![]() |
| कर्नाटक राज्य आदिवासी संशोधन केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती घेताना शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी. |
![]() |
| बंगळुरू येथील ओअॅसिस इंडिया या संस्थेच्या कामकाजाची माहिती जाणून घेताना शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी. |
कोल्हापूर, दि. ६ मार्च: समाजकार्याच्या
अभ्यासामध्ये सैद्धांतिकतेबरोबरच प्रत्यक्ष कार्यानुभवालाही मोठे महत्त्व आहे. ही
बाब लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी
कर्नाटक आणि तमिळनाडूतील काही महत्त्वाच्या सामाजिक, सेवाभावी संस्थांना भेट देऊन
त्यांच्या कार्याची माहिती घेतली.
शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाच्या
विद्यार्थ्यांनी नुकतीच कर्नाटकातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड
न्यूरोसायन्सेस, बंगळुरू, ओअॅसिस
इंडिया, कॅडबॅम्स हॉस्पिटल, अक्षयपात्रा फाऊंडेशन, स्टंप शूल अँड सोमप्पा
स्प्रिंग्ज प्रा. लि., बंगळुरू, राणे ग्रुप, मैसुरू, आदिवासी संशोधन केंद्र,
मैसुरू इत्यादी रुग्णालये, उद्योग समूह आणि स्थानिक सेवाभावी संस्थांना भेटी देऊन
तेथील सोयीसुविधांची माहिती घेतली. या अभ्यास सहलीत एकूण ३२
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समाजकार्य अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. उमेश गडेकर, डॉ.
उर्मिला दशवंत आणि सौरभ धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल पार पडली.
या अभ्यास सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना
वर्गात शिकविल्या जाणाऱ्या सैद्धांतिक संकल्पनांचा प्रत्यक्ष क्षेत्रात अनुभव देणे, विविध
सामाजिक संस्थांची कार्यपद्धती समजून घेणे आणि समाजकार्याच्या विविध क्षेत्रांतील
संधींबाबत व्यापक दृष्टीकोन निर्माण करणे हा होता. मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, पुनर्वसन, पोषण, आदिवासी
विकास, समुदाय संघटन आणि शाश्वत विकास या विविध क्षेत्रांचा विद्यार्थ्यांनी
अभ्यास केला.
बंगळुरूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ
अँड न्यूरोसायन्सेस येथे विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य सेवा, आधुनिक
निदान पद्धती आणि बहुविद्याशाखीय उपचार प्रणालीचा अभ्यास केला. समाजकार्य
विभागातील अधिकाऱ्यांनी मानसोपचार प्रक्रियेत समाजकार्यकर्त्यांची भूमिका, कुटुंब
समुपदेशन, पुनर्वसन आणि समुदाय आधारित मानसिक आरोग्य कार्यक्रमांची माहिती दिली.
ओअॅसिस इंडिया संस्थेला
दिलेल्या भेटीत विद्यार्थ्यांनी बेघर, व्यसनाधीन
व्यक्ती आणि रस्त्यावरच्या मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या पुनर्वसन कार्यक्रमांची
माहिती घेतली. तर, कॅडबॅम्स हॉस्पिटलमध्ये व्यसनमुक्ती उपचार, समुपदेशन
आणि दीर्घकालीन पुनर्वसन प्रक्रियेबाबत जाणून घेतले. बंगळुरूमधील अक्षयपात्रा
फाउंडेशन येथे विद्यार्थ्यांनी शालेय मध्यान्ह भोजन योजनेच्या
अंमलबजावणीतील अत्याधुनिक स्वयंपाकगृह, गुणवत्ता
नियंत्रण आणि वितरण व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास केला. म्हैसूर येथील आदिवासी
संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृती, परंपरा
आणि विकास धोरणांविषयी माहिती मिळाली. याशिवाय, मनुष्यबळ विकास शिकणाऱ्या स्टंप
शूल अँड सोमप्पा स्प्रिंग्ज प्रा. लि., बंगळुरू आणि राणे ग्रुप, मैसुरू येथे औद्योगिक
व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया आणि मानव संसाधन विकासाच्या पद्धतींचा अभ्यास केला.
उटी येथे विद्यार्थ्यांनी स्थानिक समुदाय व स्वयंसहायता गटांशी संवाद साधून शाश्वत
विकास, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या उपक्रमांविषयी
माहिती घेतली.


No comments:
Post a Comment