Thursday 28 December 2017

सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा हे विषमता निर्मितीचे प्रमुख स्रोत: डॉ. भालचंद्र मुणगेकर





शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. जगन कराडे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. प्रल्हाद माने.


कोल्हापूर, दि. २८ डिसेंबर: सत्ता, संपत्ती आणि त्यायोगे येणारी प्रतिष्ठा हे विषमता निर्मितीचे प्रमुख स्रोत आहेत. ही विषमता देशाच्या महासत्ता होण्याच्या मार्गातील प्रमुख अडसर आहे. तो दूर करण्यासाठी तसेच उपेक्षित घटकांना विकासाची समान संधी प्रदान करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अर्थशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातर्फे असमानतेची आव्हाने: स्थानिक ते वैश्विक या विषयावर डॉ. मुणगेकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.
Dr. Bhalchandra Munagekar
डॉ. मुणगेकर यांनी आपल्या भाषणात विषमतेच्या कारणांची आणि त्यावरील उपायांची अत्यंत मुद्देसूद मीमांसा केली. ते म्हणाले, समता व स्वातंत्र्यआणि समता की स्वातंत्र्य हा वाद अगदी अरिस्टॉटल आणि प्लेटोच्या काळापासून सुरू आहे. तथापि, समतारहित समाजात स्वातंत्र्य असू शकत नाही, इतकी त्यांच्यात परस्परपूरकता आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्त्वांना सर्वोच्च स्थान प्रदान केले. जो समाज भावनिक आणि वैचारिक पातळीवर समता मान्य करीत नाही, तेथे कायद्याच्या बळावर समता प्रस्थापित करावी लागते.
समता आणि विषमता या सापेक्ष संज्ञा असल्याचे सांगून डॉ. मुणगेकर म्हणाले, नैसर्गिक साधनसंपत्तीची, स्रोतांची उपलब्धता यांचा विचार करता विषमता काही अंशी निसर्गनिर्मित असली, तरी तिला मानवी विषमतेच्या कार्यकारणभावाशी जोडणे चुकीचे आहे. वांशिक, लैंगिक, आर्थिक आणि जातीय अशा चार प्रमुख स्तरांवर मानवनिर्मित विषमता अधिष्ठित आहे. अमेरिकेतील वांशिक भेद संपुष्टात आले असे म्हटले जात असले तरी काळ्या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा दिली जात नाही. त्यासाठीचा त्यांचा संघर्ष सुरूच आहे. लैंगिक विषमता हा तर जागतिक पातळीवरील विषमतेचा प्रमुख स्रोत आहे. स्त्रीला सर्वत्रच कमी दर्जा दिला जातो. नैसर्गिकदृष्ट्या पुरूषांपेक्षा सक्षम असूनही तिचे अबलापण तिच्यावर पद्धतशीरपणे बिंबविले जाते. महिलांचे जगभरात शोषण झाले, मात्र केवळ भारतातच मनुस्मृतीने त्या शोषणाला धार्मिक अधिष्ठान मिळवून देण्याचे पाप केले. स्त्रियांना या देशात सुरक्षित वाटत नाही, त्यातही दलित स्त्री ही आणखी असुरक्षित आहे. देशात लैंगिक, जातीय आणि आर्थिक अशा तीनही स्तरांवरील शोषणाची बळी स्त्री ठरते. जातिव्यवस्था ही तर श्रमाची नव्हे, तर श्रमिकांची विभागणी आहे, असे डॉ. आंबेडकर म्हणतात. जातिव्यवस्था ही जागतिक स्तरावर अत्यंत अवैज्ञानिक मानली गेलेली गोष्ट भारतात मात्र वास्तवात अस्तित्वात आहे, हे चिंताजनक आहे. जोपर्यंत या देशाला आंबेडकर कळणार नाहीत, तोपर्यंत या देशाची प्रगती होऊ शकणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
Dr. Bhalchandra Munagekar
भारतातील आर्थिक विषमतेबाबतही डॉ. मुणगेकर यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, भारताचे २.४ ट्रिलियन डॉलर (सुमारे १५६ लाख कोटी रुपये) म्हणजे देशाचे जवळजवळ ५८ टक्के राष्ट्रीय उत्पन्न अवघ्या एक टक्का लोकांच्या हाती एकवटलेले आहे आणि सुमारे ५२ लाख कोटी रुपये म्हणजे एक तृतिअंश इतके उत्पन्न देशातल्या दोन लाख लोकांच्या हाती एकवटले आहे. परिणामी, देशातल्या ९० टक्के लोकसंख्येकडे अवघी १० टक्के संपत्ती तर १० टक्के लोकसंख्येकडे ९० टक्के संपत्ती इतकी आर्थिक विषमता देशात आहे. आपल्या आर्थिक प्रगतीचे लाभ गरीबांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे, हाच यावरील उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशातील मुसलमानांची स्थितीही दलितांपेक्षा वेगळी नाही. मात्र, लोक त्यांच्याकडे संशयाने पाहतात आणि त्या संशयाचे जागतिकीकरण करतात. दारिद्र्य, भेद आणि विषमता या तिन्ही पातळ्यांवर त्यांचे शोषण केले जाते, ही गंभीर बाब असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. तोंडी तलाकला आपला विरोध आहेच, पण तो सिद्ध होण्यापूर्वी अजामीनपात्र तीन वर्षांची शिक्षा देण्याला मात्र विरोध आहे, या भूमिकेचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विषमता हा या देशाला महासत्ता होण्यापासून रोखणारा घटक आहे. त्यामुळे समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची मोठी गरज आहे.
यावेळी समाजशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. जगन कराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रल्हाद माने यांनी परिचय करून दिला, तर डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment