Wednesday, 10 January 2018

ज्ञानप्रसाराच्या क्षेत्रात बाळशास्त्रींकडून अभूतपूर्व कामगिरी: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे



कोल्हापूर, दि. १० जानेवारी: मराठी पत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्ञानसंपादन, ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानप्रसाराच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावली. त्यांचे कार्य आजही समस्त मराठी पत्रकारितेला ऊर्जा प्रदान करीत आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पोंभुर्ले (ता. देवगड) येथे आयोजित कार्यक्रमात केले.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी यांच्यातर्फे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय पत्रकार दिन व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचा गौरव समारंभ ६ जानेवारी रोजी पोंभुर्ले या बाळशास्त्रींच्या जन्मगावी दर्पण सभागृहात झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
VC Dr. Devanand Shinde
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, बाळशास्त्रींनी वृत्तपत्राकडे लोकशिक्षणाचे, समाजजागृतीचे व लोकसंवादाचे एक प्रभावी साधन म्हणून पाहिले. हे एक अत्यंत शक्तीशाली, प्रभावी माध्यम असल्याची जाणीव त्यांना होती. या माध्यमाला त्यांनी ज्ञानोत्पादक, ज्ञानप्रसारक व ज्ञानवाहक केले. वृत्तपत्राच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करण्याचे बाळकडू पहिल्याच मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून बाळशास्त्रींनी दिल्याने त्यापुढील काळात निर्माण झालेल्या वृत्तपत्रांवर आणि वृत्तपत्रकर्त्यांवरही याचा प्रभाव दिसून येतो.
दर्पणने वाचकांच्या मनात स्वराष्ट्रधर्माच्या जाणीवा जागृत केल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, दर्पणच्या माध्यमातून बाळशास्त्रींनी तत्कालीन समाजाला ग्रासलेल्या अंध गुरूभक्ती, कर्मकांडे, उच्चनीचता, जातिभेद, धर्मातिरेक, स्त्रियांवरील अत्याचार व बंधने, विधवा विवाह, केशवपन अशा अनेक बाबींवर प्रबोधन केले. त्याद्वारे समाजाला आत्मपरीक्षण करायला, विचार करायला आणि निर्णय घ्यायला प्रवृत्त केले. एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अवघ्या चौतीस वर्षांच्या अल्पायुष्यात बाळशास्त्रींनी समाज परिवर्तनाचे दिग्दर्शन मोठ्या कौशल्याने केले.
यावेळी रविंद्र बेडकीहाळ, शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, देवगड पंचायत समितीच्या सभापती जयश्री आडिवरेकर, पोंभुर्लेचे सरपंच सादिक डोंगरकर, बापूसाहेब जाधव, विजय मांडके यांच्यासह ग्रामस्थ व पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment