Friday, 12 January 2018

‘आपल्या दक्षतेमुळेच माझे कुटुंब निश्चिंत’

कुलगुरूंनी व्यक्त केली वाहनचालकांप्रती कृतज्ञता



शिवाजी विद्यापीठात रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते वाहनचालकांचा कृतज्ञता सत्कार करण्यात आला. त्यावेळी (उजवीकडून)आनंदा लोखंडे, बबन पाटील, मधुकर कुंडल्ये, सदानंद लोखंडे, शिवाजी शिंदे, प्रल्हाद गंगाधरे, अजित पाटील व कुलगुरूंचे सुरक्षा रक्षक किरण पवार.


रस्ते सुरक्षा सप्ताह-


कोल्हापूर, दि. १२ जानेवारी: तुमचे दक्ष हात व नजर माझी काळजी वाहात असल्यामुळेच माझे कुटुंब रात्री निश्चिंतपणे झोपू शकते. आपण घेत असलेल्या काळजीविषयी मी कृतज्ञ आहे, अशी हृद्य भावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. निमित्त होते रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यापीठाच्या वाहन चालकांच्या सत्काराचे!
रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त कुलगुरू कार्यालयात आज सायंकाळी या विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे सर्व वाहनचालक यावेळी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, वक्तशीरपणा, निर्व्यसनीपणा आणि विश्वासार्हता हे विद्यापीठाच्या सर्वच वाहनचालकांचे सद्गुण आहेत. आपले काम, आपले विद्यापीठ आणि आपले अधिकारी यांच्याविषयीचे त्यांच्या मनातील प्रेम त्यांच्या वर्तनातून दिसत असते. आमचे जीवन त्यांच्या हातात असल्याची जाणीव त्यांना सदोदित असते. त्यामुळे वाहनाची स्वच्छता, वेळच्या वेळी मेंटेनन्स याबाबत ते सदैव सतर्क असतात. सातत्याने प्रवास करीत असताना केवळ या वाहनचालकांच्या विश्वासावरच आमचे कुटुंबीय शांततेने झोपू शकतात.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी वाहनचालकांना त्यांच्या आरोग्याविषयीही दक्ष राहण्याची सूचना केली. आमची काळजी करीत असताना स्वतःच्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष होऊ देऊ नका. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, असे आवाहनही त्यांनी केले. 
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी वाहनचालकांच्या उत्तम वर्तनाबद्दल प्रशंसोद्गार काढले.
यावेळी कुलगुरूंच्या हस्ते शाल व ग्रंथभेट देऊन वाहनचालकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आनंदा लोखंडे, बबन पाटील, मधुकर कुंडल्ये, सदानंद लोखंडे, प्रल्हाद गंगाधरे, शिवाजी शिंदे आणि अजित पाटील यांचा समावेश होता. कुलगुरूंसमवेत प्रवासात सोबत करणारे सुरक्षा रक्षक किरण पवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. श्री. कुंडल्ये यांनी सर्वांच्या वतीने सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वाहनचालकांसाठी अशा प्रकारचा सत्कार समारंभ आयोजित केल्यामुळे भारावून गेल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, अभियांत्रिकी विभागाचे उपकुलसचिव डॉ. जी.एस. कुलकर्णी, एनएसएस समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनिता रानडे, वाहन विभागाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. यु.के. सकट यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment