Wednesday, 24 January 2018

पोवाडा, पथनाट्यांनी विद्यापीठात राष्ट्रीय बालिका दिन जल्लोषात


शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित रॅलीचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व अन्य मान्यवर.



पथनाट्य सादर करताना समाजशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी.

पथनाट्य सादर करताना समाजशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी.

पथनाट्य सादर करताना समाजशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी.

पोवाडा सादर करताना पूनम पाटील

कोल्हापूर दि. २४ जानेवारी: मुलींनी मोठ्या जल्लोषात सादर केलेले पोवाडे, पथनाट्ये आणि लाठीकाठीचे जोमदार प्रदर्शन यांमुळे आज शिवाजी विद्यापीठाचे प्रांगण तरुणाईच्या जल्लोषी आणि उत्साही प्रतिसादात न्हाऊन निघाले. निमित्त होते राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित रॅलीचे!
विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानाच्या वतीने राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून मुख्य इमारतीसमोरील प्रांगणात विशेष कार्यक्रमासह कॅम्पस रॅलीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.जगन कराडे, बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयक डॉ.प्रतिभा देसाई यांच्यासह अधिकारी, शिक्षक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
त्यांच्यासमोर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बेटी बचाओ अभियानाच्या अनुषंगाने विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले. यावेळी पूनम पाटील या विद्यार्थिनीने पोवाडा सादर केला. स्नेहल पाटील हिने लाठीकाठीचे प्रदर्शन केले. तर समाजशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. तर रेहान नदाफ या कऱ्हाड येथील चिमुकल्याने बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश देणारे भाषण केले आणि साऱ्याच उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनीही लहानपणापासूनच मुलींच्या जडणघडणीकडे योग्य लक्ष दिल्यास त्या देशाचे नाव उज्ज्वल करतील, असे सांगितले. आज देशाच्या संरक्षणाच्या जबाबदारीपासून अंतराळात झेप घेणारीही देशाची लेकच असल्याचे सांगून डॉ. शिर्के म्हणाले, देशाचे नाव अग्रस्थानी आणण्यासाठी लेक वाचलीच पाहिजे, तिला चांगले शिक्षण दिले पाहिजे. तिचे संरक्षण केले पाहिजे. महाविद्यालये आणि विद्यापीठ स्तरावरील मुलींची शैक्षणिक प्रगती वाखाण्याजोगी आहे. आज विविध क्षेत्रामध्ये मुली/महिला अग्रस्थानी कार्यरत आहेत.
त्यानंतर विद्यापीठ परिसरातून या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बेटी बचाओचा संदेश व घोषणा देत भव्य रॅली काढली.

No comments:

Post a Comment