेचे सर्वंकष व्यासपीठ म्हणून पुढे येणे अभिप्रेत आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याचा उद्देश सफल होईल. महिला दिनासह अनेक प्रसंगांचे उत्सवीकरण टाळून त्यांचा विचारांच्या देवाणघेवाणीसाठी उपयुक्त वापर केला पाहिजे. शिक्षण, स्वास्थ्य, स्वावलंबन, सामाजिक न्याय, संवेदनशीलता आणि समानता या सहा बाबींवरच महिलांचे सक्षमीकरण अवलंबून आहे. त्यामुळे त्या प्रत्येक महिलेला कशा प्रदान करता येतील, यादृष्टीने पोर्टलवर चर्चा घडवून आणत राहणे अगत्याचे आहे.

सुरवातीला प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. बेटी बचाव अभियानाच्या डॉ. प्रतिभा देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. उज्ज्वला बिर्जे, सुप्रिया वडर यांनी सूत्रसंचालन केले, तर आकाश ब्राह्मणे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह विविध संलग्नित महाविद्यालयांतील स्वयंसिद्धा समन्वयक, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.