Friday, 29 December 2017

डहाके यांच्या साहित्यातून मानवी मूल्यांचे वर्धन: डॉ. प्रभा गणोरकर




Dr. Prabha Ganorkar

शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय चर्चासत्र उत्साहात
कोल्हापूर दि.२९ डिसेंबर: वसंत आबाजी डहाके यांचे लेखन संतुलित, तटस्थ, कोणाचाही अधिक्षेप करणारे तसेच मानवी मूल्यांचे वर्धन करणारे आहे. त्यांच्या कवितांमधून काळाच्या पुढील निर्मितीचा ध्वनी झंकारताना जाणवतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी साहित्यिक व समीक्षक डॉ. प्रभा गणोरकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामार्फत वि.स.खांडेकर भाषाभवन सभागृहात आज वसंत आबाजी डहाके यांचे साहित्य या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र झाले. त्यावेळी बीजभाषक म्हणून डॉ. गणोरकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अशोक चौसाळकर उपस्थित होते. मानव्य विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ.भारती पाटील यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले.
कविता म्हणजे वाक्य नव्हे, तर ती मानवी मूल्यांची अभिव्यक्ती असते. त्यांचे शाश्वत मूल्यांत रुपांतर करणे हे वीचे कार्य आहे, असे मानणारे साहित्यिक वसंत आबाजी डहाके असल्याचे सांगून गणोरकर म्हणाल्या, १९५० सालापासून डहाके यांचे लेखन प्रकाशित होत असले तरी त्यांना मान्यता मिळवून देणारी कविता म्हणजे 'योगभ्रष्ट'.  या कविता संग्रहामध्ये पुढील काळाच्या निर्मितीची जनुकीय गुणसूत्रे आहेत. भौतिक, सामाजिक, राष्ट्रीय, वास्तव, मानवी दु:ख कमी करण्याचे संवेदनशील विचारवंतांनी केलेले प्रयत्न या सर्वांचे प्रतिबिंब व विश्लेषण त्यांच्या साहित्यामध्ये आढळते. छोटया-छोटया टिपणीतूनही डहाके यांची जीवनदृष्टी व्यक्त होते. एकाचवेळी अनेक गोष्टींचे संदर्भ दृष्यकलेमध्ये त्यांच्या लेखनातून पेरले जातात. त्यांनी मराठीमधील गेल्या सातशे वर्षात निर्माण झालेल्या कविता केवळ वाचलेल्याच नाहीत तर त्या अत्यंत चिकित्सकपणे अभ्यासलेल्या आहेत. 
Vasant Aabaji Dahake
यावेळी वसंत आबाजी डहाके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, कवी, कादंबरीकारांना अनुकूल अथवा प्रतिकूल शेरे मिळाले तरी त्यांना त्यांचे लेखन चालूच ठेवावे लागते. साहित्य, कला याबद्दल जे जाणवते ते लिहीले पाहिजे.  आपल्या लिखाणातून सामान्य नागरिकाची संवेदनशीलता जपण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
यावेळी डॉ.भारती पाटील म्हणाल्या, गेली पन्नास वर्षे डहाके यांनी कविता, कादंबरी आदी साहित्याची निर्मिती करुन मराठी साहित्याविश्वास मोठे योगदान दिलेले आहे.  त्यांचे साहित्य हे अस्तित्ववादी दृष्टीकोनातून आणि मार्क्सवादी दृष्टीकोनातून लिहिले गेलेले, माणसाच्या दु:खाला वाचा फोडणारे आणि माणसाचे एकाकीपण अधोरेखित करणारे आहे.
Dr. Ashok Chousalkar
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.अशोक चौसाळकर म्हणाले, डहाके यांनी आपल्या लिखाणातून समाजाचे वास्तव चित्र रेखाटले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शंकरराव देव यांनी जी भूमिका बजावली त्यामध्ये त्यांना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. त्यामुळे देव महाराष्ट्राच्या चळवळीतून आणि राजकारणातून कसे दूर फेकले गेले याचे सूक्ष्म लेखन डहाके यांनी केले आहे.
मराठी अधिविभागप्रमुख डॉ.राजन गवस यांनी प्रास्ताविक केले; तर, डॉ.नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ.वसंत पाटणकर, डॉ.रणधीर शिंदे यांच्यासह डहाके यांच्या साहित्यावर प्रेम करणारे चाहते, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment