Tuesday, 24 February 2026

डॉ.म.सु.पाटील वैश्विक दृष्टिकोन अंगीकारलेले समीक्षक - प्राचार्य डॉ.दिलीप धोंगड

 


कोल्हापूर, दि.24 फेब्रुवारी - डॉ.म.सु.पाटील यांची समीक्षा व्रतस्थ आणि प्रमेयदर्शी आहे. त्यांनी निष्ठापूर्व गांभीर्यपूर्वक समीक्षा लिहिली. प्रबंधात्मक ग्रंथ लिहिले. सुक्ष्म आणि नेटके वाचन करीत असताना आदिबंधात्मकनिष्ठ समिक्षेचा वापर केला.कलाकृतीकेंद्री समीक्षा करावी, असे त्यांचे म्हणणे होते.ते वैश्विक दृष्टिकोन अंगीकारलेले समीक्षक होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.दिलीप धोंगडे (नाशिक) यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये मराठी अधिविभाग, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन नव-अनुष्टुभ प्रतिष्ठान, येवला (नाशिक) यांच्या वतीने 'डॉ.म.सु.पाटील यांचा समीक्षाविचार' या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे होते. डॉ.म.सु.पाटील यांच्या कन्या-मराठीतील प्रसिध्द लेखिका नीरजा यांची प्रमुख उपस्थिती होती.


                पुढे बोलताना डॉ.धोंगडे म्हणाले, आदिबंधात्मक समीक्षा ही मानसशास्त्रातून आलेली आहे.डॉ.पाटील यांनी उपयोजन केले आणि आकलनाचा पैस विस्तीर्ण केला. यामुळे त्यांनी लेखकाभ्यासाला एक नवी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी कर्तव्यबुध्दीने विपुल समीक्षा लिहून समीक्षेचा विस्तार मोठया प्रमाणात केला. त्यांंना साहित्य अकादमीचे दोन पुरस्कार मिळाले आहेत. समीक्षेचा प्रदेश हा साकल्याचा आहे तो त्यांनी कधीही आखडू दिला नाही.ते कधीही कोणत्याही एका पंथाचे झालेले नाही.  त्यांच्या आधारवाटातील लेखन विद्यार्थ्यांच्या आणि समीक्षकांच्या उपयोगी पडत आहे.सामप्रदायकतेचे व्रतधारण केल्याशिवाय ग्रंथांचे वाचन आणि आकलन करणे शक्य नाही. ज्ञानेश्वरीच्या आकराव्या अध्ययनामध्ये रसांची पंगत बसलेली आहे. ज्ञानेश्वरीचे उत्तम विवेचन त्यांनी केले आहे.श्रीमद्भगवद्गीतेचे आकलन त्यांना झालेले होते.तृष्णेचा खरा सिध्दांत त्यांना गीतेमध्ये सापडला.तृष्णाक्षयसुख त्यांनी अनुभवला आहे.त्यांनी समीक्षेची अनेक बलस्थाने मांडण्याचा प्रयत्न केला.मराठीमध्ये स्वतंत्र साहित्यशास्त्र असावे याचा आग्रह करणे योग्य नाही, तसे इंग्रजीमध्येही ते नाही.  साहित्य ही एक वैश्विक गोष्ट आहे.जगभरातील गोष्टी एकत्र करून जे तयार होते ते साहित्यशास्त्र.  वैश्विक साहित्यशास्त्राचे आदान-प्रदान होत रहात असते.एक छोटा समुह परिभाषिकतेचा वापर करून दुसऱ्या समुहाशी बोलत असतो.

                अनुष्टुभ प्रतिष्ठान (येवला) डॉ.प्रविण बांदेकर मनोगतामध्ये म्हणाले, पाच दशकांपूर्वी अनुष्टुभच्या माध्यमातून वाड्मयीन चळवळ सुरू झाली.मागील काही वर्षांमध्ये खेडयापाडयातील लिहित्या मंडळींना एक व्यासपीठ मिळवून दिले आहे.आपली परंपरा पुन्हा नव्याने पुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे.

                याप्रसंगी ज्येष्ठ लेखक डॉ.राजन गवस म्हणाले, डॉ.धोंगडे प्रशासनात असताना तुकारामांबाबत चिंतन करीत होते. डॉ.पाटील माणूस म्हणून उत्तुंग व्यक्तिमत्वाचे होते. त्यांची समीक्षा सहज, सोपी, सर्जनात्मक आहे.

                अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलसचिव डॉ.विलास शिंदे म्हणाले, ज्ञानेश्वरी, तुकाराम या साहित्यांकडे डॉ.म.सु.पाटील पहिल्यांदा गेलेले दिसतात.ते विवेकीय आणि विज्ञाननिष्ट दृष्टीकोन असलेले मातृहृदयी उत्तम समीक्षक होते.त्यांचे जीवन कार्य या दोन्ही गोष्टींचा विद्यार्थ्यांनी साक्षेपाने अध्ययन करणे आवश्यक आहे.

                तत्पूर्वी, डॉ.अशोक केळकर मराठी भाषा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठी अधिविभागाच्या वतीने प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे यांचा सत्कार डॉ.राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आला.  तसेच, नव-अनुष्टुभ प्रतिष्ठानच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

                कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक डॉ.रणधीर शिंदे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ.नंदकुमार मोरे यांनी केला तर प्रांजली क्षीरसागर यांनी आभार मानेल.याप्रसंगी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा कनेकर, एकनाथ पगार, अशितोष पाटील, वीरधवल परब उपस्थित होते.

------

No comments:

Post a Comment