Saturday, 28 February 2026

धोरणात्मक निर्णयांमध्ये सर्वेक्षणांची भूमिका महत्वाची: डॉ. गीता सिंग राठोड

राष्ट्रीय अर्थमिती परिषदेची विद्यापीठात सांगता

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या सांगता समारंभात बोलताना सांख्यिकी मंत्रालयाच्या महासंचालक डॉ. गीता सिंग राठोड. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रदीप्तरथी पांडा, डॉ. महादेव देशमुख, डॉ. उषा थोरात, डॉ. नीरज हातेकर, डॉ. के. षण्मुगन, डॉ. व्ही.एम. पाटील.  

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या सांगता समारंभात बोलताना सांख्यिकी मंत्रालयाच्या महासंचालक डॉ. गीता सिंग राठोड.


(अर्थमिती परिषदेच्या सांगता समारंभाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: शैक्षणिक संशोधनाबरोबरच शासकीय आणि संस्थात्मक धोरणात्मक निर्णयांसाठी विविध प्रकारची सर्वेक्षणे महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मत केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या महासंचालक डॉ. गीता सिंग राठोड यांनी आज व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र अधिविभाग (स्वायत्त), भारतीय अर्थमिती संस्था आणि डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय अर्थमिती संस्था हीरकमहोत्सवी (६० व्या) वार्षिक राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भारतीय अर्थमिती संस्थेचे डॉ.नीरज हातेकर होते, तर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. उषा थोरात आणि प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. गीता सिंग राठोड म्हणाल्या, रोजगार पद्धती, उद्योग गतिशीलता, औद्योगिक कामगिरी आणि गुंतवणूक वर्तन हे भारताच्या आर्थिक परिवर्तनाचे मुख्य प्रवर्तक घटक आहेत. ते नेमकेपणाने समजून घेण्याच्या कामी सर्वेक्षणे मदत करतात. चांगले संशोधन चांगल्या डेटाच्या उपलब्धतेमुळे सुरु होते. मजबूत आकडेवारी हे भारताचे बलस्थान आहे. सर्वेक्षणांमुळे धोरणात्मक निर्णय देखील अधिक प्रभावी झाल्याचे दिसतात. सांख्यिकी आपल्याला तथ्ये देते, अर्थमिती आपल्याला स्पष्टता देते आणि एकत्रितपणे ते समाजाला सूज्ञपणे निवड करण्याचा आत्मविश्वास देतात. भारताला अशा तरुण विद्वानांची गरज आहे, जे तांत्रिक कौशल्य आणि सामाजिक उद्देशाची सांगड घालू शकतील. सांख्यिकीय माहितीच्या आधारे आपणास कोणत्याही क्षेत्रातील विश्लेषण करता येते. नियोजन आणि प्रगतीसाठी त्याचा उपयोग होतो, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी डॉ. उषा थोरात म्हणाल्या, सन १९९१ मध्ये रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे देशाने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आणि चलन व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले. तेव्हापासून देशाच्या अर्थव्यवस्थेने आपल्या प्रगतीचा वेग कायम राखला आहे.

यावेळी डॉ.नीरज हातेकर, डॉ. महादेव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. तर, भारतीय अर्थमिती संस्थेचे सचिव डॉ. के. षण्मुगन यांनी परिषदेचा आढावा सादर केला. संस्थेचे खजिनदार डॉ. प्रदीप्तरथी पांडा यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment