Saturday, 21 February 2026

अकाउंटन्सी म्युझियम वाणिज्य शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा: डॉ. सुरेश गोसावी

  

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागात अकाउंटन्सी म्युझियम ऑफ इंडियाचे उद्घाटन प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. गोसावी यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाचे नितीन हरगुडे, अधिविभाग प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन आदी.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागात अकाउंटन्सी म्युझियम ऑफ इंडियाच्या उद्घाटनानंतर संग्रहालयाची पाहणी करताना प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाचे नितीन हरगुडे, अधिविभाग प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन आदी.

कोल्हापूर दि. २१ : शिवाजी विद्यापीठात प्रस्थापित करण्यात आलेले ‘अकाउंटन्सी म्युझियम ऑफ इंडिया’ हा उपक्रम वाणिज्य शिक्षण शेत्रात एक महत्वाचा टप्पा ठरेल. तसेच हे संग्रहालय वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठीही उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आज व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागात द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) यांच्या सहकार्यातून अकाउंटन्सी म्युझियम ऑफ इंडिया प्रस्थापित करण्यात आले. याचे उद्घाटन आज कुलगुरू डॉ. गोसावी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सी. ए. नितीन हरगुडे यांनी अकाउंटन्सी म्युझियमची गरज आणि भविष्यातील संधी याविषयी विवेचन केले. वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. केदार मारुलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. तेजपाल मोहरेकर, उपाध्यक्ष आशिष सेवेकरी, सचिव अलोक शाह, खजिनदार राघवेंन्द्र बकरे, प्रिती पाचोरे, सतीश डकरे, संशोधक विद्यार्थी आणि अनेक चार्टर्ड अकाउंटंट उपस्थित होते.

संग्रहालयात देशविदेशातील लेखाशास्त्राच्या इतिहासनोंदी

या संग्रहालयामध्ये भारतातील व विदेशातील लेखाशास्त्राचा इतिहास, जुन्या लेखा नोंदी, पारंपारिक पद्धती, जुनी चलन पद्धती तसेच चार्टर्ड अकाउंटंट व्यवसायाशी संबंधित व्यापक माहिती सादर केलेली आहे. त्यामुळे वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण अधिक परिणामकारक आणि अनुभवाधारित होण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment