Thursday, 29 December 2016

सृजनशीलता, उपक्रमशीलता व नाविन्याचा ध्यास ही यशस्वी संशोधनाची त्रिसूत्री: महेश काकडे



शिवाजी विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा उत्साहात








कोल्हापूर, दि. २९ डिसेंबर: सृजनशीलता, उपक्रमशीलता आणि नाविन्याचा ध्यास ही यशस्वी संशोधनाची त्रिसूत्री आहे. आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत तिचा अवलंब केल्यास यश निश्चित मिळेल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी नवसंशोधकांच्या मनात आज जागविला.
शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आज आविष्कार-२०१६-१७ ही विद्यापीठस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धा पार पडली. स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे होते.
श्री. काकडे म्हणाले, आविष्कार स्पर्धेची सन २००६मध्ये सुरवात झाली, तेव्हा केवळ स्पर्धकांची संख्या ३५-३६ इतकी अल्प असायची. मात्र आज एक हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होत आहेत, नवनव्या कल्पना, संकल्पना सादर करीत आहेत, ही अत्यंत उत्साहवर्धक बाब आहे. असे उपक्रम हे केवळ कोण्या एका संस्थेसाठी नव्हे, तर संपूर्ण देशातील समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरत असतात. त्यांचा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी उपयोग होणे आवश्यक आहे. विद्यापीठ सुद्धा संशोधक विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी स्वनिधीतून संशोधनवृत्ती देऊन प्रोत्साहन देत आहे. असे उपक्रम आणि स्पर्धा यांच्या माध्यमातून स्पर्धकांच्या एकूणच व्यक्तीमत्त्वामध्ये सकारात्मक बदल घडून येत असेल, तर ते खरे यश आहे, असे म्हणता येईल.
अध्यक्षीय भाषणात बीसीयुडी संचालक डॉ. मोरे म्हणाले, पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला चालना देणे हा आविष्कार स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता हा हेतू साध्य करण्याच्या दिशेने योग्य वाटचाल सुरू असल्याचा विश्वास मिळतो. पण, त्याचवेळी संशोधन प्रकल्पांची संख्या आणि त्यांचा दर्जा यांमधील असंतुलन, दरी कमी करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी आविष्कारचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. गेल्या तीन दिवसांत २६ डिसेंबरापासून अनुक्रमे कोल्हापूर, सांगली व सातारा येथे जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा झाल्या. त्यामध्ये प्रत्येकी सरासरी तीनशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले. आजच्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत २५०हून अधिक स्पर्धक सहभागी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी सहभागी स्पर्धक, टीम लीडर व परीक्षक यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. मोनाली खाचणे यांनी आभार मानले. विशाल ओव्हाळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. मोरे व श्री. काकडे यांच्या हस्ते स्पर्धेचे पुरस्कार वितरण करण्यात आले.
दरम्यान, आज सकाळी लोककला केंद्रात परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटने स्पर्धेचे संयोजन केले.

ज्ञानमंडळांच्या माध्यमातून ज्ञानवर्धनाचा विश्वकोश निर्मिती मंडळाचा उपक्रम स्तुत्य: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे



ज्ञानमंडळांच्या स्थापनेबाबत विश्वकोश निर्मिती मंडळाचा शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य करार


कोल्हापूर, दि. २९ डिसेंबर: विद्यापीठांमध्ये ज्ञानमंडळांची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून ज्ञानवर्धन करण्याचा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा उपक्रम अत्यंत समाजोपयोगी आहे, असे कौतुकोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे काढले.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यादरम्यान आज विद्यापीठात आधुनिक इतिहास, राज्यशास्त्र आणि मराठी साहित्य या तीन विषयांची ज्ञानमंडळे स्थापन करण्याबाबत सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंडळाचे प्रमुख अध्यक्ष तथा संपादक दिलीप करंबेळकर प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, जागतिक स्तरावरील विविध ज्ञानशाखांमधील ज्ञान मराठी भाषेत आणण्यामध्ये मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची महत्त्वाची भूमिका आहे. आता नवतंत्रज्ञान आणि ज्ञानाची वाढत असलेली व्याप्ती आणि होत असलेला विस्तार लक्षात घेता विद्यापीठांमधील तज्ज्ञांना त्यामध्ये सामावून घेण्याचा मंडळाचा हेतू अत्यंत स्तुत्य आहे. यामुळे मराठीमधील ज्ञानविस्तार वाढेलच, शिवाय त्यामध्ये आंतरक्रियात्मकतेला संधी असल्याने संवाद वाढेल, लोकसहभाग वाढेल. समाजाच्या सर्व स्तरांतील घटकांचे ज्ञानाच्या आदानप्रदानामध्ये समावेशन होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सामंजस्य करारांवर विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने सचिव सुवर्णा पवार यांनी तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य डॉ. अरुणचंद्र पाठक, राजशेखर सोलापुरे, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. पद्मजा पाटील, राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. अवनिश पाटील, डॉ. अरुण भोसले, विश्वकोश मंडळाचे सहाय्यक संपादक सरोजकुमार मिठारी, डॉ. जगतानंद भटकर, राजस वैशंपायन, उमाकांत खामकर आदी उपस्थित होते.

