Monday, 8 January 2018

विद्यापीठाच्या दिनदर्शिका-दैनंदिनीतून

माजी कुलगुरूंच्या स्मृतींना उजाळा



शिवाजी विद्यापीठाच्या सन २०१८च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, प्रि-आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या संचालक डॉ. अंजली पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी.


शिवाजी विद्यापीठाच्या सन २०१८च्या दैनंदिनीचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व अन्य मान्यवर.
Calendar 2018

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
कोल्हापूर, दि. ८ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाने यंदा आपल्या साऱ्या पूर्वसुरींचे स्मरण करणारी दिनदर्शिका व दैनंदिनी तयार केली असून त्या माध्यमातून वर्षभर त्यांच्या स्मृती जागत्या राहतील, अशी भावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज सायंकाळी येथे व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाची सन २०१८ची दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, दिनदर्शिकेच्या माध्यमातून विद्यापीठास लाभलेल्या सर्व माजी कुलगुरूंचे स्मरण करण्याचा व त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दररोज त्यांचे दर्शन घडत राहिल्याने आपल्याला त्यातून त्यांच्याप्रमाणेच चांगल्या कामाची प्रेरणा मिळत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Cover of Diary 2018
शिवाजी विद्यापीठाला गेल्या ५५ वर्षांत डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यापासून ते डॉ. देवानंद शिंदे यांच्यापर्यंत एकूण बारा कुलगुरू लाभले. त्यामुळे या बारा कुलगुरूंची पोर्ट्रेट सन २०१८च्या दिनदर्शिकेमध्ये वापरण्यात आली आहेत. दैनंदिनीमध्येही दर महिन्याला एक या प्रमाणे ही पोर्ट्रेट वापरण्यात आली असून दैनंदिनीच्या मुखपृष्ठावर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाले, त्या दिवशीचे (दि. २३ एप्रिल १९७१) छायाचित्र तर मलपृष्ठावर विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले, त्या दिवशीचे (दि. १ डिसेंबर १९७४) छायाचित्र वापरण्यात आले आहे.
यावेळी जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या संकल्पनेतून दिनदर्शिका व दैनंदिनी साकार झाली असल्याचे सांगितले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
Back Cover
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, महाराष्ट्र शासनाच्या प्रि-आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या संचालक डॉ. अंजली पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी, वृत्तपत्रविद्या अधिविभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, संगणक विभागाच्या संचालक डॉ. स्वाती खराडे,  यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment