कोल्हापूर, दि. २२ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागात
‘ॲडव्हान्सेस इन केमिकल सायन्सेस’ या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे १ ते ३ फेब्रुवारी
२०१८ या कालावधीत करण्यात आले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज
येथे पत्रकार परिषदेत दिली.
परिषदेत रसायनशास्त्र विज्ञानातील प्रगती, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असणारे संशोधन यांविषयी चर्चा करण्यात येणार
असून या आंतरराष्ट्रीय परिषदेस देश-विदेशांतून तीनशेहून अधिक संशोधकांसह नामवंत आंतरराष्ट्रीय
शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या
माहितीनुसार, रसायनशास्त्रातील संशोधन, जागतिक स्तरावरील
प्रचलित घडामोडी व संशोधनातील चालू घडामोडींची अभ्यासकांना ओळख व्हावी आणि समाजोपयोगी
संशोधनास चालना मिळावी, या मुख्य उददे्शाने ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे.
या परिषदेस आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ.डी.पी. पांडा (क्लेम्सन विद्यापीठ, अमेरिका), प्रा. शेषनाथ भोसले (ऑस्ट्रेलिया), प्रा. पाँग वे फाँग, डॉ. शिंग
व्हॉ झिंग, प्रा. लिंग याँग चेन (तैवान), डॉ. लिन डेनॅनी
(स्कॉटलंड), प्रा. मिंग्स लाँग (चीन), प्रा. डिऑग सोहन (दक्षिण कोरिया) तसेच भाभा एटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी)
येथील डॉ. जांलीधर याखमी, डॉ. भास्कर साठे (औरंगाबाद), डॉ. संजीव कट्टी (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई), प्रा. बादल मंडल (व्हीआयटी, चेन्नई), प्रा. प्रेमकुमार सी.ई. (सी.आर.आय., चेन्नई), प्रा. पी.पी. वडगावकर (एनसीएल,
पुणे) आदी प्रख्यात शास्त्रज्ञ या परिषदेत सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. सहभागी
संशोधकांव्यतिरिक्त एम.एस्सी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या परिषदेत मुक्त प्रवेश
असेल, असेही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.
समन्वय समितीच्या वतीने माहिती देताना डॉ.
अनिल घुले यांनी सांगितले की, दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता वि.स. खांडेकर
भवन येथे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे
वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. संजीव कट्टी यांचे या प्रसंगी बीजभाषण होईल. तैवानच्या नॅशनल
त्सिंग हुवा विद्यापीठाचे प्रा. लिंग याँग चेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
आहेत. त्यानंतर विविध सत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व सहभागी
संशोधकांचे भित्तीपत्रक व मौखिक सादरीकरण होईल. २ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया, तैवान, येथील नामवंत शास्त्रज्ञांची मार्गदर्शनपर
व्याख्याने होतील. अखेरच्या दिवशी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या
अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण व सांगता समारंभ होईल.
No comments:
Post a Comment