Wednesday, 4 March 2026

समाजकार्याचा प्रत्येक विद्यार्थी शाश्वत विकासाचे बीज: सिद्धार्थ शिंदे

चंदगड तालुक्यात सहभागी ग्रामीण मूल्यमापन शिबीराचा समारोप

शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागी ग्रामीण मूल्यमापन शिबिराच्या समारोप प्रसंगी सिद्धार्थ शिंदे यांच्यासमवेत अमोल मिणचेकर, मंजुषा मोहिते आदी.


कोल्हापूर, दि. ४ मार्च: समाजकार्याचा प्रत्येक विद्यार्थी हा शाश्वत विकासाचे बीज असून आपल्या परिसराच्या विकासामध्ये भरीव योगदान देण्यासाठी सक्षम असावा, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी केले.

मौजे जाम्बरे व मजरे शिरगाव (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या समाजकार्य विभागामार्फत २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत सहभागी ग्रामीण मूल्यमापन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात २८ विद्यार्थ्यांनी शिबिर समन्वयक डॉ. अमोल मिणचेकर व मंजुषा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणीय परिस्थितीचा सखोल व वस्तुनिष्ठ अभ्यास केला. शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव देणे तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून विकासाच्या गरजा ओळखणे हा होता. या शिबिराच्या समारोप समारंभात श्री. शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सिद्धार्थ शिंदे यांनी आपल्या मनोगतात समाजकार्य अभ्यासक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, समाजकार्य अभ्यासक्रम केवळ शासकीय नोकऱ्यांसाठीच नव्हे; तर, राजकारणेच्छु उमेदवारांसाठीही उपयुक्त आहे. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसराच्या शाश्वत विकासासाठी योदान देणे अभिप्रेत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील अर्थव्यवस्था शेतीप्रधान आहे. लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा करू इच्छिणाऱ्या युवकांनी किंवा शासकीय नोकरीत येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी या अभ्यासक्रमाचा लाभ योग्य प्रकारे घेतल्यास ग्रामीण जीवन अधिक उत्तम आणि शाश्वत बनण्यास मदत होईल.

या शिबिरादरम्यान मोबिलिटी मॅपिंग, सामाजिक नकाशा, संसाधन नकाशा, समस्या वृक्ष, कालबदल तक्ता आणि लक्षकेंद्री गट चर्चा या विविध साधनांचा वापर करण्यात आला. या प्रक्रियेतून गावातील पाणीटंचाई, बेरोजगारी, शेतीतील घटते उत्पन्न, युवकांचे स्थलांतर, महिलांच्या मर्यादित हालचाली आणि पर्यावरणीय समस्या यांचे मूळ कारणांसह विश्लेषण करण्यात आले. महिला, युवक, शेतकरी व ज्येष्ठ नागरिक यांच्या स्वतंत्र चर्चांमधून स्थानिक अडचणी आणि विकासाच्या संधी स्पष्ट झाल्या. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे समस्यांचे परस्परसंबंध समजून घेता आले आणि स्थानिक स्तरावर अमलात आणता येतील अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या. पाणी व्यवस्थापन सुधारणा, कौशल्य विकास प्रशिक्षण, महिला उद्योजकतेला चालना, पर्यावरण संवर्धन उपक्रम आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे  व स्कूलचे संचालक डॉ. नितीन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागावर आधारित गावाच्या शाश्वत विकासासाठीचा हा दिशादर्शक उपक्रम यशस्वी ठरला.

No comments:

Post a Comment