कोल्हापूर, दि.18 फेब्रुवारी - ज्यावेळी माणूस स्वत:च्या पलीकडे जाऊन विचार करतो त्यावेळेस तो इतिहास घडवतो, असे प्रतिपादन पुणे येथील शिवचरित्र अभ्यासक श्रीमती सुलभा सत्तुरवार यांनी आज येथे केले.
विद्यापीठातीच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी, संशोधक विद्यार्थी आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'अष्टावधानी शिवराय' या विषयावर व्याख्यान देताना प्रमुख वक्ते म्हणून शिवचरित्र अभ्यासक सुलभा सत्तुरवार बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव होत्या.
पुढे बोलताना सुलभा सत्तुरवार म्हणाल्या, आजच्या काळामध्ये पालक आपल्या मुलांना कसे घडवायचे याबाबत सातत्याने विचार करताना दिसतात.400 वर्षांपूर्वीचा जो काळ होता त्यावेळी परकीय सत्ता याठिकाणी होती.अशा कठीण काळामध्ये शिवाजी महाराजांच्या आई, वडीलांनी काय विचार केले असतील, हे समजून घेतले पाहिजे.अष्टपैलू व्यक्तिमत्व एका दिवसात तयार होत नाही.त्यासाठी प्रचंड कष्ट आणि त्याग करावा लागतो.शिवाजी महाराजांना घडविण्यामध्ये वडील शहाजीराजे आणि माता जिजाऊंचा वाटा अत्यंत मोलाचा आणि पायाभूत होतो.त्या काळामध्ये जमीन नागरणे म्हणजे अपशकून समजले जात होते.माता जिजाऊंनी बालशिवाजींच्या हस्ते जमीन नागरायला लावली, हे फार मोठे क्रांतीकारी पाऊल उचलले गेले, यामुळे जनतेमध्ये प्रचंड उभारी निर्माण झाली.जिजाऊमाता लोकांमध्ये जावून राहिल्याने रयतेचा त्यांनी विश्वास संपादीत केला.यासर्वं गोष्टींचा शिवाजी महाराजांवर फार मोठा परिणाम झाला.धर्मशास्त्र,
युध्दशास्त्र, राज्य कारभार या सर्वांचे ज्ञान त्यांना देण्यात आले.नवनिर्मिती करावयाची असेल तर दुबळे राहून चालणार नाही, हे माता जिजाऊंनी ओळखले होते आणि त्या त्याच पध्दतीने शिवरायांना घडवित गेले. विजय प्राप्तीसाठी कर्मभूमीचा इतिहास आणि भूगोल याचे संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. यासाठी संपूर्ण परिसर बालशिवरायांनी पिंजून काढला.गरीब, श्रीमंत, जातीभेद हा भेद ठेवला नाही.हेच त्यांचे धोरण स्वराज्याच्या बळकटीसाठी अत्यंत महत्वाचे ठरले.प्रत्येक गोष्टीमध्ये सुक्ष्म नियोजन ते करीत होते.त्यामुळे त्यांची ताकद कमी असतानाही त्यांना यश मिळत गेले.जगावेगळे इतिहास घडवणारे शिवाजी महाराज वैयक्तिक सुख-दु:ख बाजुला ठेवले होते.रयतेचे नुकसान त्यांनी कधीही होवू दिला नाही.सर्व जनता त्यांना एकसमान होती.राजांनी प्रसंगी स्वत: जोखिम पत्करून शाहिस्तेखानावर हल्ला केला. ते इतिहासातील पहिले 'सर्जिकल स्ट्राईक' होते. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचा शेतसारा राजे माफ करीत होते.त्यांच्या काळामध्ये शेतकरी आणि रयत समाधानी राहिले होते. शिवाजी महाराजांच्या थोर पराक्रमाची शत्रुंना प्रचंड भिती होती.पन्नास वर्षांच्या आयुष्यामध्ये महाराजांनी अनेक गड आणि किल्ले उभे करून त्यांचे चोख व्यवस्था निर्माण करणारे जगातील एकमेव राजे होते.प्रत्येकाने आंतरीक मनाने चिंतन करून शिवविचार जागृत केले पाहिजे.
