कोल्हापूर, दि. २२
डिसेंबर: नॅक मूल्यांकनाचे बदललेले स्वरुप म्हणजे भारतीय उच्चशिक्षण व्यवस्थेच्या
गुणवत्ता वर्धनासाठी अत्यंत विचारपूर्वक रचलेला चक्रव्यूह आहे. त्याला भेदण्यासाठी
शैक्षणिक संस्थांनी त्या तोडीची गुणवत्ताच प्रदर्शित करणे आवश्यक ठरणार आहे, असे
प्रतिपादन ‘नॅक’ (बंगळूर)चे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी आज येथे केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) वतीने 'नॅक' मूल्यांकनाच्या बदललेल्या स्वरुपाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. पाटील यांचे विशेष व्याख्यान
आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात
झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
Dr. Jagannath Patil |
‘नॅक’ने भारतातील उच्चशिक्षण संस्थांच्या गुणवत्ता मूल्यांकनाचे
निकष आणि स्वरुप हे मोठ्या प्रमाणावर बदललेले आहेत. त्यासंदर्भात आपल्या व्याख्यानात
डॉ. पाटील यांनी अत्यंत तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले, भारताच्या विविध भागांत
अत्यंत टोकाच्या, परस्परविरोधी, परस्परभिन्न परिस्थिती असल्याचे दिसते. उच्चशिक्षण
क्षेत्रही त्याला अपवाद नाही. तथापि, भारतीय उच्चशिक्षणातील शहरी-ग्रामीण हा भेद
लक्षात घेऊन ही दरी सांधण्यासाठी काम करण्याची गरज ‘नॅक’ला वाटते. त्यामधून मूल्यमापनाचे नवे निकष निर्धारित
करण्यात आले. उच्चशिक्षणाचा दर्जा हा भारताच्या शैक्षणिक संस्कृतीचा कायमस्वरुपी
भाग होण्यासाठी नॅक आग्रही आहे. आजतागायत ‘नॅक’ समितीच्या भेटीचे साजरीकरण अधिक प्रमाणात होत असे. नव्या
संरचनेत याला स्थान असणार नाही. यापुढील काळात शैक्षणिक संस्था ‘नॅक’ला जी माहिती सादर करतील,
तिच्या पुराव्यादाखल सादर करावयाच्या कागदपत्रांचे, प्रमाणपत्रांचे प्रमाण सुमारे
७० टक्के असेल. आणि ज्या प्रक्रियांचे डॉक्युमेंटेशन करणे शक्य नसते, (उदा. अभ्यासक्रमांची
रचना व स्वरुप, टिचिंग-लर्निंग प्रक्रिया) अशांचे मूल्यांकन पिअर टीमच्या
भेटीदरम्यान केले जाईल. विद्यार्थी समाधान सर्वेक्षण (स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे)
हा या नव्या मूल्यांकनातला अत्यंत महत्त्वाचा घटक असून जागतिक पातळीवर विद्यार्थ्यांच्या
सर्वेक्षणाला शैक्षणिक संस्थेच्या मूल्यांकनात इतके महत्त्वाचे स्थान देणारी ‘नॅक’ ही पहिलीच संस्था तर भारत
हा पहिलाच देश ठरला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
डॉ. पाटील पुढे
म्हणाले, देशातील उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातली बंदिस्तता उद्ध्वस्त करून जास्तीत
जास्त खुलेपणा आणणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने नवनवीन अभिनव संकल्पना, प्रयोगशीलतेला
प्रोत्साहन देत असतानाच दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करण्याचे धोरण नॅकने
स्वीकारले आहे. त्यासाठी हे धोरण ठरवित असताना देशाच्या उच्चशिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट
तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यातूनच सिस्टीम जनरेटेड स्कोअर (एसजीएस),
स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे (एसएसएस) आणि पिअर टीम व्हिजिट (पीटीव्ही) असा
गुणवत्तावर्धनासाठीचा त्रिस्तरीय चक्रव्यूह रचणे ‘नॅक’ला शक्य झाले. हा भेदावयाचा असेल, तर गुणवत्तेला पर्याय
नाही. तिथे अन्य कोणत्याही मार्गाचा अवलंब करता येणार नाही.
Dr. Devanand Shinde |
अध्यक्षीय भाषणात
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, उच्चशिक्षणासमोरील आव्हानांना सामोरे
जाण्यासाठी या क्षेत्रात कार्यरत प्रत्येक घटकाने सज्ज राहण्याची गरज आहे. नॅकच्या
नव्या मूल्यांकन पद्धतीत संबंधित संस्थेच्या ‘बेस्ट प्रॅक्टीसेस’ना मोठे महत्त्व आहे.
प्रत्येक संस्थेत अंगभूत अशा काही बेस्ट प्रॅक्टीसेस असतातच, ‘नॅक’मुळे त्या समाजासमोरच
नव्हे, तर देशासमोर सादर करण्याची संधी मिळते. ही संधी प्रत्येक शिक्षण संस्थेने
घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी
विद्यापीठाच्या आयक्यूएसी कक्षाचे समन्वयक डॉ. आर.के. कामत यांनी स्वागत,
प्रास्ताविक व परिचय करून दिला, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व
लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य,
महाविद्यालयांच्या आयक्यूएसी कक्षांचे समन्वयक, विद्यापीठ अधिविभागांचे प्रमुख व
शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment