Wednesday, 25 February 2026

राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्यात निवड झालेल्या १९८६ उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

शिवाजी विद्यापीठात आयोजित नोकरी महामेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारास नियुक्तीपत्र प्रदान करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सिद्धार्थ शिंदे, डॉ. एन.डी. पाटील, स्वागत परुळेकर, डॉ. सुभाष कोंबडे आदी


कोल्हापूर, दि. २५ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याअंतर्गत निवड झालेल्या १९८६ उमेदवारांना त्या सायंकाळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

रविवारी विद्यापीठ कॅम्पसवरील विविध अधिविभागांमध्ये मुलाखती पार पडल्या. मुलाखतीमध्ये निवड झालेल्या १९८६ युवक-युवतींना त्याच दिवशी सायंकाळी नियुक्ती पत्रे देण्यात आली.  तसेच, ४९३७ उमेदवारांना मुलाखतीच्या पुढील फेरीसाठी निवडण्यात आले. ४६८० उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व अनुभवाची कागदपत्रे कंपनीच्या प्रतिनिधींनी पुढील कार्यवाहीसाठी जमा करून घेतली.

या रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध १३७ कंपन्या व आस्थापनांच्या एकूण ९००० जागांसाठी १७,८७२ इतके उमेदवार उपस्थित राहिले. यामध्ये प्रामुख्याने इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मा, मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, फायनान्स, विमा, अकाउंटिंग, आरोग्यसेवा, ऑटोमोबाईल, आयटी, नर्सिंग या क्षेत्रांतील संधींचा समावेश आहे.

नोकरी महामेळावा आयोजनासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव, कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, विद्यापीठ विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, प्रशिक्षण अधिकारी शामल पवार, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फौंडेशनचे प्रतिनिधी नितीन माने, नेहा कुंभार यांचे सहकार्य लाभले.  मेळावा यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे यांनी नेटके नियोजन केले. या कामी विद्यापीठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, आधिविभागप्रमुख, शिक्षक, प्लेसमेंट अधिकारी, स्वयंसेवक यांनी योगदान दिले.

No comments:

Post a Comment