शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'सुगम्यविज्ञान' उपक्रम
![]() |
| शिवाजी विद्यापीठाच्या सुगम्यविज्ञान उपक्रमांतर्गत स्पर्श, गंध व चवीतून वनस्पतींची ओळख करून घेताना दृष्टीदिव्यांग विद्यार्थी. |
कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: शिवाजी
विद्यापीठाने यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दृष्टीदिव्यांग
विद्यार्थ्यांसाठी ‘बीजारोपण ते उत्पादन’ या विषयावर विशेष ‘सुगम्यविज्ञान’ हा उपक्रम आयोजित
केला. याअंतर्गत स्पर्श, गंध, आकार आणि चवीच्या माध्यमातून विविध वनस्पती ओळखण्याचे
तंत्र या विद्यार्थ्यांना आत्मसात करता आले. वनस्पतीजगताची अनोखी ओळख आणि अनुभव या
विद्यार्थ्यांना घेता आला.
राष्ट्रीय विज्ञान दिन – २०२६ अंतर्गत
शिवाजी विद्यापीठात युजीसी स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज आणि समावेशी शिक्षण
संसाधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दृष्टि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
अनुभवाधारित विज्ञान उपक्रम राबविण्यात आला. बीजरोपणापासून उत्पादनापर्यंतच्या
प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करत वनस्पतींची वाढ, बियांची
रचना, अंकुरण प्रक्रिया, रोपांची
निगा आणि शेतीतील उत्पादन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना
विविध फळे, मसाले, औषधी
व सुगंधी वनस्पतींचे स्पर्श, गंध तसेच चव यांच्या माध्यमातून ओळख
करून देण्यात आली.
या उपक्रमात सुशिलाबाई घोडावत अंध
विद्यालय (सांगली-मिरज), ज्ञान
प्रबोधन भवन संचलित अंध विद्यालय (कोल्हापूर)
आणि श्री सद्गुरु धोंडीराज निवासी अंध विद्यालय (पलूस)
येथील सुमारे शंभर दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांच्यासोबत
त्यांचे शिक्षक आणि पालकही उपस्थित होते. स्पर्श, सुगंध, चव
आणि आकार यांच्या आधारे वनस्पती ओळखण्याचा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रयत्न केला.
कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. माधुरी वाळवेकर, संयोजक डॉ. एस. आर. यंन्कंची, युजीसी स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटीज आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्राच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा जाधव आणि डॉ. एस. ए. पाटील यांनी उपक्रमाचे नियोजन केले.


.jpeg)

No comments:
Post a Comment