शिवाजी विद्यापीठात ल्युसोफोन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
![]() |
| चित्रपट महोत्सवाचे माहितीपत्रक |
कोल्हापूर, दि. ११ फेब्रुवारी: चित्रपट हे साहित्य, समाज आणि
वास्तव जीवनाशी जोडलेले प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन
लिस्बन (पोर्तुगाल) येथील कमॉईश इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. डेल्फिम कोरेइया द
सिल्वा यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा विदेशी भाषा अधिविभाग आणि कमॉइश इन्स्टिट्यूट
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या ल्युसोफोन चित्रपट
महोत्सवाचे उद्घाटन द सिल्वा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात हा तीनदिवसीय महोत्सव सुरू आहे.
डॉ. डेल्फिम कोरेइया द सिल्वा म्हणाले, चित्रपटांमधून विविध देशांचे धर्म, संस्कृती, भाषा आणि मानवी अनुभव समजून घेता येतात.
कल्पनारम्य कथादेखील वास्तव जीवनातूनच जन्म घेतात आणि मानवी मूल्यांची जाणीव करून
देतात. या महोत्सवाच्या माध्यमातून विविध देशांची भाषा, संस्कृती,
इतिहास आणि मानवी मूल्यांचा परिचय विद्यार्थ्यांना होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पोर्तुगालचे भारताशी असलेले जुने संबंध तसेच
या मैत्रीपूर्ण संबंधांचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांनी चित्रपट हे जागतिक भाषा, संस्कृती, भूगोल आणि इतिहास
समजून घेण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. मराठा साम्राज्याच्या इतिहासात
पोर्तुगीजांच्या ऐतिहासिक संदर्भांची मोलाची मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले.
विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. अक्षय सरवदे यांनी कमॉइश
इन्स्टिट्यूटसोबतच्या सामंजस्य कराराविषयी उपस्थितांना अवगत केले. माजी
विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी पोर्तुगाल भेटीचा अनुभव आणि गतवर्षी आयोजित
पोर्तुगीज व ब्राझिलियन चित्रपट महोत्सवांचे स्मरण करून दिले. विद्यार्थ्यांना
विदेशी संस्कृती आणि साहित्याशी जोडणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे
त्यांनी नमूद केले.
यावेळी इंग्रजी अधिविभागप्रमुख डॉ. प्रभंजन माने, स्नेहल शेट्ये आदी
उपस्थित होते. कार्यक्रमाचे अदिती दळवी यांनी सूत्रसंचालन केले, तर ज्योती पाटील यांनी आभार मानले.
जागतिक पुरस्कारप्राप्त चित्रपट पाहण्याची संधी
या चित्रपट महोत्सवात तीन दिवसांत जागतिक पुरस्कारप्राप्त पोर्तुगीज
आणि ब्राझिलियन अशा दहा चित्रपटांचे प्रदर्शन होणार असून विविध विद्यापीठे व
महाविद्यालयांतील विद्यार्थी त्यात सहभागी झाले आहेत. या महोत्सवाचा सर्वांनी आनंद
घ्यावा, असे आवाहन डॉ. सरवदे यांनी केले आहे.



No comments:
Post a Comment