कोल्हापूर, दि. ६ डिसेंबर: भारताच्या
सर्वंकष विकासाचा रोडमॅप आखून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे धोरणकर्ते
होते, असे मत अर्थशास्त्रज्ञ डॉ. पी.एस. कांबळे यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने ६१व्या महापरिनिर्वाण
दिनानिमित्त आज ‘डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचे विकास नितीबाबत विचार व सद्यस्थिती’ या
विषयावर डॉ. कांबळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
विकासाच्या धोरणामध्ये सकारात्मक दृष्टीकोनाची आवश्यकता
बाबासाहेबांनी व्यक्त केल्याचे सांगून डॉ. कांबळे म्हणाले, राजकीय, आर्थिक, सामाजिक समतोल साधण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या आधुनिक धोरणामुळे शहरी व ग्रामीण यांच्यातील समतोल बिघडत चालला असून आर्थिक व सामाजिक विषमतेबरोबरच उपभोग खर्चावरील विषमताही वाढत आहे. शिक्षण हा समाजाचा अविभाज्य घटक असताना शिक्षणाच्या खाजगीकरणातून सामाजिक वंचितता वाढत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अशी कमालीची विषमतेची दरी असलेला विकास अपेक्षित नव्हता. म्हणूनच डॉ. आंबेडकरांची विकास निती सरकारच्या धोरणात समाविष्ट झाली पाहिजे, असे मतही डॉ. कांबळे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, संपूर्ण भारताच्या विकासाच्या नियोजनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा समावेश झाला पाहिजे. बाबासाहेब भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात श्रम, ऊर्जा व जलमंत्री असताना त्यांनी विकासासाठी जी धोरणे मांडलेली आहेत, ती आजही तितकीच उपयुक्त असून त्यांची अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
यावेळी तेजश्री सावंत यांनी प्रास्ताविक व मेघाताई कांबळे यांनी परिचय करून दिला. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. प्रतिभा पाटणकर, डॉ. एस.एस. कांबळे, प्रा. जी.बी. अंबपकर, अविनाश भाले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment