![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वयंसिद्धा पोर्टलविषयक कार्यशाळेत ऑनलाईन मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वयंसिद्धा पोर्टलविषयक कार्यशाळेत ऑनलाईन मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अवर सचिव विकास कुलकर्णी. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वयंसिद्धा पोर्टलविषयक कार्यशाळेत ऑनलाईन मार्गदर्शन करताना एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या स्वयंसिद्धा नोडल ऑफिसर डॉ. अनुराधा पोतदार. |
कोल्हापूर, दि. १८ मार्च: स्वयंसिद्धा
उपक्रमाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होऊन सक्षम सामाजिक नेतृत्व निर्माण
होईल, असा विश्वास महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव
डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठात बेटी बचाव अभियान, विद्यार्थी विकास विभाग आणि स्वयंसिद्धा सेंटर
यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वयंसिद्धा, स्त्रीशक्ती
पोर्टल आणि आदिशक्ती’ या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून
ऑनलाईन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.
ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या.
डॉ. नारनवरे म्हणाले, महिलांच्या
सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, रोजगार आणि सक्षमीकरण ही त्रिसूत्री
अत्यंत महत्त्वाची आहे. या त्रिसूत्रीच्या आधारावर महिलांना सक्षम करून
त्यांच्यातून नेतृत्व विकसित करण्याची गरज आहे. विशेषतः महिलांचा कार्यबलातील
सहभाग वाढविणे ही आजघडीसाठी महत्त्वाची बाब आहे. स्वयंसिद्धा पोर्टल हे केवळ सोशल
प्लॅटफॉर्म नसून शैक्षणिक व व्यावसायिक संवादाचे प्रभावी माध्यम असून विद्यार्थिनींनी
व महिलांनी या पोर्टलचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. या प्लॅटफॉर्मद्वारे
कौशल्यविकास, प्रशिक्षण, ऑनलाइन
कोर्सेस, तसेच उद्योजकतेच्या अनेक संधी उपलब्ध
होत आहेत. तसेच, विविध उपक्रम, प्रशिक्षण
आणि इंटर्नशिपच्या माध्यमातून महिलांची रोजगारक्षमता वाढविण्याबाबत शासन गंभीर
आहे. डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करून महिलांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे
आवाहनही त्यांनी केले.
राज्यपाल महोदयांच्या मार्गदर्शनाखाली
स्वयंसिद्धा उपक्रमाला बळकटी देण्यात येत असून येणाऱ्या काळात या माध्यमातून
उद्योजकीय आणि सामाजिक नेतृत्व मोठ्या प्रमाणात तयार होईल, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी लोकभवनचे अवर सचिव (शिक्षण)
विकास कुलकर्णी यांनीही ऑनलाईन संवाद साधला. ते म्हणाले, स्वयंसिद्धा व
स्त्रीशक्ती पोर्टल हे महिलांसाठी महत्त्वाचे डिजिटल व्यासपीठ असून यावर जास्तीत
जास्त नोंदणी करून सक्रिय सहभाग आवश्यक आहे. केवळ नोंदणी करून न थांबता विविध
उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याची नोंद पोर्टलवर करणे गरजेचे आहे. यामुळे
विद्यार्थिनींच्या कामाचा डिजिटल ठसा निर्माण होऊन त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेता
येतो.
या पोर्टलच्या प्रभावी वापरातून
विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो, असे सांगून ते म्हणाले, पोर्टलच्या
माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि कौशल्यविकासाशी संबंधित
उपक्रमांचे दस्तऐवजीकरण होऊन विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभव मिळतो. शासन निर्णय
समजून घेणे, सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग घेणे आणि
विविध योजनांमध्ये योगदान देणे हेही महिलांच्या सक्षमीकरणाचा महत्त्वाचा भाग आहे.
कार्यशाळेत एस.एन.डी.टी. महिला
विद्यापीठाच्या स्वयंसिद्धा नोडल ऑफिसर डॉ. अनुराधा पोतदार यांनी प्रत्यक्ष
उपस्थित राहून मार्गदर्शन केले. शिक्षण, कौशल्यविकास
आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर यांद्वारे महिलांचे सक्षमीकरण साधता येते, असे सांगताना त्या
म्हणाल्या, स्वयंसिद्धाच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण
तसेच आदिवासी भागातील प्रत्येक महिलेला जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या
पोर्टलवर नोंदणी करून महिलांना शिक्षण, प्रशिक्षण
आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होता येते. कौशल्याधारित प्रशिक्षण देणे ही काळाची
गरज असून विद्यार्थिनींना रोजगाराभिमुख बनविण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो. सुकन्या
योजना, लखपती दीदी यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ
पात्र महिलांपर्यंत पोहोचविण्याच्या कामी विद्यार्थिनींनी पुढाकार घ्यावा, असे
आवाहन त्यांनी केले. आरोग्य, सुरक्षा, आर्थिक
सक्षमीकरण आणि भारतीय ज्ञान प्रणाली या घटकांवर भर देत असतानाच महिलांनी स्वतःच्या
हक्कांसाठी आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आवाज उठवणेही तितकेच
महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ.
ज्योती जाधव म्हणाल्या, आज राज्यात स्वयंसिद्धा पोर्टलवर नोंदणी करण्यात शिवाजी
विद्यापीठ अग्रेसर आहे. पण हे अग्रेसरत्व नोंदणीपुरते मर्यादित न राहता महिलांविषयक
प्रश्न, अनुभव, समस्या निवारण आदींविषयक चर्चेचे सर्वंकष व्यासपीठ म्हणून पुढे
येणे अभिप्रेत आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याचा उद्देश सफल होईल. महिला दिनासह
अनेक प्रसंगांचे उत्सवीकरण टाळून त्यांचा विचारांच्या देवाणघेवाणीसाठी उपयुक्त
वापर केला पाहिजे. शिक्षण, स्वास्थ्य, स्वावलंबन, सामाजिक न्याय, संवेदनशीलता आणि
समानता या सहा बाबींवरच महिलांचे सक्षमीकरण अवलंबून आहे. त्यामुळे त्या प्रत्येक
महिलेला कशा प्रदान करता येतील, यादृष्टीने पोर्टलवर चर्चा घडवून आणत राहणे
अगत्याचे आहे.
सुरवातीला प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. बेटी बचाव अभियानाच्या डॉ. प्रतिभा देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. उज्ज्वला बिर्जे, सुप्रिया वडर यांनी सूत्रसंचालन केले, तर आकाश ब्राह्मणे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह विविध संलग्नित महाविद्यालयांतील स्वयंसिद्धा समन्वयक, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




No comments:
Post a Comment