प्रकल्पाचे स्वरुप
मराठी विश्वकोश अद्ययावतीकरण या प्रकल्पांतर्गत विश्वकोश निर्मिती मंडळाने विविध विद्यापीठांना ज्ञानमंडळांद्वारे सहभागी करून घेण्याकरिता सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला. मंडळाने निर्मिलेल्या २० विश्वकोश खंडांमधील नोंदींचे अद्ययावतीकरण करणे, विविध विषयांवरील नव्या माहितीची सातत्याने भर टाकणे यासाठी ज्ञानमंडळांची स्थापना केली आहे. प्रत्येक उपविषयासाठी स्वतंत्र ज्ञानमंडळ स्थापन करून ही सर्व ज्ञानमंडळे एकमेकांशी जोडणे व त्या आधारावर विश्वकोशाची पुढील रचना करणे, हा उद्देश आहे.
मराठी विश्वकोष खंड १ ते २० मधील नोंदींच्या अद्ययावतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कालबाह्य झालेल्या नोंदी निश्चित करणे, विद्यमान नोंदींचे पुनर्लेखन करणे, नव्या नोंदी लिहून घेणे आदी विविध विषयांचा यात समावेश आहे. हे प्राथमिक काम पूर्ण झाल्यानंतर जगात प्रकाशित होणाऱ्या माहितीच्या सहाय्याने नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सातत्याने चालू ठेवणे याही कामाचा अंतर्भाव असेल. यासाठी ज्ञानमंडळाची स्थापना करण्यात येत आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ज्ञानमंडळ असेल आणि ही सर्व ज्ञानमंडळे विश्वकोशाशी जोडली जातील. या योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठाने आधुनिक इतिहास, राज्यशास्त्र आणि मराठी साहित्य या विषयांची पालकसंस्था म्हणून ज्ञानमंडळाची जबाबदारी घेण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Wednesday, 28 December 2016

सामाजिक चळवळींतूनच वाङ्मयीन विद्रोहाची निर्मिती: डॉ. अरुणा ढेरे





कोल्हापूर, दि. २८ डिसेंबर: सामाजिक चळवळींतूनच वाङ्मयीन विद्रोहाची निर्मिती झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळाच्या सदस्य डॉ. अरुणा ढेरे यांनी आज येथे व्यक्त केले.
Dr. Aruna Dhere
शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग व साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन चळवळी आणि स्त्रियांचे प्रश्न या विषयावरील चर्चासत्रात बीजभाषक म्हणून त्या बोलत होत्या. वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात हे एकदिवसीय चर्चासत्र पार पडले.
डॉ. ढेरे म्हणाल्या, निषेधाच्या आणि परिवर्तनवादी, मानवतावादी चळवळींतून मराठी साहित्यपरंपरा आविष्कृत होत आली आहे. भक्तीचळवळीपासून ते स्त्री असमिता चळवळीपर्यंत लेखिकांनी नवे समाजभान प्रकट केले आहे. धर्म सुधारणा, महिलांचे प्रश्न ते स्त्री शोषणाच्या अस्मितेचे कंगोरे मराठीतील लेखिकांनी वेळोवेळी प्रकट केले आहेत.
डॉ. पी.ए. अत्तार यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव डॉ. कृष्णा किंबहुने यांनी स्वागत केले, तर मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी आभार मानले. दुपारच्या विविध सत्रांत डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. शरयू असोलकर, सोनाली नवांगुळ, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. मेघा पानसरे व डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्त्री साहित्यासंबंधीच्या विविध विषयांवर निबंधवाचन केले. डॉ. रोहिणी तुकदेव व डॉ. शोभा नाईक यांनी या सत्रांचे अध्यक्षस्थान भूषविले. डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. नीला जोशी व सुश्मिता खुटाळे यांनी विविध सत्रांचे सूत्रसंचालन केले.