Tuesday, 2 January 2018

मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी शिंदे यांच्या कार्याचा गाभा: प्रा. पुष्पा भावे


शिवाजी विद्यापीठात 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे:  एक दर्शन- भाग २' या ग्रंथाचे प्रकाशन करताना भारती अभिमत विद्यापीठाचे (पुणे) कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्रा. पुष्पा भावे. छायाचित्रात (डावीकडून) डॉ. राजन गवस, डॉ. एन.डी. पाटील, रमेश चव्हाण, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, सौ. सुजाता पवार, डॉ. गो.मा. पवार, अशोक शिंदे व डॉ. रणधीर शिंदे.
प्रा. पुष्पा भावे



महर्षी वि.रा. शिंदे: एक दर्शन- भाग २ ग्रंथाचे विद्यापीठात प्रकाशन

कोल्हापूर, दि. २ जानेवारी: मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा आहे. आज आपण ज्या विघटित स्वरुपात राहतो आहोत, त्यावेळी महर्षींचे हे विचारच आपल्याला नवी वाट दाखवतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे महर्षींच्या स्मृतिदिनानिमित्त रा.ना. चव्हाण लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक दर्शन, भाग-२ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ आज सकाळी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर पुण्याच्या भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Prof. Pushpa Bhave
प्रा. पुष्पा भावे म्हणाल्या, महर्षी शिंदे यांचे कार्य आणि विचार आजच्या स्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांना देशामध्ये जे सामाजिक बदल अभिप्रेत होते, त्या दिशेने त्यांनी काम केले. ते आपल्या उद्दिष्टप्राप्तीच्या दिशेने कार्यरत राहिले. लोकांना एकत्र करून, चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची भूमिका असे. अशा सुसंवादातून ते बदल घडवू पाहात होते. महर्षींची ही पद्धत आपण अंगिकारणे अत्यावश्यक आहे.
महर्षी शिंदे यांनी अन्य कोणत्याही बाबीपेक्षा नेहमी विवेकाचा आवाज ऐकण्यास प्राधान्य दिल्याचे सांगून प्रा. भावे म्हणाल्या, शिंदे यांचा प्रवास हा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीनुसार अथवा धर्मानुसार नव्हे, तर त्यांनी स्वतः ठरविलेल्या तत्त्वांनुसार झाला. भाषाशास्त्रासह धर्मशास्त्राचा तौलनिक अभ्यास त्यांनी केला, तथापि, एक धर्म पद्धती त्यांना अमान्य होती. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज अथवा ख्रिस्ती धर्म या प्रत्येक धर्मामधील चांगली मूल्ये त्यांनी उचलली आणि ती राबविण्यावर भर दिला. त्या आधारे प्रत्येक चळवळीमध्ये सहभागी होऊन कार्य करण्याचा, बदल घडविण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला;, मात्र, त्यांचे स्थान आपल्याला इतिहासात निश्चित करता आले नाही, हे आपले दुर्दैव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
महर्षी शिंदे हे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामधला दुवा असल्याचे सांगून प्रा. भावे म्हणाल्या, बाबासाहेबांच्या कार्यासाठी आवश्यक पार्श्वभूमी, पूर्वतयारी करण्याचे कार्य महर्षींनी केले. अस्पृश्यता निवारणाचे कार्य महाराष्ट्रासह देशभरात पसरविण्याचेकाम आंबेडकर यांच्यापूर्वी महर्षींनी केले. त्यानंतर ते शेतकऱ्यांच्या कार्याकडे वळले. अस्पृश्य, स्त्रिया, शेतकरी यांचे येणाऱ्या स्वातंत्र्यात नेमके स्थान कोणते व कसे असेल, याविषयी त्यांना चिंता होती. वाईसारख्या सनातनी ठिकाणाची आपल्या समाजसुधारणावादी चळवळीसाठी निवड करणे, यातून महर्षींची या कार्याबद्दलची कळकळ आणि निष्ठाच दिसून येते. त्याचप्रमाणे समाज सुधारणेचे कार्य करीत असताना आपल्या समकालीनांबरोबर विवेकी वादविवाद करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, महर्षी शिंदे हे काळाच्या पुढे पाहणारे द्रष्टे विचारवंत होते. विचारांची स्पष्टता, निर्मळ सहृदयता या गुणांसह मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी कार्य केले. त्यांच्याविषयीच्या ग्रंथातून समाज इतिहासाचा एक आदर्श वस्तुपाठ प्रदर्शित झाला आहे. आज जगभरात नैतिक, भौतिक मूल्यांचा ऱ्हास होत असताना त्यातून मूल्यव्यवस्था प्रस्थापनेच्या दृष्टीने महर्षी शिंदे यांच्यावरील हा ग्रंथ पथदर्शक ठरेल.
Dr. D.T. Shirke
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, पुष्पाताईंनी आपल्या व्याख्यानातून महर्षी शिंदे अध्यासनाच्या कार्याला अत्यंत दिशादर्शक असे मार्गदर्शन केले आहे. अध्यासनाच्या वतीने पुढील वर्षभर महर्षींचे विचार व कार्य याविषयी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे, त्याचप्रमाणे त्यांच्या ७५व्या स्मृतिदिनी वाईमध्येही एखादे चिंतन शिबीर आयोजित करण्याबाबत विचार करावा, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
यावेळी डॉ. गो.मा. पवार यांच्यासह ग्रंथाचे संपादक रमेश चव्हाण, महर्षींचे नातू निवृत्त एअर कमोडोर अशोक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला, तर डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील, प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, महर्षी शिंदे यांच्या नात सौ. सुजाता पवार, पणतू राहुल पवार, आनंद भावे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. व्यंकाप्पा भोसले, डॉ. अरुण शिंदे, रमेश शिपूरकर, डॉ. टी.एस. पाटील, रमेश कोलवालकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment