शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याला प्रचंड प्रतिसाद
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याच्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याच्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याच्या उद्घाटन समारंभात लघुचित्रफीतीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शुभसंदेश दिला. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्यासाठी आलेल्या उमेदवारांना माहिती देण्यासाठी विद्यापीठ परिसरात विविध ठिकाणी माहिती कक्षांची निर्मिती करण्यात आली. |
कोल्हापूर, दि. २२ फेब्रुवारी: आज युवकांना रोजगार
संधींची आवश्यकता आहेच, पण त्यांना रोजगार देत असताना रोजगारदात्यांनी किमान
वेतनाची हमी सुद्धा देणे आवश्यक आहे, असे आवाहन राज्याचे उद्योग व मराठी भाषा
मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार
कक्ष, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याच्या
उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू
डॉ. ज्योती जाधव होत्या, तर खासदार धैर्यशील माने, माजी परराष्ट्र सचिव डॉ.
ज्ञानेश्वर मुळे प्रमुख उपस्थित होते.
मंत्री सामंत यांनी यावेळी
महाराष्ट्राच्या औद्योगिक वृद्धीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती
दिली. त्याच बरोबरीने कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ विकासासाठी महाराष्ट्र
शासनातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली. ते म्हणाले, यंदा दाव्होस
इथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने विक्रमी ३० लाख कोटी इतक्या
रकमेच्या गुंतवणुकीसाठीचे सामंजस्य करार केले आहेत. मागील काही वर्षांत टाटा
उद्योग समूहाने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून राज्यात गडचिरोलीसह
रत्नागिरी, कल्याण-डोंबिवली, बीड, नाशिक इत्यादी ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे
उभारण्यासाठी एकूण ८५० कोटी रुपयांचा निधी दिला. त्या माध्यमातून स्व. रतन टाटा
कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. अशा केंद्रांची ठिकठिकाणी उभारणी
करून उद्योगांना आवश्यक कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचे उद्दिष्ट
शासन बाळगून आहे. राज्यातील प्रत्येक विद्यापीठाने दोन एकर जागा दिल्यास
त्याठिकाणी शासनातर्फे सुसज्ज आणि अद्यावत कौशल्य विकास केंद्र निश्चितपणे उभारता
येणे शक्य आहे, जेणे करून स्थानिक पातळीवर युवक-युवतींना आवश्यक कौशल्ये प्रदान
करता येतील. प्रशिक्षित मनुष्यबळ घडविणे ही सुद्धा विद्यापीठांची जबाबदारी आहे.
मंत्री सामंत म्हणाले, रोजगार
मेळाव्यांमध्ये विविध उद्योग-व्यवसाय सहभागी होतात. त्यांना आवश्यक मनुष्यबळही ते
निवडून घेतात. तथापि, त्या निवडलेल्या उमेदवारांना किमान वेतन देतात का, याचीही
खातरजमा करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विद्यापीठाने सदर कंपन्यांच्या मनुष्यबळ
अधिकाऱ्यांसमवेत दरमहा बैठक घेऊन या रोजगार मेळाव्याच्या फलश्रुतीची तपासणी करावी
आणि आवश्यक तेथे त्यांना योग्य निर्देश द्यावेत. जे युवक स्वयंरोजगारेच्छुक आहेत,
त्यांच्यासाठीही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत सेवा आणि उत्पादन
क्षेत्रासाठी ३५ टक्के सबसिडीसह अनुक्रमे ५० लाख आणि १ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध
करून देण्यात येते. नोकरी करण्याऐवजी देणारे होण्यास इच्छुकांनी या योजनेचा लाभ
घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कोल्हापूरमध्ये सहा महिन्यांत आयटी पार्क स्थापन होईल, याची ग्वाही सुद्धा मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
चंद्रकांत दादा पाटील हे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी
लघुचित्रफीतीद्वारे आपला शुभसंदेश पाठविला. शिवाजी विद्यापीठाने इतक्या मोठ्या
प्रमाणात नोकरी मेळाव्याचे आयोजन केले, याचा आनंद वाटत असून स्थानिक युवक-युवतींना
त्याचा निश्चितपणे लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, एकीकडे
उद्योजक कामाला माणसे मिळत नाहीत, असे म्हणतात तर दुसरीकडे युवकांच्या हाताला काम
नाही, असे चित्र दिसते. हा विरोधाभास संपुष्टात आणण्यासाठी कौशल्याधिष्ठित
मनुष्यबळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्राचा उद्योग विभाग हरतऱ्हेचे प्रयत्न करीत
आहे. याचा युवकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला पाहिजे.
माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर
मुळे म्हणाले, कोल्हापूर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. या भूमीचे काही देणे
लागतो, या भूमिकेतून फौंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. देशात
साधारणतः १० कोटी बेरोजगार आहेत. त्याचप्रमाणे कोट्यवधी रोजगारही उपलब्ध आहेत. या
दोहोंची सांगड घालत देशातील गुणवत्तावान युवा पिढीला रोजगार उपलब्ध करून
देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता विकास ही
त्रिसूत्री घेऊन फौंडेशन काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठ विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष
प्रा. एन.डी. पाटील यांनी युवा पिढीने रोजगारांसाठी आवश्यक विविध जीवनकौशल्ये
आत्मसात करावीत, असे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्र-कुलगुरू
डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, रोजगार महामेळाव्याला उमेदवारांचा लाभलेला प्रतिसाद
लक्षणीय स्वरुपाचा आहे. डॉ. मुळे यांच्या कोल्हापूरवरील प्रेमामुळेच हा मेळावा
घेणे शक्य झाले आहे. उद्योगमंत्री श्री. सामंत यांची या निमित्ताने लाभलेली
उपस्थिती ही प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार रोजगाराभिमुख पात्र
उमेदवारांना आवश्यक कौशल्ये प्रदान करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील
राहील.
सुरवातीला मंत्री उदय सामंत यांच्या
हस्ते दीपप्रज्वलनाने नोकरी महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या मध्यवर्ती
रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला राज्यपालनियुक्त
व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह स्वागत परुळेकर, संजय परमणे,
जी.बी. दीक्षित यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, विभाग प्रमुख, शिक्षक,
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
९०००
जागांसाठी १७००० उमेदवारांची उपस्थिती
शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय
नोकरी महामेळाव्यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक अशा
एकूण १३५ कंपन्या सहभागी झाल्या. एकूण ९००० जागांसाठी उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती
त्यांनी घेतल्या. त्यासाठी विविध अधिविभागांत २५० मुलाखत कक्ष निर्माण करण्यात आले.
या मुलाखतींसाठी आज विद्यापीठाच्या कॅम्पसवर सुमारे १७००० उमेदवार उपस्थित होते.
यामध्ये आठवीपासून ते पीएच.डी.पर्यंतच्या उमेदवारांचा समावेश राहिला. ऑनलाईन
पद्धतीने सुमारे ६००० उमेदवारांनी नोंदणी केली असल्याची माहिती डॉ. कोंबडे यांनी
दिली.







No comments:
Post a Comment