तत्पूर्वी, गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर येथील उपप्राचार्य, डॉ.एन.टी.पाटील यांच्या 'स्वराज्यगाथा' या काव्य संग्रह पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पुस्तक प्रकाशन प्रसंगी बोलताना कुलसचिव डॉ.विलास शिंदे म्हणाले, एेतिहासिक विषयावर कविता लिहिणे हे अवघड काम आहे.भाषेचे ज्ञान, इतिहासाचे भान आणि कवी मन या तिन्हींचा त्रिविणे संगम या काव्य संग्रहामध्ये झालेला दिसून येतो.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य-कर्तुत्वावर 85 कविता लिहिण्याचे शिवधनुष्य डॉ.एन.टी.पाटील यांनी पेलले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांचे कार्य आणि विचार मनामध्ये कायम राहण्यासाठी हा कार्यक्रम विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आला आहे.राष्ट्रभावना लोकांमध्ये रूजविण्यासाठी काय योग्य आहे याचे आकलन असणारे महान राजे होते.शिवाजी महाराजांचे कार्य आणि कर्तुत्वांचा विचार करून हे काव्यसंग्रह निर्मित केलेले आहे, ती प्रत्येकांने वाचावी.
आपल्या मनोगतामध्ये उपप्राचार्य डॉ.एन.टी.पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मानवी इतिहासातील अजरामर नांव आहे.एक माणूस म्हणून शिवाजी महाराजांच्या ज्या भावना होत्या त्या सादर करण्याचा प्रयत्न या काव्यसंग्रहाच्या रूपाने केला आहे.अत्यंत कुशलतेने डावपेच अखणारे, प्रचंड बुध्दीमत्ता धारण करणारेे, जनतेचे कैवारी असे राजे होते.शिवरायांचे वडील शहाजीराजे, माता जिजाऊ यांनी संस्कार, स्वराज्याचे स्वप्न, शिक्षण आणि युध्दकला, शिस्त आणि धाडस, स्वावलंबी आणि निर्भय राहण्याचे शिक्षण दिले.शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हे काव्यसंग्रह विद्यापीठामध्ये प्रकाशित होत आहे हे माझे भाग्य समजतो.
अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पगडा आपल्यामध्ये आणून विद्यार्थ्यांनी त्यांचे आयुष्य घडवावे.स्वराज्य निर्मिती, सुशासन, महिलांचा सन्मान, अभेद्य किल्ल्यांचे व्यवस्थापन आणि नौदलाचा पाया रचून रयतेचे कल्याणकारी राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केले.
तदनंतर, युवाशाहीर डॉ.अमोल रणदिवे आणि सहकार्यांनी शाहिरी पोवाडाचे उत्कृष्ट सादरीकरण केले.तसेच, विद्यार्थ्यांनी, अथक परिषमातून साकारलेले महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन व शिवराज्याभिषेक सोहळाचे उत्तम सादरीकरण करून दाखविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधक विद्यार्थी सद्दाम मुजावर यांनी केले तर प्रमुख वक्त्यांची ओळख संशोधक विद्यार्थी शुभम गिरीगोसावी यांनी केले. सशोधक विद्यार्थी मोहिनी सुर्वे, अनिता पवार यांनी सुत्रसंचालन केले तर संशोधक विद्यार्थी सौरभ पवार यांनी आभार मानले.यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.तुकाराम चौगुले, क्रीडा विभागाचे संचालक डॉ.शरद बनसोडे, डॉ.प्रल्हाद माने, बालशिवाजींचे वेशभूषा केलेले स्वराज्य गावडे, गोखले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंगराव भूयेकर यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनी, संशोध विद्यार्थी आणि शिवप्रेमी जनता मोठया प्रमाणात उपस्थित होते.
-----





No comments:
Post a Comment